ग्रंथालयांच्या
बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न
-
ग्रंथालय संचालक धांडोरे
ग्रंथालयांसाठी
एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 19 :- महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ प्रभावी असून
ग्रंथालयांच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न म्हणून राज्यात ई-ग्रंथालय
उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक किरण धांडोरे
यांनी आज येथे सांगितले.
ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री.
धांडोरे बोलत होते. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन
झाले. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव पा. म. ताकटे होते. राजाराम
मोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता व ग्रंथालय संचालनालय यांच्याअंतर्गत
अर्थसहाय्याच्या विविध योजनांच्या माहिती संबंधी आयोजित या कार्यशाळेत तीन सत्रात
मार्गदर्शन करण्यात आले. विजयनगर परिसरातील हनुमान मंदिर मंगल कार्यालयात
कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी औरंगाबाद
विभागाचे सहाय्यक ग्रंथसंचालक ए. मा. गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष
गंगाधर पटने, ॲड बी. आर. भोसले, निर्मलकुमार सुर्यवंशी, प्रभाकर देशमुख, राजेंद्र
हंबीरे आदींची उपस्थिती होती.
श्री. धांडोरे म्हणाले की , देशात सर्वाधिक
सार्वजनिक वाचनालय महाराष्ट्रात आहेत. अशा ग्रंथालयांच्या माध्यमातून
ज्ञानवर्धनाचे काम होत आहे. राज्यातील ग्रंथालयांसाठी विविध योजनाही सुरु करण्यात
येत आहेत. ग्रंथालयांना अनुदान वेळेत व अनुषंगिक सुविधा देण्याबाबत नेहमीच प्रयत्न
केला जातो. ग्रंथालयांचे बळकटीकरण हा महत्वपूर्ण विषय आहे. ग्रंथालयांच्या
आधुनिकरणासाठी ई-ग्रंथालय ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न असल्याचेही
त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की,
ग्रंथालयांनी भविष्याचा वेध घेऊन वाटचाल केल्यास त्यांना समाजाच्या सर्वच स्तरातून
पाठबळ मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथ आणि वाचन संस्कृतीबाबत महत्व
पटवून दिले आहे. त्यामुळे समाजाच्या विकासात ग्रंथालयांचे महत्व नेहमीच राहिले
आहे.
यावेळी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष पटने यांनीही
ग्रंथालय चळवळीबाबत मांडणी केली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी
प्रास्ताविक केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात राजाराम मोहन रॉय ग्रंथालय
प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ यांनी विविध योजनांची माहिती दिली. तिसऱ्या
सत्रात सार्वजनिक ग्रंथालयाचे आधुनिकीकरण या विषयावर डॉ. गोविंद हंबर्डे, कैलास
वडजे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. जगदीश कुलकर्णी होते. या तिन्ही
सत्रांचे सूत्रसंचालन देवदत्त साने यांनी केले.
00000