Monday, September 19, 2016

लेख -

राहूल कस्तूरे यांना मिळाला
बीज भांडवल योजनेचा आधार
            बालपण नांदेड शहरातच गेलं. माझ्या घरची परिस्थिती तशी बेताची. मला एक भाऊ व तीन बहीणी असा परिवार त्यात आई गृहीणी व वडील महाराष्ट्र परिवहन महामंडळात कामाला... तुटपुंज्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. एक वर्षाचा असताना अंगात खूप ताप आला... औषधोपचारासाठी डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी ताप असतानाच इंजक्शन दिले. त्यात माझे दोन्ही पाय निकामी झाले. या आजारानंतर घरच्यांनी माझ्यासाठी खूप ठिकाणी उपचार केला. परंतू त्यांना यश आले नाही. त्यामुळे मला कायमचे अपंगत्व... मला चालता येत नसल्याने शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षण पुर्ण झाले. शिक्षण पुर्ण करत असतानाच स्व:ताचा व्यवसाय चालु केला. या व्यवसायासाठी मला देना बँक व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने मदत केली. बीज भांडवल योजनेचा लाभ मिळाला. पानटपरीचा व्यवसाय सुरु केला. आजही अपंगत्वावर मात करुन खंबीरपणे हा व्यवसाय चालवित आहे.हे बोल आहेत राहूल माधवराव कस्तूरे यांचे.
नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातील राजेशनगर येथे राहणाऱ्या राहूलने 12 वी पर्यंतचे शिक्षण वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय वसरणी सिडको येथे पुर्ण केले. शिक्षणाबरोबर व्यवसाय चालु ठेवला. व्यवसाय करतानाच यशवंतराव चव्हाण मु्क्त विद्यापीठाच्या यशवंत महाविद्यालयातील अभ्यास केंद्रातून बी.ए. ची पदवी पुर्ण केली. त्यानंतर मराठी/इंग्रजी टंकलेखनाचा कोर्स पुर्ण केला. ही शैक्षणिक वाटचाल करताना त्याला खुप अडचणी आल्या त्यावर मात करत त्याने शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण पुर्ण झाल्यावर जवळपास 20 पेक्षा अधिक स्पर्धा परिक्षा दिल्या परंतू त्यात राहूलला यश आले नाही. घरची परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण करावयाचे म्हणल्यावर थोडा विचार केला. 12वीत शिकत असताना त्याने सायकल टॅक्सीचा व्यवसाय सुरु केला. परंतू त्या व्यवसायात पाहिजे तेवढा नफा मिळत नव्हता. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या समाज कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तीच्या विविध योजनांची माहिती घेतली. त्यातील बीज भांडवल योजनेचा लाभ घेतला. यासाठी देना बँक, आनंदनगर, नांदेड यांचे सहकार्य त्याला लाभले.50 हजार रुपये कर्ज आणि 10 हजार रुपये सबसिडी मिळाली. त्यानंतर सायकल टॅक्सीचा व्यवसाय बंद करुन पानठेल्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. कारण हा व्यवसाय त्याच्यासाठी सोपा होता, यात फिरण्याची आवश्यकता नव्हती.
समाज कल्याणची बीज भांडवल योजना त्याच्यासाठी जिवनदायी ठरली. या योजनेतून व्यवसाय करण्याची संधी मिळाली. या व्यवसायावरच त्याला लग्नासाठी स्थळ आलं. आणि 2013 मध्ये लग्न झाले. सध्या एक मुलगी आहे. या व्यवयसायावर त्याचे घर चालते.त्यामुळे त्याच्यासाठी ही योजना जिवनदायी ठरली. याबाबत शासनाच्या बीज भांडवल योजनेचा ऋणी असल्याचे तो आवर्जुन सांगतो.
राहूलला वाचनाची खूप आवड आहे. त्याचा तो छंदही आहे. त्याला सामाजिक उपक्रम करायला आवडतं. स्व:ताच्या पैशातून दररोज 5 दैनिक वाचकांसाठी मोफत त्याच्या पानटपरीवर उपलब्ध करुन देतो. दिव्यांग व्यक्तीला सर्वात मोठा आधार कुटुंबाचा असतो. आई,वडील,भाऊ,बहीणी आणि पत्नी यांचा त्याला मोठा आधार आहे. हे सर्वच त्याचा आत्मविश्वास वाढवतात. मेहनत घेण्याच्या जिद्दीला साथ मिळाली बीज भांडवल योजनेची आणि यातून तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

-         लोणेकर प्रितम तुकाराम
मो. 9860720646
  (लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...