Wednesday, August 14, 2019






स्वातंत्र्य दिन मुख्य समारंभात आज
पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 14 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 72  व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त गुरुवार 15 ऑगस्ट, 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.
000000
वृत्त क्र. 554
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 14 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त  व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.
                                                                    00000
वृत्त क्र. 555
जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 5.77 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 14 :- जिल्ह्यात बुधवार 14 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 5.77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 92.33 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 464.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 48.54 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 14 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 9.63 (433.11), मुदखेड- 18.00 (519.68), अर्धापूर- 8.33 (405.30), भोकर- 1.75 (482.95), उमरी- 21.00 (463.78), कंधार- निरंक (418.66), लोहा- 1.00 (372.24), किनवट- 0.57 (643.53), माहूर- 4.25 (629.84), हदगाव- निरंक (447.14), हिमायतनगर- निरंक (522.02), देगलूर- 2.00 (299.66), बिलोली- 6.60 (505.40), धर्माबाद- 13.00 (454.31), नायगाव- 5.20 (440.80), मुखेड- 1.00 (398.42). आज अखेर पावसाची सरासरी 464.80 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 7436.84) मिलीमीटर आहे.  
00000
वृत्त क्र. 556
सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी
मुंबईसह नागपूरमध्ये 23 ऑगस्टला पेन्शन अदालत
नांदेड, दि. 14 : राज्य शासनाच्या सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी लेखा व कोषागारे संचालनालयामार्फत मुंबई आणि नागपूर येथे शुक्रवार 23 ऑगस्ट 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नांदेड जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.
केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या ज्ञापनान्वये देशभरात सर्व राज्ये, केंद्र शासित प्रदेशांमध्ये पेन्शन अदालतआयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात अशा पेन्शन अदालतीचे शुक्रवार 23 ऑगस्ट 2019 रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही पेन्शन अदालत मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी आयोजित करण्यात येईल.
मुंबईत आयोजित होणाऱ्या पेन्शन अदालतीचे काम सकाळी 10 वा. ते पूर्ण दिवस असे चालणार आहे. याचे स्थळ पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई असे आहे.
दुसरी पेन्शन अदालत नागपूर येथे आयोजित होईल. तिचा वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यं असा आहे. तर स्थळ साई सभागृह, शंकरनगर अंबाझरी रोड नागपूर असे आहे.
महालेखाकार मुंबई व नागपूर कार्यालयामार्फत प्रलंबित निवृत्तीवेतन मंजूर न झालेल्या प्रकरणांची यादी www.mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Circulars and orders या Tab मधील पेन्शन अदालत 2019 मध्ये एजी मुंबई व नागपूर हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या यादीतील निवृत्तीवेतन प्रकरणे महालेखाकार मुंबई व नागपूर कार्यालयाने त्रुटींची पुर्तता करण्यासाठी संबंधीत कार्यालय प्रमुखांकडे परत पाठविलेली आहेत.
प्रलंबित निवृत्तीवेतन मंजूर न झालेल्या प्रकरणांच्या यादीत नमूद सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधून शुक्रवार 23 ऑगस्ट 2019 रोजी पेन्शन अदालतीस उपस्थित रहावे. राज्य शासनाच्या इतर सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांनी निवृत्तीवेतन मंजूर न झालेल्या प्रकरणी तक्रार असल्यास त्यांनीही आपल्या कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधून तक्रारींसह या पेन्शन अदालतीमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 557
बाल शक्ती व बालकल्याण
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 14 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. बाल शक्ती पुरस्कार  हा ज्या मुलांनी क्रीडा,कला,संस्कृती,समाजसेवा,शौर्य इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे अशा मुलांना हा पुरस्कार देण्यात येतो. तसेच बाल कल्याण पुरस्कार हा ज्या व्यक्ती व संस्थांनी बाल विकास,बाल संरक्षण,बाल कल्याण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेले आहे अशा व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो.
दोन्ही पुरस्कारासंबंधीच्या मार्गदर्शक सुचना www.nca-wcd.nic.in  या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज  www.nca-wcd.nic.in  या वेबसाईटवर दिनांक 31 ऑॅगस्ट 2019 पर्यंत पाठवावेत,असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग,औरंगाबाद यांनी केले आहे.
                                                0000
वृत्त क्र. 558
शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करुन
उत्‍पन्‍नात वाढ करावी - डॉ. एस. डी. मोरे
नांदेड, दि. 14 :-  महाराष्ट्र शासन कृषि विभाग आत्मायोजी पद्मश्री डॉ विठ़ठलराव विखे पाटील यांची जयंती शेतकरी दिनानिमित्त शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम सेंद्रीय या विषयावर सुसंवाद साधून साजरी करण्‍यात आली.
 शेतीतील मातीचा कमी झालेला कर्ब व वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडील वाढलेला कल कमी करुन पुर्वीच्‍या पारंपारीक पध्‍दतीने व त्‍यास आधुनिकतेची जोड देवून सेंद्रीय शेती करावी. उत्‍पादन खर्च कमी करुन उत्‍पन्‍न वाढवावे व ग्राहकांना विषमुक्‍त अन्न उपलब्‍ध करुन दयावे, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे संचालक डॉ. एस. डी. मोरे यांनी शेतकरी शास्‍त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात बोलताना केले.
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक आत्‍मा  आर. बी. चलवदे हे होते. याप्रसंगी प्रकल्‍प उपसंचालक सौ. एम. आर. सोनवणे, तालुका कृषि अधिकारी व्‍ही. आर. सरदेशपांडे, प्रगतशील शेतकरी आर. पी. कदम, भागवत देवसरकर, गोपाळराव पाटील इजळीकर, उत्‍तमराव कदम, बाबुराव कासारखेडेकर, रामेश्‍वर घोरबंड यांनी शास्‍त्रज्ञाबरोबर शेतीविषयक प्रश्‍नावर  सुसंवाद साधला.
 यावेळी नांदेड जिल्‍हयातील विविध सेंद्रीय शेतकरी गटातील बहुसंख्‍य शेतकरी व कृषि विभाग व आत्‍मा कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन प्रमोद झरे यांनी केले तर आभार बिरादार श्रीहरी यांनी मानले.
00000
वृत्त क्र. 559
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत
एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
नांदेड, दि. 14 :- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जवनन्नोती अभियान (उमेद) व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या गटांची सांगड घालण्यासाठी कार्यशाळा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच हॉटेल अतिथी शिवाजीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा आर. बी. चलवदे, माविमचे जिल्हा व्यवस्थापक चंदनसिंग राठोड, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक दिपक दहे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, उमेद, मविम कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून शेतकरीगट, महिला बचतगटांना शेतीवर आधारित उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्यातून ग्रामस्तरावर रोजगार उभारणीस चालना मिळेल यासंदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. चलवदे यांनी शेतकरी गट,महिला बचत गट यांनी थेट शेतमाल, भाजीपाला न विकता त्यावर प्राथमिक प्रक्रिया करु विक्री केल्यास जास्तीतजास्त नफा मिळवू शकतो. त्यासाठी  शेतकरी, महिला, भूमिहीन व्यक्तींच्या इच्छुक गटांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत काढणी पश्च्यात व्यवस्थापन व हवामान मूल्य साखळी प्रोत्साहन तसेच शेतमाल वृद्धीसाठी हवामान अनुकूल मुल्यसाखळ्यांचे  बळकटीकरण करणे. या घटकांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी व प्रकल्पासाठी निवड झालेल्या गावातील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी, महिला, भूमिहीन व्यक्तींचे इच्छुक गटांना शेतीवर आधारित उद्योगासाठी प्रकल्प खर्चाची 50 टक्के अर्थसहाय्य देय आहे. यासंदर्भात ही कार्यशाळा आयोजित केली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी कृषि व्यवसाय विशेषज्ञ प्रमोद झरे यांनी उपस्थीतांचे आभार मानले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी  एस. पी. बिरादर व श्री. पी. पी. डहाळे यांनी परिश्रम घेतले.
0000
वृत्त क्र. 560
शिवाजी पुतळा ते महात्मा गांधी पुतळा परिसरात बंदी आदेश
नांदेड, दि. 14 :- नांदेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर 14 ऑगस्ट रोजी सायं. 6 वाजेपासून 15 ऑगस्ट 2019 रोजी मध्यरात्री पर्यंत बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी काढला आहे.
गुरुवार 15 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात होणार आहे. याअनुषंगाने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर 14 ऑगस्ट रोजी सायं 6 वाजेपासून ते गुरुवार 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पर्यंत उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  बंदी आदेश लागू करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहे.
000000
वृत्त क्र. 561
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत
खरेदी केंद्रासाठी खरेदी संस्थांना आवाहन
नांदेड, दि. 14:- राज्यात हंगाम 2019-20 मध्ये नांदेड जिल्ह्यात नाफेडमार्फत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद व सोयाबीन खरेदीची केंद्र सुरु करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. इच्छूक खरेदी संस्थेने मंगळवार 20 ऑगस्ट 2019 रोजी सांयकाळी 5 वा. पर्यंन्त संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
खरेदी केंद्र मंजूर करताना पुढील प्रमाणे प्राधान्यक्रम असेल. जिल्हा / तालुकास्तरावरील अ वर्ग सभासद असलेले खरेदी विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी अ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी दोन्ही वर्ग सभासद संस्था कार्यरत नसतील त्या ठिकाणी इतर सहकारी संस्थेस ब वर्ग सभासद करुन घेवून खरेदीचे काम देणे. खाजगी बाजार समिती.
खरेदी करणाऱ्या संस्थेकडे पुढील साधान सामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचा दाखला. मॉइस्टर मीटर, चाळणी, ताडपत्री, संगणक, संगणक चालवणे क्षमता असलेला जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्टफोन, संगणक हाताळणीकरिता प्रशिक्षित असलेला सेवक वर्ग, इलेक्ट्रॉनिक वजन काटा.
वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीपुर्वी संस्थेचे स्वत:चे, भाड्याचे गोदाम असल्याबाबत. अन्नधान्य / कडधान्य व तेलबिया इ. खरेदी विक्रीचा किमान एक वर्षाच्या अनुभव, खरेदी केंद्र चालविण्याकरिता आवश्यक सेवक उपलब्ध असल्याचे, काळ्या यादीत / अपहार / फौजदारी गुन्हा यासंबंधी कार्यवाही झालेली नसल्याबाबतचे सहाय्यक निबंधक यांचे प्रमाणपत्र घेण्यात यावे.
मागील तीन वर्षाचे सनदी लेखापाल/शासकीय लेखापरीक्षक यांनी साक्षांकित केलेली ताळेबंद पत्रके सादर करावीत. पॅनकार्डची प्रत, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेकडे दहा लाख रुपये खेळते भांडवल असल्याबाबतचे बँकेचे प्रमाणपत्र / बँक पासबुक नोंद (ज्या संस्थेला पणन महासंघाकडून अनुषंगिक व इतर खर्चापोटी रक्कम देय असल्यास त्याचा समावेश करण्यात यावा.) आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी नाफेडने निश्चित केलेले स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर मान्य असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र (ॲफीडेवीट), संस्थेकडून खरेदी, नोंदणीमध्ये गैरव्यवहार, अनियमितता झाल्यास प्रशासकीय खर्च देय असणार नाही. ही अट मान्य असल्याचे संमतीपत्र ही संस्थेचे दयाच्या कागदपत्रे आवश्यक आहेत.
मागील तीन वर्षाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ऑफलाईन खरेदी / गैरव्यवस्थापन न केल्याबाबत दाखला, खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडील आवश्यक आहे.
0000  
वृत्त क्र. 562
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुरस्कारार्थीचा सोमवारी सत्कार
नांदेड, दि. 14:- साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारार्थीचा सत्कार कार्यक्रम जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 19 ऑगस्ट, 2019 रोजी दुपारी 3 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सभागृह, ज्ञानमाता शाळेसमोर, हिंगोली रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि. 31 जुलै 2019 प्रमाणे राज्य शासनाने विख्यात साहित्यिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष 1 ऑगस्ट 2019 ते 1 ऑगस्ट, 2020 या कालावधीत साजरे करण्याचे आयोजित केलेले आहे. त्याअनुषंगाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेडच्यावतीने सोमवार 19 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्थांनी व समाज बांधवांनी 19 ऑगस्ट रोजी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जी. जी. येरपवार यांनी केले आहे.
0000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...