वृत्त क्र. 201
राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून
5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली
· विविध प्रकरणांत 21 कोटी 26 लाख 36 हजार 723 रुपयांची तडजोड
नांदेड दि. 4 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी उपस्थित पक्षकारांना लोकअदालतीचे महत्व समजावून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्याचे आवाहन केले. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये नांदेड जिल्हयामध्ये एकुण 5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून यात 21 कोटी 26 लाख 36 हजार 723 रुपये इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली.
तडजोड प्रकरणात दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरीत झालेली प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार मंच येथील प्रलंबीत प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकांचे तसेच विद्युत प्रकरणे, दूरसंचार विभागाची टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणे इत्यादींचा समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेअतंर्गत 858 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे.
कौटुंबिक वादाची 26 प्रकरणे आपसात मिटविण्यात आली
तर 2 जोडप्यांनी घेतला एकत्र नांदण्याचा निर्णय
विशेष म्हणजे या लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पती-पत्नीचे कौटुंबिक वादाची एकूण 26 प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली. त्यापैकी 2 वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या लोक अदालतीच्या निमित्ताने स्टेट बॅंक ऑफ इंडिया, नांदेड विभागीय अधिकारी कालीदास व जगताप यांनी त्यांचे विभागातर्फे नांदेड जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी भव्य पेंडालची व्यवस्था करुन मोलाचे सहकार्य केले. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश व पॅनल सदस्य आणि सर्व सन्माननिय विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.
नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व सन्माननिय विधिज्ञ आणि भूसंपादन अधिकारी, आयुक्त मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड व प्रबंधक, जिल्हा न्यायालय नांदेड व सर्व न्यायालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर , मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले तसेच ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले तसेच यापुढेही अशा सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
00000