Thursday, January 28, 2021

 

मराठवाडा विभागाच्या माहिती जनसंपर्क कार्यालयातील

बारा कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा होणार गौरव 

          औरंगाबाद, दि. 28, (विमाका) - सन 2020 या वर्षात आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती) कार्यालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद  अंतर्गत  कार्यालयांतील बारा कर्मचाऱ्यांची  उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.  संचालक (माहिती) गणेश रामदासी यांनी  नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. तसेच स्वच्छ व सुंदर कार्यालय म्हणून संपूर्ण मराठवाड्यातून  जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच कार्यसंस्कृती  प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

मराठवाडा विभाग अंतर्गत माहिती व जनसंपर्क विभागाचे  एकूण दहा कार्यालयं आहेत.  या कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या प्रसिध्दीचे काम अव्याहतपणे सुरु असते.  गेल्या वर्षभरात आपल्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच इतर कामातही हिरीरीने सहभाग घेऊन उत्तम काम करणाऱ्या तसेच कोरोनासारख्या आपत्कालिन परिस्थितीत तसेच निवडणुकीच्या कालावधीत उत्तम कार्य करणाऱ्या आणि अचानक आलेल्या कामाची जबाबदारी स्वीकारुन कार्यालयाची प्रतिमा उंचावणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा  उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

वर्ष 2020 साठीच्या उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

उत्कृष्ट शिपाई म्हणून प्रतिभा इंगळे, जिल्हा माहिती कार्यालय, जालना व अशोक बोर्डे, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर, उत्कृष्ट वाहनचालक म्हणून  सुभाष पवार, जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद व रामकिसन तोकले विभागीय माहिती कार्यालय, लातूर, उत्कृष्ट छायाचित्रकार/छायाचित्रणकार म्हणून ना.गो.पुठ्ठेवाड, पर्यवेक्षक, जिल्हा माहिती कार्यालय, बीड, व विजय होकर्णे, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड, उत्कृष्ट लिपिक म्हणून शिवाजी गमे, दुरमुद्रण चालक जिल्हा माहिती कार्यालय, बीड, मनिषा कुरूलकर, विभागीय माहिती कार्यालय, लातूर, प्रसिध्दी कामाकाजासाठी  अमोल महाजन, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, जालना व अश्रूबा सोनवणे, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर  वर्ग-दोनचे उत्कृष्ट अधिकारी म्हणून मीरा ढास, सहायक संचालक, विभागीय माहिती कार्यालय, लातूर तर वर्ग-एकचे उत्कृष्ट अधिकार म्हणून मुकूंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद यांची निवड करण्यात आली.

***

 

विविध योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी

नांदेड तालुक्यात मंडळनिहाय कॅम्पचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जनतेला शासनाच्‍या विविध योजनांची माहिती व त्‍या योजनेचा लाभ तात्‍काळ मिळावा यादृष्‍टीकोणातून नांदेड तालुक्‍यात मंडळनिहाय कॅम्‍प घेवून शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ गरजू व्‍यक्‍तींना देण्यासाठी शासन निर्णय 7 सप्टेंबर 2020 अन्वये व जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड तालुक्‍यातील नागरिकांनी आपल्‍या मंडळातील कॅम्‍पला उपस्थिती नोंदवून विविध योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे. 

नांदेड तालुक्‍यात पुढीलप्रमाणे मंडळनिहाय कॅम्‍प घेण्‍यात येणार आहे. नांदेड (फेमस फक्‍शन हॉल देगलूर नाका नांदेड) 29 जानेवारी 2021, नांदेड (ग्रामीण) 5 फेब्रुवारी, तरोडा (बु) 12 फेब्रुवारी, नाळेश्‍वर 26 फेब्रुवारी, लिंबगाव 5 मार्च, विष्‍षुपुरी 12 मार्च, वसरणी 19 मार्च, तुप्‍पा 26 मार्च, वाजेगाव 9 एप्रिल 2021 याप्रमाणे मंडळनिहाय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सन्‍माननिय लोकप्रतिनिधी, मा. जिल्‍हाधिकारी, मा. उपविभागीय अधिकारी, तहसिदार, सर्व यंत्रणेचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. नांदेड तालुक्‍यातील नागरिकांनी आपल्‍या मंडळातील कॅम्‍पला उपस्थिती नोंदवून विविध योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे. 

महसूल विभागाअर्तगत‍ः विविध प्रमाणपत्रे (रहिवास, उत्‍पन्‍न, राष्‍ट्रीयत्‍व, जातीचे, नॉन क्रिमीलेअर) संजय गांधी, इंदिरा गांधी, योजनेचे अर्ज स्‍वीकारणे, पुरवठा विभागात EKYC  करणे, नविन शिधापत्रिकांचे अर्ज स्विकारणे इत्‍यादी. महानगर पालीका / तालुका आरोग्य अधिकारी : आरोग्य तपासणी, लसीकरण दिव्‍यांग लाभार्थी यांचे अर्ज  स्विकारणे. गटविकास अधिकारीः   घरकूल योजनेचा आढावा व प्रलंबीत अनुदान देणे,दिव्‍यांग अॅपवर दिव्‍यांगाची नोंदणी करणे,विविध दाखले देणे, (जन्‍म,मृत्‍यू,विवाहनोंदणी,शौचालयदाखला,नमुना ८चा उतारा,विधवाअसल्‍याचा दाखला,विभक्‍त कुटुंबाचा दाखला,निराधार दाखला,मालमत्‍ता  फेरफार प्रमाणपत्र, विज जोडणीसाठी नाहरकत,बेरोजगार असल्‍याचा दाखला). उपअधिक्षक भूमि अभिलेखः मोजणी संदर्भात प्राप्‍त  तक्रारी, अर्जाचा निपटारा Drone Survey संदर्भात माहिती देणे.  तालुका कृषी अधिकारीः मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्‍यवसाय ग्रामीण परिवर्तन योजनाची माहिती,विविध औजारे व साहित्‍य  देणे,फळबाग लागवड,सुक्ष्‍म खादय उदयोग योजन,कृषी पायाभूत विकास निधी,फळबाग लागवड,व्‍हर्मी कंपोस्‍ट, नॅडेप कंपोस्‍ट, बांधावर वृक्षलागवड  शेततळे इ. ठिंबक तुषार, रेशीम मत्‍स्‍यपालन, मधुमक्षिका, कुकूटपालन, रोपवाटीका लाभ  देणे फलोत्‍पादन योजना शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देणे पिक विमा योजनेचा लाभ. महिला व बालविकास विभागः बचतगटाद्वारे स्त्रीयांचे संघटण करुन उद्योग व्‍यवसायाला चालना देणे, गरिबांचे हक्‍क,वित्‍तीय सेवा,बालविवाह रोकणे, प्रबोधण करणे, कुपोषीत बालकांची दर्जावृध्‍दी करणे, बचतगटाचे उपक्रमव साहित्‍य विक्री,बेटी बचाव बेटी पढाव मोहिम. सहायक निबंधक सह संस्‍थाः पिक कर्ज वाटप,तक्रारी निपटारा, मुद्रालोत प्रलंबीत तक्रारी, नैसर्गीक अनुदान आपत्‍ती अनुदान वाटप. तालुका पशुधन विकास अधिकारीः जनावरांचे लसीकरण,जनावरांचे पानवटे तयार करणे, गरजुंना जनावरांचे वाटप करणे. महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनीः  विद्युत राहीत्र मागणी व वितरण, विद्युत जोडणी, विद्युत बिल तक्रारी. याप्रमाणे लाभ देण्‍यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 

 

      रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत  

चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 28 :- बत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियान 2021 च्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्हयातील शालेय विद्यार्थी, नागरिकांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नांदेड जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी खुली असून स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक दिले जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छूक विद्यार्थी व नागरिकांनी या स्पर्धेसाठी आपले निबंध व चित्र बुधवार 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. 

स्पर्धेसाठी गट व विषय पुढील प्रमाणे राहतील. चित्रकला स्पर्धेत छोटा गट इयत्ता 1 ते 7 पर्यंत- वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. मध्यम गट इयत्ता 8 वी ते दहावी पर्यत- अपघातग्रस्तास मदत करा. खुला गट- सडक सुरक्षा जीवन रक्षा. निबंध स्पर्धेत खुला गट (सर्वांसाठी) अपघातमुक्त राष्ट्रासाठी आवश्यक उपाययोजना हा विषय राहिल. 

या स्पर्धेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. निबंध व चित्रकला स्पर्धेतील इच्छूक स्पर्धेकांनी त्यांना दिलेल्या विषयावरील आपला निबंध व चित्र आपले पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकासह पोष्ट, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड या कार्यालयात बुधवार 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावेत. संपर्कासाठी पत्ता व ईमेल पुढीलप्रमाणे आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, प्लॉट क्र. पी-149, एमआयडीसी, सिडको, नांदेड-431603 दूरध्वनी क्र. 02462-259900 ई-मेल roadsafetynanded@gmail.com आहे. या स्पर्धेचे सर्वाधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांच्याकडे राहतील. सदर निबंध चित्रकला स्पर्धेमध्ये जास्तीत विद्यार्थी नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000

 

लोहा तालुक्‍यातील 118 ग्रामपंचायतींच्‍या

सरपंच पदाचे आरक्षण 3 फेब्रुवारी रोजी

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सन 2020-2025 या कालावधीमधील ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेता ग्रामपंचायतींच्‍या आरक्षणाचा विचार करुन लोहा तालुक्‍यातील 118 ग्रामपंचायतींच्‍या सरपंच पदाचे आरक्षण 3 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय ईमारत तहसिल कार्यालय लोहा येथे निर्धारित करण्‍यात आले आहे. अशी माहिती लोहयाचे तहसिलदार तथा पिठासीन अधिकारी विठ्ठल परळीकर यांनी दिली. 

मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम 1964 चे नियम 2 (अ) (2) नुसार श्री. विपीन इटनकर जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी त्‍यांचे दि. 27 जानेवारी 2021 चे आदेशान्‍वये लोहा तालुक्‍यातील सरपंच पदाचे आरक्षण 3 फेब्रुवारी 2021 रोजी निर्धारित केले आहे. त्‍यानुसार सदर रोजी सकाळी 11 वाजता लोहा तहसिल कार्यालयाच्‍या प्रशासकीय ईमारतीत आरक्षण बाबतच्‍या कार्यवाहीस प्रारंभ होणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठीचे आरक्षण कंधारचे उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगांवकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्‍यात येणार आहे. पिठासीन अधिकारी म्‍हणून तहसिलदार लोहा यांना प्राधिकृत करण्‍यात आले आहे. 

सदर सरपंच आरक्षण सोडतीच्‍या अनुषंगाने लोहा तालुक्‍यातील सर्व जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती सदस्‍य, आजी, माजी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्‍य, प्रतिष्ठीत नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार लोहा तथा पिठासीन अधिकारी यांनी केले आहे.

000000

 

38 कोरोना बाधितांची भर तर

45 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- गुरुवार 28 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 38  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 24 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 14 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 45 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 489 अहवालापैकी 1 हजार 415 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 416 एवढी झाली असून यातील 21 हजार 314 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 315 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 584 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 28,  मुखेड कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, देगलूर कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1 असे एकूण 45 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 15, भोकर 1, मुखेड 2, परभणी 1, नांदेड ग्रामीण 3, किनवट 1, हिंगोली 1 असे एकुण 24 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, जालना 1, अर्धापूर 3 असे एकूण 14 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 315 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 9, मुखेड कोविड रुग्णालय 9, महसूल कोविड केअर सेंटर 16, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 196, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 39, खाजगी रुग्णालय 11 आहेत.   

गुरुवार 28 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 167, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 93 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 8 हजार 142

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 81 हजार 407

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 416

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 314

एकुण मृत्यू संख्या-584

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-33

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-315

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9.          

00000

 

शिक्षणासाठी ऑनलाईन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर  व्हावा

-         पालकमंत्री अशोकराव चव्हाण

महात्मा फुलेच्या अटल टिकरींगचे शानदार उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- कोरोना महामारीमुळे समाजाच्या सर्वच घटकांवर मोठा दुष्पपरिणाम झाला हे नाकारता येणार नाही. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. शाळेतील वर्गाद्वारे शिक्षकांचे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना जे शिक्षण व्हायचे ते थांबले होते.  या कालावधीत डिजिटल शिक्षण हाच पर्याय उपलब्ध असल्याने  ऑनलाईन शिक्षणाची अनुभूती कोरोना काळाची देण ठरली असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

महात्मा फुले हायस्कूलच्या अटल टिकरींग लॅबचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री तथा संस्थेचे सचिव डी.पी.सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद प्रतोद आ.अमर राजुरकर, आ.मोहन हंबर्डे, संस्थेचे सहसचिव अ‍ॅड. उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पावडे, नरेंद्र चव्हाण आदिंची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना पालकमंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर आता काळाची गरज झाली आहे. यापासून शिक्षण क्षेत्रही दूर राहू शकत नाही. व्हर्च्युअल बैठका, सभा यासोबतच आता व्हर्च्युअल क्लासेसही तयार होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हीच आता खऱ्या अर्थाने कोरोनाची देण समजून इष्टापत्तीचा उपयोग शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वाढीसाठी करावा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी असेही ते म्हणाले. 

यावेळी माजी  पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. महात्मा फुलेच्या मुख्याध्यापिका सौ. माया जयस्वाल यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले हायस्कूलमधील सुरू असलेले विविध उपक्रम, ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांची प्रगती व संस्थेचा सहभाग याविषयी प्रास्ताविकपर भाषणातून माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी. बी. नाईक यांनी केले तर आभार सौ. कोलेवाड यांनी मानले. या कार्यक्रमास प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.शेंदारकर, उपमुख्याध्यापक संजीवकुमार तायडे, पर्यवेक्षिका सौ.सुरेखा कदम, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांच्यासह शारदा भवन शिक्षण संस्थेंतर्गत शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

00000

 

नारी शक्ती पुरस्कारासाठी

नामांकन सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 28:-  महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला, संस्थांना शासनामार्फत नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी इच्छूक महिलांनी व संस्थानी नारी शक्ती पुरस्कारासाठी www.narishaktipuraskar.wcd.gov.in    www.wcd.nic.in या संकेतस्थळावर शनिवार 30 जानेवारी 2021 पर्यंत नामाकंने सादर करावेत, असे आवाहन नांदेडचे जिल्हा माहिला बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.   

अर्जदार महिलेचे वय 1 जुलै 2020 रोजी 25 वर्षे असावे. अर्जदार संस्थेला महिला विकास कार्याचा 5 वर्षे अनुभव असावा. नामाकंन सादर करताना महिला विकास क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याचे व इतर आवश्यक कागदपत्रे नामांकन सोबत सादर करावे. नामांकने सादर करण्याचे अंतिम मुदत 30 जानेवारी 2021 आहे. नामाकंने www.narishaktipuraskar.wcd.gov.in.   www.wcd.nic.in  या वेबसाईटवर फक्त ऑनलाईन पध्दतीने भरावेत. अधिक माहितीसाठी www.wcd.nic.in या संकेतस्थळास भेट दयावी, असेही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 मराठवाडा विभागाच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयातील

बारा कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा होणार गौरव

 

          औरंगाबाद, दि. 28, (विमाका) - सन 2020 या वर्षात आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती) कार्यालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद  अंतर्गत  कार्यालयांतील बारा कर्मचाऱ्यांची  उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.  संचालक (माहिती) गणेश रामदासी यांनी  नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. तसेच स्वच्छ व सुंदर कार्यालय म्हणून संपूर्ण मराठवाड्यातून  जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच कार्यसंस्कृती  प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

             मराठवाडा विभाग अंतर्गत माहिती व जनसंपर्क विभागाचे  एकूण दहा कार्यालयं आहेत.  या कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या प्रसिध्दीचे काम अव्याहतपणे सुरु असते.  गेल्या वर्षभरात आपल्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच इतर कामातही हिरीरीने सहभाग घेऊन उत्तम काम करणाऱ्या तसेच कोरोनासारख्या आपत्कालिन परिस्थितीत तसेच निवडणुकीच्या कालावधीत उत्तम कार्य करणाऱ्या आणि अचानक आलेल्या कामाची जबाबदारी स्वीकारुन कार्यालयाची प्रतिमा उंचावणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा  उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

वर्ष 2020 साठीच्या उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

            उत्कृष्ट शिपाई म्हणून प्रतिभा इंगळे, जिल्हा माहिती कार्यालय, जालना व अशोक बोर्डे, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर, उत्कृष्ट वाहनचालक म्हणून  सुभाष पवार, जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद व रामकिसन तोकले विभागीय माहिती कार्यालय, लातूर, उत्कृष्ट छायाचित्रकार/छायाचित्रणकार म्हणून ना.गो.पुठ्ठेवाड, पर्यवेक्षक, जिल्हा माहिती कार्यालय, बीड, व विजय होकर्णे, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड, उत्कृष्ट लिपिक म्हणून शिवाजी गमे, दुरमुद्रण चालक जिल्हा माहिती कार्यालय, बीड, मनिषा कुरूलकर, विभागीय माहिती कार्यालय, लातूर, प्रसिध्दी कामाकाजासाठी  अमोल महाजन, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, जालना व अश्रूबा सोनवणे, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर  वर्ग-दोनचे उत्कृष्ट अधिकारी म्हणून मीरा ढास, सहायक संचालक, विभागीय माहिती कार्यालय, लातूर तर वर्ग-एकचे उत्कृष्ट अधिकार म्हणून मुकूंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद यांची निवड करण्यात आली.

***

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...