Thursday, January 28, 2021

 

      रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत  

चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 28 :- बत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियान 2021 च्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्हयातील शालेय विद्यार्थी, नागरिकांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नांदेड जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी खुली असून स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक दिले जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छूक विद्यार्थी व नागरिकांनी या स्पर्धेसाठी आपले निबंध व चित्र बुधवार 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. 

स्पर्धेसाठी गट व विषय पुढील प्रमाणे राहतील. चित्रकला स्पर्धेत छोटा गट इयत्ता 1 ते 7 पर्यंत- वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. मध्यम गट इयत्ता 8 वी ते दहावी पर्यत- अपघातग्रस्तास मदत करा. खुला गट- सडक सुरक्षा जीवन रक्षा. निबंध स्पर्धेत खुला गट (सर्वांसाठी) अपघातमुक्त राष्ट्रासाठी आवश्यक उपाययोजना हा विषय राहिल. 

या स्पर्धेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. निबंध व चित्रकला स्पर्धेतील इच्छूक स्पर्धेकांनी त्यांना दिलेल्या विषयावरील आपला निबंध व चित्र आपले पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकासह पोष्ट, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड या कार्यालयात बुधवार 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावेत. संपर्कासाठी पत्ता व ईमेल पुढीलप्रमाणे आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, प्लॉट क्र. पी-149, एमआयडीसी, सिडको, नांदेड-431603 दूरध्वनी क्र. 02462-259900 ई-मेल roadsafetynanded@gmail.com आहे. या स्पर्धेचे सर्वाधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांच्याकडे राहतील. सदर निबंध चित्रकला स्पर्धेमध्ये जास्तीत विद्यार्थी नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...