Tuesday, November 15, 2022

 दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने अर्ज करण्याची सुविधा


नांदेड (जिमाका) दि. 15:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी अतिविलंब शुल्काने शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगी रित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने विलंब व अतिविलंब शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2022 मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता. खाजगीरित्या इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने ऑनलाईन पध्दतीने स्विकारणाच्या अंतिम मुदतवाढीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.

अतिविलंब शुल्कासह निर्धारित अंतिम मुदत याप्रमाणे आहे. माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अति विलंब शुल्क रु. 20/- प्रती विद्यार्थी प्रतीदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या तारखा शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 पर्यत भरावयाचा आहेत. खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे.

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क +विलंब शुल्क/अतिविलंब शुल्क, इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क/ अतिविलंब शुल्क राहिल.(विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क नमूद केल्याप्रमाणे शुल्क भरण्यात यावे. )

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज करावयाचे आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.

इयत्ता दहावी व बारावी- 2023 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. इय्यता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ही अंतिम मुदत आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, प्राचार्य व संबंधित घटकांनी नोंद घेवून दिलेल्या कालावधीतच फॉर्म भरणे बंधनकारक राहील यांची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 इयत्ता पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 15 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय शिक्षक मंडळामध्ये इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नावनोंदणी पध्दतीने प्रवेश अर्ज 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत निश्चित करण्यात आला होता. सदर कालावधी संपुष्टात आला असून आता ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे यांची सर्व विद्यार्थ्यांनी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ यांनी केले आहे.
नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी मंगळवार 8 नोव्हेंबर ते सोमवार 21 नोव्हेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरावेत. गुरूवार 10 नोंव्हेबर ते बुधवार 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे मूळ अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे, यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in
या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज करावेत, असे शिक्षण मंडळकडून सांगण्यात आले आहे.
000000
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर
नांदेड (जिमाका) दि. 15 :- आदिवासी उमेदवारांसाठीचे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जि.नांदेड या कार्यालयाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, पहिला मजला गोकुंदा, किनवट या शासकीय ईमारतीत 14 नोव्हेंबर 2022 पासून स्थलांतर झालेले आहे. सर्वानी यांची नोंद घ्यावी, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी कळविले आहे.
00000

 पेनूर येथील गोदावरी नदीपात्राला जिल्हाधिकाऱ्यांची रात्री अचानक भेट

▪️अडगळीच्या जागी लावलेले 6 तराफे केले नष्ट
नांदेड (जिमाका) दि. 15 :- लोहा तालुक्यातील पेनूर येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अचानक भेट देऊन अवैध वाळू उपसा करणारे साहित्य नष्ट केले. गोदावरी नदीच्या पात्राला त्यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत अडचणीच्या ठिकाणी एकुण 6 तराफे लावलेले त्यांना आढळून आले. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी हे तराफे नष्ट करण्याच्या सूचना उपविभागीय दंडाधिकारी शरद मंडलिक यांना केल्या.
उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसिलदार व्यंकटेश मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले, मंडळ अधिकारी डी. एल. कटारे, तलाठी राजु इंगळे, रायाजी, मोतीराम पवार, मारोती कदम यांच्या पथकाने हे साहित्य नष्ट केले. सदर कारवाई रात्री 12 पर्यंत सुरू होती.
पेनूर व बेटसांगवी येथे होत असलेल्या अवैध रेती विरुद्ध जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात मोठी कारवाई केली होती. अनेक तराफे नष्ट करून आलेला अवैध रेतीसाठा जप्त केला होता. या कारवाई पाठोपाठ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आता रात्री अचानक भेट देऊन केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
000000





 बिरसा मुंडा यांना अभिवादन करत मोतीरामच्या शेतात जेंव्हा विहिरीचे भूमिपूजन होते !

▪️जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर यांनी
लाभार्थी मोतिरामचा बांधावर जाऊन केला सन्मान
नांदेड (जिमाका) दि. 15 :- भारतीय राज्यघटनेने दिलेल्या हमी नुसार दुर्बलतर घटकांसाठी शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमार्फत क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील वाडी-वस्तीवर असलेल्या शेतकऱ्यांना विहिरीची योजना ही त्यांचे जीवनमान उंचावणारी ठरली आहे. आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे लाभधारक मोतिराम पिराजी तोटावाड या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अभिवादन केले. अल्पभूधारक असलेल्या मोतीराम यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला या आगळ्या अभिवादनाने समाधानासह आश्वासकता मिळायला वेळ लागला नाही.
ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांच्या मनात योजनेप्रती विश्वासार्हता निर्माण व्हावी, लाभधारकाला ती योजना आपली वाटावी व त्याचेही सकारात्मक समाधानी योगदान त्यात मिळावे या उद्देशाने जिथे-जिथे शक्य असेल तिथे मी भेट देण्याचा प्रयत्न करते, या शब्दात वर्षा ठाकूर-घुगे यांनी लाभधारकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मोतीराम यांच्या शेतातील विहिरीचे भूमिपूजन करतांना या परिवाराच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा शासकीय सेवक म्हणून आम्हालाही बळ देणारा आहे, असे त्या म्हणाल्या.
अल्पभूधारक शेतकरी असल्याने या एक हेक्टर व काही गुंठ्यात उज्जवल भविष्याचा मार्ग दिसत नव्हता. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमुळे आता या शेतीतून खूप काही मनासारखे करता येईल. आमच्या गावात पोकरा योजना असल्याने त्याचाही अप्रत्यक्ष आम्हाला लाभ होईल असे मोतिराम तोटावाड या शेतकऱ्याने सांगितले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पेरूची लागवड करण्याचे माझे स्वप्न आता साकार होत असल्याने आम्हाला प्रचंड आनंद झाल्याचे मोतिराम यांनी सांगितले.
00000








 मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी

ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हंगाम 2022-23 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात नांदेड(अर्धापूर), मुखेड, हदगावलोहा, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, जाहुर (ता. मुखेड), गणेशपूर (ता. किनवट), वन्नाळी ता. देगलूर, धुप्पा ता. नायगाव या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.

 

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबूक इ. कागदपत्रे सबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...