वृत्त क्रमांक 185
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द आणि सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन
नांदेड १६ फेबुरवारी :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासनाने 29 डिसेंबर,2023 व 25 जानेवारी,2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली,2023 विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/ व्यक्ती यांच्याद्वारा 14 जानेवारी ते 26 जानेवारी,2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक छाननी करण्यात आलेली असून, प्राथमिक छाननीचे गुणांकन तक्ते शासननिर्णय क्रं.शिछपु.2023/प्र.क्रं.188/क्रीयुसे-2, दि.29 डिसेंबर,2023 मधील नियम क्रं.1.19, नियम क्रं.1.20, नियम क्रं.1.21 अनवये एकूण गुणांकनासह 15 ते 18 फेब्रुवारी,2025 या कालावधीत सूचना व हरकतीसाठी https://shivchhatrapatiawards.com या लिंकवर प्रसिध्द करण्यात येत आहेत.
सदरचे प्राथमिक छाननी अहवाल हे अंतिम नसून, त्यामध्ये आपल्या सूचना व हरकतींनुसार बदल होऊ शकतो, तसेच सूचना/ हरकतीनंतर सदरचा अहवाल पुनश्च्य प्रसिध्द करण्यात येणार नाही.
प्राथमिक छाननी अहवालात केलेल्या पुरस्कार गुणांकनाबाबत काही आक्षेप किंवा सूचना असतील तर त्या सोबत जोडलेल्या विहित नमून्यात सादर कराव्यात.
पुरस्कारासाठी ऑनलाईन सूचना व हरकती सादर करण्याचे वेळापत्रक :
सुचना व हरकती सादर करण्याचा सुरुवातीचा 15 फेब्रुवारी,2025
सुचना व हरकती सादर करण्याचा अंतिम 18 फेब्रुवारी,2025 सांय 05 पर्यंत
पुरस्कार गुणांकन तक्ते अवलोकनासाठी व सूचना/ हरकती सादर करण्यासाठी ऑनलाईन लिंक: https://shivchhatrapatiawards.com यावर ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावे असे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
००००००