Sunday, February 16, 2025

 विशेष लेख                

 आठवणीतले अ.भा. मराठी साहित्य संमेलन नांदेड -१९८५

नांदेड येथे १९८५ साली ५९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विख्यात कथालेखक शंकर पाटील हे होते.नांदेड येथील स्टेडियम परिसरात तीन दिवस हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.या संमेलनाच्या आयोजनाची धूरा पद्मश्री श्यामराव कदम यांच्या कडे होती. देशाचे केंद्रीय मंत्री स्व.शंकरराव चव्हाण हे आश्रयदाते होते.नांदेडचे हे साहित्य संमेलन अविस्मरणीय ठरले.

  उत्तम गुणवतेचे कार्यक्रम आणि खास मराठवाडी पध्दतीचे आदारातिथ्य व जेवण.यशवंत महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात भोजन व्यवस्था केलेली होती.साहित्य संमेलनासाठी पुण्या - मुंबई वरून आलेल्या साहित्यिक पाहुण्यांनी खास नंदिग्रामी व्यंजनांची तोंड भरून तारीफ केली होती.दही,ठेसा आणि व-हाडी ज्वारीची भाकरी रूचीपालट करून गेली.

मला आठवते.मी संयोजन समितीत होतो.तेव्हा दूरदर्शन सर्वदूर पोचले नव्हते.नांदेडवरून मुंबईसाठी विमानसेवा नव्हती.नांदेड ते मुंबई हा साधारणतः बारा-चौदा तासांचा रेल्वे प्रवास.त्यामुळे मुंबईला ध्वनी चित्रफीत पोचावायची कशी?हा प्रश्न आयोजकांसमोर पडला.स.दि.महाजन हे संयोजन प्रमुख होते.ते मोठे कल्पक.संमेलनाच्या उदघाटनाची बातमी दूरदर्शनवर आली पाहिजे म्हणून आदले दिवशीच उद्घाटनाचा श्रोत्यांविना डमी सोहळा पार पडला.त्याची शुटिंग घेऊन मुंबईला पाठविण्यात आली. अर्थातच दुसऱ्या दिवशी बातमी योग्य प्रकारे सोबतीला पोहोचविण्यात आली मात्र व्हिज्युअलसाठी अशा पद्धतीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या मागचा उद्देश हा सर्वांना उद्घाटनाची बातमी कळावी हा होता .

हा सोहळा संपल्यानंतर कथाकार शंकर पाटील गमतीने म्हणाले.'यावर छान विनोदी कथा लिहिता येईल.'तेव्हा खूप हशा पिकला. बातमीसाठीची धडपड आणि साहित्य संमेलनाच्या बातमीचे महत्त्व कायम मनावर अधोरेखित राहिले संमेलन आठवले की ही घटना मात्र आठवतेच आठवते.

नांदेडचे हे साहित्य संमेलन आठवणीत राहण्याची तशी अनेक कारणे आहेत.राजा गोसावी हे अंध कवी या संमेलनातून रसिक श्रोत्यांसमोर आले.राजा मुकुंद यांच्या 'पोरी जरा जपून ' या कवितेला रसिकांनी जोरदार दाद दिली.
राम नगरकर यांच्या 'रामनगरी'ने हसवता हसवता श्रोत्यांना अंतर्मुख केले.आकाशवाणीला मुलाखत देण्यासाठी त्यांना जे अनुभव आले.ते ऐकताना सतत हास्याचे फवारे उडत होते.

संमेलनाचे अध्यक्ष कथालेखक शंकर पाटील हे तीनही दिवस साहित्य संमेलनात अत्यंत साधेपणाने वावरले.पद्मश्री श्यामराव कदम यांच्या लिंबगाव येथील शेतात आम्ही गेलो होतो तेव्हा शेती, सहकार, शिक्षण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. निजामी राजवटीत मराठवाड्यातील जनतेवर झालेल्या अनन्वित अत्याचाराच्या हकिकती ऐकून शंकर पाटील व्यथित झाले.हा किस्सा कवी ना.धों.महानोर यांनी सांगितला.

कथाकथनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझ्याकडे होते.द.मा.मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या कथांना रसिक श्रोत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.मराठवाडी बोलीतून सादर केलेल्या रा.रं.बोराडे यांच्या 'म्हैस' या कथेने तर श्रोत्यांची हसून हसून मुरकुंडी वळवली.​ या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा' हा खानदेशची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवरील कार्यक्रम खूप भाव खाऊन गेला.परभणीचे आशा जोंधळे आणि अशोक जोंधळे यांच्या गळ्यातून उतरलेली बहिणाबाईंची गाणी श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचली.त्यांना बेहद्द आवडली.दत्ता चौगुले यांच्या बासरीने ही गाणी अमीट केली.फ.मुं.शिंदे यांच्या मार्मिक आणि गंभीर निवेदनाने हा कार्यक्रम उंचीवर गेला.या संमेलनानंतर महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचे प्रयोग झाले.

या साहित्य संमेलनानिमित्त 'नांदण' नावाची अत्यंत देखणी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.नांदेडच्या सांस्कृतिक, साहित्यिक वैभावाची नोंद घेणारे लेख या अंकात असून भालचंद्र कहाळेकर,नरहर कुरुंदकर, नागनाथ कोत्तापल्ले अशा नांदेड जिल्ह्यातील लेखक,कवींवर स्वतंत्र टिपणे आहेत.नांदेडचा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा समजावून घेण्याच्या दृष्टीने ही स्मरणिका महत्त्वाची ठरेल.

नांदेड येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्तम व्यवस्था,काटेकोर नियोजन आणि कसल्याही प्रकारच्या वादविवादाविना पार पडले.या संमेलनात एकच उणीव जाणवत होती.ती म्हणजे विख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या आकस्मिक निधनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन पार पडत होते.कुरूंदकर गुरूजी हयात असते तर या संमेलनाची उंची आकाशाला गवसणी घालणारी ठरली असती.

प्रा.डॉ.जगदीश कदम
ज्येष्ठ साहित्यिक
नांदेड
९४२२८७१४३२


नांदेड येथे 1985 ला संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील छायचित्रात संमेलनाध्यक्ष शंकर पाटील. स्वागताध्यक्ष पद्मश्री श्यामराव कदम, साहित्यिक
भु.द. वाडीतर , उद्योजक राजा बन्सी ,मुन्ना जैन दिसत आहे.
छायाचित्र सौजन्य :  छायाचित्रकार विजय होकर्णे


No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   458 क्रीडा व युवक कल्याण मंत्री  दत्तात्रय भरणे यांचा दौरा  नांदेड दि. 30 एप्रिल :- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्य...