Thursday, November 3, 2022

 मन्याड नदीवरील पुलाचे काम सुरु असल्याने वाहतुकीस प्रतिबंध

पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- कंधार तालुक्यातील बहादरपूरा गावापासून फुलवळ या गावास जाणाऱ्या रस्त्यावरील मन्याड नदीवरील पुलाचे/रस्त्याचे काम सुरु असल्याने या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. 

बहादरपूरा जवळील मन्याड नदीवरील पुलाचे काम सुरु असल्याने या मार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या मार्गामध्ये बदल करुन या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या मार्गावरील सर्व वाहने ही बहादरपुरा-घोडज-शेकापुर-बिजेवाडी फाटा-फुलवळ मार्गे मुखेड कडे ये-जा करतील. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 4 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबरपर्यत नमुद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

00000

 जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- दिनांक 7 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी वाहतूकीच्या नियामात हा बदल केला असून त्याबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे. रुग्णवाहीका व अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच पोलीस अधिक्षक कार्यालयाने परवानगी दिलेल्या वाहनाला या अधिसुचनेतुन मोकळीक देण्यात आली आहे. 

सोमवार 7 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत नर्सी चौक ते देगलुर राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. त्याऐवजी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून नरसी- गडगा- खरब खंडगांव- भायेगाव मार्ग देगलूर येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी- गडगा- मुखेड- बाऱ्हाळी- मुक्रमाबाद- करडखेड- देगलुर येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालु राहील. नर्सी- कासराळी- रुद्रापुर- मुतन्याळ- थडीसावळी- खतगांव- कोटेकल्लुर- शहापुर- सुंडगी- हनुमान हिप्परगा- देगलुर. तसेच देगलुरकडुन याच मार्गाने येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. 

मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नर्सी चौक ते देगलुर राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नर्सी- गडगा- खरब खंडगांव- भायेगाव मार्ग देगलुर येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी- गडगा-मुखेड- बाऱ्हाळी- मुक्रमाबाद- करडखेड- देगलुर येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालु राहील. नर्सी- कासराळी- रुद्रापुर- मुतन्याळ- थडीसावळी- खतगांव- कोटेकल्लुर- शहापुर- सुंडगी- हनुमान हिप्परगा- देगलुर येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील.

बुधवार 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत धनेगांव फाटा पासुन ते नर्सी -देगलुर राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग जड वाहनासह इतर वाहनांकरीता नांदेड- मुदखेड- उमरी- धर्माबाद- कुंडलवाडी- बिलोली- तेलंगाना येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. नांदेड- मुदखेड- उमरी- कारेगांव फाटा - कासराळी- रुद्रापुर- मुतन्याळ- थडीसावळी- खतगांव- कोटेकल्लुर- शहापुर- सुंडगी- हनुमान हिप्परगा- देगलुर येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नांदेड- कंधार- जांब- जळकोट- उदगीर मार्गे लातूर / कर्नाटक येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नांदेड- कंधार- मुखेड- हिब्बट मार्ग -खानापुर- देगलुर येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालु राहील. 

गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नागपुर-हिंगोलीकडुन येणारी वाहतुक सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. नर्सीकडुन नांदेडकडे जाणे-येण्यासाठी सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. चंदासिंग कार्नर ते ढवळे कार्नर जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. चंदासिंग कार्नर - वाजेगाव-देगलुर नाका- बाफना- रेल्वे स्टेशन जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. महाराणा प्रताप चौकाकडुन बाफना टि पॉईन्टकडे येणारी व जाणारी तसेच महाराणा प्रताप चौकाकडुन हिंगोली गेट व चिखलवाडीकडे जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. रेल्वे स्टेशन- शिवाजी महाराज पुतळाकडुन गांधी पुतळयाकडे जाणारी व वजीराबाद चौकाकडे येणारी वाहतुकीसाठी बंद राहील. महावीर चौक ते शिवाजी महाराज पुतळयाकडे जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. महावीर चौक ते वजीराबादकडे जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. जुना कौठा- रामसेतु पुल -तिरंगा चौक -वजीराबाद चौक कडे येणारी वाहतुक वजीराबाद चौक ते आायटीआय चौक जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. आायटीआय चौक ते अण्णा भाऊ साठे पुतळयाकडे जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. परत आायटीआय चौक ते राज कार्नर-आसना ब्रिजकडे जाणे-येण्यासाठी पुर्ण पणे बंद राहील. आसना ब्रिज ते शंकरराव चव्हाण चौकाकडे जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. भोकर फाटा ते नांदेड कडे येणारी वाहतुक आसना ब्रिज पर्यंत बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नागपुर- हिंगोलीकडुन येणारी -जाणारी वाहतुक औंढा मार्गे -परभणी-पालम-लोहा -लातूर येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. नागपुर- हिंगोली कडून येणारी -जाणारी वाहतुक - भोकर फाटा- भोकर- उमरी- धर्माबाद- कुंडलवाडी- बिलोली- देगलुर, नागपुर- हिंगोलीकडुन येणारी -जाणारी वाहतुक - भोकर फाटा- मुदखेड- उमरी- कारेगांव फाटा- बिलोली -तेलंगाना येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी -गडगा- कौठा- कलंबर- उस्मानगर- नांदेड येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी -कासराळी- कारेगांव फाटा- उमरी- मुदखेड- नांदेड येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालु राहील. तुप्पा पाटी ते गोपाळचावडी-ढवळे कार्नर-दुध डेअरी-साई कमान/ नावघाट पुल ते जुना मोंढा येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. तुप्पा पाटी ते गोपाळचावडी-ढवळे कार्नर- संभाजी चौक- लातुर फाटा - लातुर-लोहा येणारे-जाणारे वाहन तसेच जुना मोंढा कडे येणारे वाहतुक चालु राहील. वजीराबाद चौक ते राज कॉर्नर कडे जाण्या-येण्यासाठी तिरंगा चौक- लालवाडी अंडर ब्रिज- महावीर सोसायटी- गणेश नगर वाय पॉईन्ट- पावडेवाडी नाका मोर चौक- छत्रपती चौक ते राज कार्नर येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील.

शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नागपुर-हिंगोलीकडुन येणारी वाहतुक सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. आसना ब्रिज पासुन ते भोकर फाटा-वसमत फाटा- ते अर्धापुर व जिल्हा बार्डर पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. येळेगांव फाटा ते भोकर फाटाकडे येणारी सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नागपुर- हिंगोलीकडुन येणारी -जाणारी वाहतुक औंढा मार्गे -परभणी-पालम-लोहा -लातूर येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. नागपुर कडून येणारी -जाणारी वाहतुक हदगांव- भोकर- बारड- मुदखेड- नांदेड- येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. राज कार्नर- तरोडा नाका- पासदगांव- कासारखेडा- मालेगांव मार्गे वसमत/हिंगोली येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. नमस्कार चौक- मालटेकडी -शंकरराव चव्हाण चौक- मुदखेड- बारड- भोकर- हदगांव येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील. भोकर- बारड- मुदखेड- वाजेगांव/ शंकरराव चव्हाण चौक- नांदेड येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील, असे पोलीस अधिक्षक कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागातर्फे ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या विषयावर आधारित स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यत नोंदणी करावी, असे आवाहन नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे. 

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेती व्यवसाय क्षेत्र, स्वयंरोजगार क्षेत्र, महिला रोजगार क्षेत्र, उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यासक्रम, अन्य उपयुक्त अभ्यासक्रम या क्षेत्रासाठी उमेदवारांनी स्पर्धेत ऑनलाईन नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड किंवा समन्वयक सचिन राका, मो.क्र. 9421385801 वर संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

 बाल विवाह थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या

-  जिल्हाधिकारी अभिजित राऊत 

·  सक्षम युवाशक्ती कार्यक्रम राबविणार 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- आपल्या गावामध्ये बालविवाह होत असल्याची माहिती मिळल्यास त्याला आळा घालण्यासाठी ग्रामपातळीवर पोलीस तसेच ग्रामसेवक यांनी  विशेष पुढाकार घेवून बालविवाहास प्रतिबंध करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या. 

बालविवाह निमुर्लन जिल्हा कृती आराखडा विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महिला व बालविकास अधिकारी  रेखा काळम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, राज्य कार्यक्रम अधिकारी पुजा यादव, कार्यक्रम स्वयंसेवक आकाश मोरे, निलेश कुलकर्णी, दादाराव शिरसाठ उपस्थित होते. 

आशाताई, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून बालक-पालक यांचे समुपदेशन करण्यात येत असले तरी गावात एखादा बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच वेळी  भितीपोटी गावातील नागरिक पुढे येत नाहीत. यामुळे प्रशासकीय यंत्रणेने संतर्क राहून अशा गोष्टीला आळा घालावा, असे त्यांनी सांगितले. 

बेटी बचाव व बेटी पढाव अंतर्गत तसेच आयसीडीएस  मार्फत विविध उपक्रम आयोजीत करण्यात येऊन यात किशोरवयीन मुलीची शारिरिक तपासणी आवश्यक आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. बालविवाह लावून देणाऱ्‍या संस्था व्यक्ती असतील त्यांचे  समुदेशन केले पाहिजे. प्रत्येक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येक महिन्याला सादर करण्याचे, निर्देश राऊत यांनी दिले. 

नांदेड जिल्ह्यामध्ये 100 शाळेतील 13 हजार 267 मुलांना बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजनाची माहिती देण्यात आली आहे. यापुढे सक्षम युवाशक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक-युवती नांदेड जिल्ह्यातील गावांमध्ये जावून याविषी जनजागृती करणार आहेत. शाळामध्ये शिक्षकांमार्फत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

00000

 दिवाळी पहाट हे सांस्कृतिक सहभागाचे हे आदर्श प्रतिक

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत 

दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल

सहभागी संस्थांचे कौतुक 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- कोणत्याही लोकाभिमुख उपक्रमासाठी समाजातील त्या-त्या क्षेत्राचे प्रतिनिधित्त्व अत्यंत आवश्यक असते. नांदेडमध्ये कोरोनामुळे न होऊ शकलेले उपक्रम आता पुन्हा नव्या जोमाने आणि उत्साहाने साजरे होत आहेत याचे विलक्षण कौतूक वाटते. इथल्या सांस्कृतिक चळवळीतील प्रतिनिधींच्या कृतीशील सहभागाचे हे आदर्श प्रतिक असून दिवाळी पहाट कार्यक्रम त्यामुळेच यशस्वी झाल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले. 

नागरी सांस्कृतिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन जिल्हा प्रशासनाने या उपक्रमाला पाठबळ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा प्रशासन, नांदेड मनपा, गुरूद्वारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाटचा विशेष कार्यक्रम नांदेड वासीयांच्या भेटीला दिला होता. दिनांक 24 ते 26 ऑक्टोबर या तीन दिवसाच्या कालावधीत बंदाघाट येथे झालेल्या सर्व कार्यक्रमास नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अत्यंत कमी कालावधीत हा कार्यक्रम यशस्वी झाला हे विशेष. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. 

या यशस्वी संयोजनाबाद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते नागरी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष लक्ष्मण संगेवार, सदस्य विजय जोशी, विजय होकर्णे, ॲड गजानन पिंपरखेडे, बापु दासरी, वसंत मैय्या, उमाकांत जोशी, विजय बंडेवार, निळकंठ पाचंगे आदी उपस्थित होते.

00000






 शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे आवश्यक

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

·         जिल्हा ग्रंथोत्सवबाबत आढावा बैठक संपन्न 

नांदेड (जिमाका), दि. 3 :- समाजात विवेकाचे भान रुजण्यासाठी वाचन संस्कृती सारखा दुसरा भक्कम पर्याय नाही. अलीकडच्या काळात वाचनाचे असलेले प्रमाण लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांपासून प्रभावीपणे वाचनाची गोडी कशी रुजवता येईल याचा प्राधान्याने विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड ग्रंथोत्सव समन्वय समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस माजी आमदार तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड गंगाधर पटने, प्रकाशक संघटनेचे अध्यक्ष निर्मलकुमार सूर्यवंशी, साहित्य परिषदेचे प्रभाकर कानडखेडकर, प्रा. केशव देशमुख, नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष लक्ष्मण संगेवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीसाठी वर्षभर विविध चांगल्या उपक्रमाचे नियोजन शक्य आहे. वाचन प्रेरणा दिन ही एका दिवसाची प्रक्रिया नसून संबंध वर्षेभरात प्रत्येक महिन्यात त्या-त्या संस्थाच्या माध्यमातून उपक्रम हाती घेणे सहज शक्य आहे. आपण लोकांपर्यंत कसे पोहचू याचे नियोजन महत्वाचे असून या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रमांची आपल्याला निश्चिती करता येऊ शकेल, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

शाळा, महाविद्यालयातील युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी अभिवाचन सारखे प्रयोग त्यांच्या पुढे सातत्याने झाले पाहिजेत. यासाठी या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून काही नियोजन करता येते का याचा विचार करू असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड गंगाधर पटने यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी वाचनाचे संस्कार रुजविण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या शैक्षणिक संस्थेमार्फत वेगळे नियोजन करू, असे सांगितले. यावेळी प्रा. केशव देशमुख, निर्मल कुमार सुर्यवंशी यांनी हा महोत्सव अधिक लोकाभिमूख कसा होईल याबाबत सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

00000



 पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली

जिल्हा नियोजन समितीची बैठक   

नांदेड (जिमाका) दि. 3 :- राज्याचे ग्राम विकास, पंचायत राज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज शुक्रवार 4 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अभिजित राऊत जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती नांदेड यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...