Tuesday, December 14, 2021

 सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री

संजय बनसोडे यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

बुधवार 15 डिसेंबर 2021 रोजी सोईनुसार उदगीर येथून मोटारीने देगलूर कडे प्रयाण. सायं. 5 वा लक्ष्मीकांत दिगंबरराव पद्मवार यांच्या 51 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- यशवंतनगर उदगीर रोड देगलूर. सोईनुसार देगलूर येथून मोटारीने लातूर कडे प्रयाण करतील.

00000

 नांदेड जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 503 अहवालापैकी अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 514 एवढी झाली असून यातील 87 हजार 838 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत असून एका बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये अँटिजेन तपासणीद्वारे उमरी तालुक्यात एक बाधित आढळला आहे. आज जिल्ह्यातील 3  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात किनवट तालुक्यातर्गत 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 2 असे एकुण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 21 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 15, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालयात 4 अशा एकुण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 56 हजार 539

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 82 हजार 521

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 514

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 838

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 अनुज्ञप्ती साठी मेडिकल प्रमाणपत्र

ऑनलाईन अपलोड करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी 1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र स्विकारण्यात येत आहेत. अर्जदाराने हस्तलीखीत मेडीकल प्रमाणपत्र घेऊन येऊ नयेत ती ऑनलाईन अपलोड करावीत, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

या अनुज्ञप्तीचे कामकाजासाठी नमुना 1 (अ) मेडिकल प्रमाणपत्र एमबीबीएस डॉक्टरांमार्फत ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सुचना केंद्रामार्फत विकसीत करण्यात आली आहे. अर्जदारांची तपासणी संबंधित डॉक्टरांमार्फत करून नमूना 1 (अ) मेडिकल प्रमाणपत्र अपलोड करण्यात येणार आहे. 

ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र उपलब्ध असलेले डॉक्टर पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. एच. एम. अळने- अक्षय क्लिनिक डॉक्टर लाईन नांदेड, डॉ. मोहम्मद रिझवान- पॉप्युलर हॉस्पिटल ईदगाह कमानी जवळ देगलूर नाका नांदेड, डॉ. अजिंक्य डी पुरी- ओम क्लिनिक वाईबाजार ता. माहूर, डॉ. अब्दुल राफे अब्दुल कादीर- हेल्थ केअर क्लिनिक हाताई नई मशीद नांदेड, डॉ. प्रशांत खंडागळे- अविरत मॅटर्निटी हॉस्पिटल गंगोत्री निवास सरस्वतीनगर मुखेड या डॉक्टरांकडून मेडिकल प्रमाणपत्र करुन घ्यावे. जेणे करुन अर्जदाराला शासनाचे सुविधा देणे शक्य होईल, असेही सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

0000

 जप्त केलेल्या साहित्याचा शुक्रवारी

नांदेड तहसिल कार्यालयात लिलाव 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- नांदेड तालुक्यात गोदावरी नदी परीसरातील पथकामार्फत धाडी टाकून जप्त केलेल्या साहित्यांचा लिलाव शुक्रवार 17 डिसेंबर 2021 रोजी नांदेड तहसिल कार्यालयात सकाळी 11 वा. घेण्यात येणार आहे. 

नांदेड तालुक्यात धाडी टाकून जप्त केलेल्या साहित्यात 3 चेंजर, लोखंडी पाईप 25 नग, लोखंडी टाक्या 34, गुडगुडया  3 यांचा समावेश आहे. सदर साहित्य नांदेड तहसील कार्यालयाच्या परिसरात असून नागरिकांनी हे साहित्य तपासून लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

00000 

विशेष लेख -

राष्ट्र सेवेसह जीवन सुरक्षिततेची  संधी : लसीकरण 

मार्च 2020 पासून कोरोना प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला हादरून सोडले. बऱ्याच जणांचे आप्त स्वकीय कोरोनाने हिरावून घेतले. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. याला आळा घालण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले. लसीचे संशोधन व त्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन हे मोठे आव्हान होते. हे आव्हान स्वीकारून अवघ्या 10 महिन्यात शासनाने लस उपलब्ध करून दिली.

 

 खरे आव्हाण लसीचे संशोधन तर होतेच मात्र याहीपेक्षा नागरिकांनी याची विश्वासाने स्वीकृती करणे अधिक गरजेचे होते. आजही ते आव्हान आहे. नागरिकांच्या मनात या लसीविषयी काही शंकागैरसमज होते. या शंकांचे समाधान करीत शासनाने लसीकरण मोहिम सुरू केली. याच्या प्रसारासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत.

 

लसीकरणाविषयी जागृती

बघता-बघता कोरोनाच्या उद्रेकाने अवघ्या सहा महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकुळ घालायला सुरूवात केली. कोरोनाला आळा घालण्यासाठी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी जेंव्हा भारतात आल्या यावेळी याबद्दल व्यापक जनजागृती करण्यात आली. मनोरंजनपर, माहिती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लस घेवून सुरक्षित राहण्याचे संदेश सगळीकडे प्रसारित करण्यात आले. शासनाच्या वतीने वेळोवेळी सूचना निर्गमीत करण्यात आल्या.

 

प्रशासनातर्फे विशेष मोहिम

कोरोना रोखणे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने तसेच आरोग्य विभागाने शर्तीचे प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यातील लसीकरणाची व्यवस्थापन पाहणाऱ्या डॉ. झिने यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या संपूर्ण टिमने याकाळात अनेक उपक्रम राबविले. नांदेड जिल्हयात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला तो एप्रिल 2020 मध्ये. रुग्ण संख्या वाढू नये यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे रुग्णांची संख्या कमी होती. नांदेड जिल्हा हा 16 तालुक्यांचा. येथे रूग्णसंख्या कमी करणे हे एक मोठे आव्हान होते. यावेळी आरोग्य विभागाने नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उप प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे सक्षमीकरण केले. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांनी अहोरात्र मेहनत करून आपले काम सुरू ठेवले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र अहोरात्र सुरू ठेवण्यावर भर देण्यात आला.

 

नागरिकांची मानसिकता तयार करण्यासाठी सर्वप्रथम आरोग्य विभागाचे लसीकरण

लसीविषयी कुठलीही शंका मनात राहू नये यासाठी सर्वप्रथम आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका अंगणवाडी सेविका यांचे लसीकरण करण्यात आले. लस घेवून डॉक्टर सुरक्षित आहे तर आपण नागरिक म्हणून लस घ्यायला काहीच हरकत नाही आणि लसीमुळे कुठलेच दुष्परिणाम होत नाही. हे नागरिकांना सांगण्यात आले. जिल्हा स्तरावर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. 

 

पहिले व्हॅक्सीन नांदेडला 13 जानेवारी 2021 रोजी आले. या कोरोना लसीचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली 16 जानेवारी 2021 रोजी आपल्या नांदेड जिल्ह्यात करण्यात आला. ही पहिली लस घेण्याचा बहुमान आरोग्य समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांना मिळाला आहे. तेंव्हापासून ते 8 डिसेंबर 2021 अखेर पर्यंत नांदेड जिल्ह्यात 69 टक्के पहिल्या डोसचे लसीकरण तर दुसऱ्या डोसचे 30 टक्क्यांच्यावर लसीकरण झाले आहे.  किनवट व इतर तालुक्यातील आदिवासी बहुल नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करणे हे काम मोठे जिकरीचे होते. पण जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात 9 प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ठेवण्यात आल्या. आदिवासींना लसीविषयी माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाच्या टिमने दिवस-रात्र एक करून नागरिकांच्या समुपदेशावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. या लसीकरणाविषयी  माहिती  देऊन लस किती सुरक्षित आहेयाचे महत्व त्यांना पटवून देण्यात येत आहे.

 

जिल्ह्यातील 16 तालुक्यांसाठी लसीचे व्यवस्थापन

मे महिन्यात आपल्याकडे लसीचा पुरवठा कमी होता. त्यामुळे लातूर येथून व्हॅक्सीन व्हॅनने लस नांदेड जिल्ह्यात पाठविण्यात येत होती. नियोजनाप्रमाणे बुधवारी आणि शनिवारी लस आल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी लसीचा पुरवठा व त्याचे नियोजन केले गेले आहे. सुरूवातीच्या काळात मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी होत होती. दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली पण ज्याचे लसीकरण झाले होते, त्यांच्यावर कोरोनाचा प्रभाव कमी प्रमाणात दिसून आला. त्यामुळे लस किती प्रभावी काम करू शकते याचा प्रत्यय नागरिकांच्या मनात आला. आपणही लस घेऊन सुरक्षित राहू शकतो याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागृत झाला.  

 

हर घर दस्तक

लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाच्यावतीने हर घर दस्तक देत, प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व पटवून दिले जात आहे. नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाचे आव्हान अनेक अर्थाने वेगळे आहे. जिल्ह्यातील एकुण लोकसंख्यापैकी 27 लाख 44 हजार 300 ऐवढे साध्य निश्चित करण्यात आले आहे. यापैकी 18 लाख 65 हजार 946 हे लसीच्या पहिल्या मात्रेसाठी तर दुसऱ्या मात्रेसाठी 8 लाख 13 हजार 854 लाख निर्धारीत केले आहे. दिनांक 8 डिसेंबर पर्यंत ग्रामीण भागात पहिल्या लसीच्या मात्रेचे 71 टक्के तर शहरी भागात 65 टक्के लक्ष साध्य झाले आहे. महानगरपालिका क्षेत्रात 59 टक्के लक्ष साध्य झाले आहे. सर्वसाधारणत: याची एकंदरीत सरासरी 70 टक्के पर्यंत  पोहचली आहे.

 

लसीच्या दुसऱ्या मात्रेची सरासरी 30 टक्के पर्यंत पोहचली आहे. येत्या काही दिवसात हर घर दस्तक या उपक्रमाद्वारे संपूर्ण लक्ष पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागाने निर्धारीत केले आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर हे सर्व संबधित प्रशासकीय यंत्रणा वार्डा-वार्डामध्ये जाऊन प्रयत्नाची शर्त करीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील जनता एक जबाबदार नागरीक म्हणून याला प्रतिसाद देत आहेत, ही समाधानाची बाब आहे.  

 

 -         श्वेता पोटुडे-राऊत,

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड.

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...