Tuesday, December 14, 2021

विशेष लेख -

राष्ट्र सेवेसह जीवन सुरक्षिततेची  संधी : लसीकरण 

मार्च 2020 पासून कोरोना प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला हादरून सोडले. बऱ्याच जणांचे आप्त स्वकीय कोरोनाने हिरावून घेतले. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. याला आळा घालण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले. लसीचे संशोधन व त्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन हे मोठे आव्हान होते. हे आव्हान स्वीकारून अवघ्या 10 महिन्यात शासनाने लस उपलब्ध करून दिली.

 

 खरे आव्हाण लसीचे संशोधन तर होतेच मात्र याहीपेक्षा नागरिकांनी याची विश्वासाने स्वीकृती करणे अधिक गरजेचे होते. आजही ते आव्हान आहे. नागरिकांच्या मनात या लसीविषयी काही शंकागैरसमज होते. या शंकांचे समाधान करीत शासनाने लसीकरण मोहिम सुरू केली. याच्या प्रसारासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत.

 

लसीकरणाविषयी जागृती

बघता-बघता कोरोनाच्या उद्रेकाने अवघ्या सहा महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकुळ घालायला सुरूवात केली. कोरोनाला आळा घालण्यासाठी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी जेंव्हा भारतात आल्या यावेळी याबद्दल व्यापक जनजागृती करण्यात आली. मनोरंजनपर, माहिती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लस घेवून सुरक्षित राहण्याचे संदेश सगळीकडे प्रसारित करण्यात आले. शासनाच्या वतीने वेळोवेळी सूचना निर्गमीत करण्यात आल्या.

 

प्रशासनातर्फे विशेष मोहिम

कोरोना रोखणे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने तसेच आरोग्य विभागाने शर्तीचे प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यातील लसीकरणाची व्यवस्थापन पाहणाऱ्या डॉ. झिने यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या संपूर्ण टिमने याकाळात अनेक उपक्रम राबविले. नांदेड जिल्हयात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला तो एप्रिल 2020 मध्ये. रुग्ण संख्या वाढू नये यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे रुग्णांची संख्या कमी होती. नांदेड जिल्हा हा 16 तालुक्यांचा. येथे रूग्णसंख्या कमी करणे हे एक मोठे आव्हान होते. यावेळी आरोग्य विभागाने नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उप प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे सक्षमीकरण केले. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांनी अहोरात्र मेहनत करून आपले काम सुरू ठेवले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र अहोरात्र सुरू ठेवण्यावर भर देण्यात आला.

 

नागरिकांची मानसिकता तयार करण्यासाठी सर्वप्रथम आरोग्य विभागाचे लसीकरण

लसीविषयी कुठलीही शंका मनात राहू नये यासाठी सर्वप्रथम आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका अंगणवाडी सेविका यांचे लसीकरण करण्यात आले. लस घेवून डॉक्टर सुरक्षित आहे तर आपण नागरिक म्हणून लस घ्यायला काहीच हरकत नाही आणि लसीमुळे कुठलेच दुष्परिणाम होत नाही. हे नागरिकांना सांगण्यात आले. जिल्हा स्तरावर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. 

 

पहिले व्हॅक्सीन नांदेडला 13 जानेवारी 2021 रोजी आले. या कोरोना लसीचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली 16 जानेवारी 2021 रोजी आपल्या नांदेड जिल्ह्यात करण्यात आला. ही पहिली लस घेण्याचा बहुमान आरोग्य समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांना मिळाला आहे. तेंव्हापासून ते 8 डिसेंबर 2021 अखेर पर्यंत नांदेड जिल्ह्यात 69 टक्के पहिल्या डोसचे लसीकरण तर दुसऱ्या डोसचे 30 टक्क्यांच्यावर लसीकरण झाले आहे.  किनवट व इतर तालुक्यातील आदिवासी बहुल नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करणे हे काम मोठे जिकरीचे होते. पण जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात 9 प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ठेवण्यात आल्या. आदिवासींना लसीविषयी माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाच्या टिमने दिवस-रात्र एक करून नागरिकांच्या समुपदेशावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. या लसीकरणाविषयी  माहिती  देऊन लस किती सुरक्षित आहेयाचे महत्व त्यांना पटवून देण्यात येत आहे.

 

जिल्ह्यातील 16 तालुक्यांसाठी लसीचे व्यवस्थापन

मे महिन्यात आपल्याकडे लसीचा पुरवठा कमी होता. त्यामुळे लातूर येथून व्हॅक्सीन व्हॅनने लस नांदेड जिल्ह्यात पाठविण्यात येत होती. नियोजनाप्रमाणे बुधवारी आणि शनिवारी लस आल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी लसीचा पुरवठा व त्याचे नियोजन केले गेले आहे. सुरूवातीच्या काळात मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी होत होती. दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली पण ज्याचे लसीकरण झाले होते, त्यांच्यावर कोरोनाचा प्रभाव कमी प्रमाणात दिसून आला. त्यामुळे लस किती प्रभावी काम करू शकते याचा प्रत्यय नागरिकांच्या मनात आला. आपणही लस घेऊन सुरक्षित राहू शकतो याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागृत झाला.  

 

हर घर दस्तक

लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाच्यावतीने हर घर दस्तक देत, प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व पटवून दिले जात आहे. नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाचे आव्हान अनेक अर्थाने वेगळे आहे. जिल्ह्यातील एकुण लोकसंख्यापैकी 27 लाख 44 हजार 300 ऐवढे साध्य निश्चित करण्यात आले आहे. यापैकी 18 लाख 65 हजार 946 हे लसीच्या पहिल्या मात्रेसाठी तर दुसऱ्या मात्रेसाठी 8 लाख 13 हजार 854 लाख निर्धारीत केले आहे. दिनांक 8 डिसेंबर पर्यंत ग्रामीण भागात पहिल्या लसीच्या मात्रेचे 71 टक्के तर शहरी भागात 65 टक्के लक्ष साध्य झाले आहे. महानगरपालिका क्षेत्रात 59 टक्के लक्ष साध्य झाले आहे. सर्वसाधारणत: याची एकंदरीत सरासरी 70 टक्के पर्यंत  पोहचली आहे.

 

लसीच्या दुसऱ्या मात्रेची सरासरी 30 टक्के पर्यंत पोहचली आहे. येत्या काही दिवसात हर घर दस्तक या उपक्रमाद्वारे संपूर्ण लक्ष पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागाने निर्धारीत केले आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर हे सर्व संबधित प्रशासकीय यंत्रणा वार्डा-वार्डामध्ये जाऊन प्रयत्नाची शर्त करीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील जनता एक जबाबदार नागरीक म्हणून याला प्रतिसाद देत आहेत, ही समाधानाची बाब आहे.  

 

 -         श्वेता पोटुडे-राऊत,

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड.

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...