Thursday, March 2, 2023

वृत्त क्रमांक 102

 नायब तहसिलदार यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्‍हणून अधिकार 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्‍ह्यातील अवैध गौण खनिज वाहतूक / साठा यांच्यावर निर्बंधासाठी आणि माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शालांत परिक्षा-2023 अनुषंगाने कॉपी करण्‍यावर आळा घालण्‍यासाठी या दोन्‍ही विषयांकरीता नांदेड जिल्‍ह्यातील सर्व नायब तहसिलदार यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार देण्यात आले आहेत.  

 

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये अधिकाराचा वापर करून नांदेड जिल्‍ह्यातील नायब तहसिलदार यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्‍हणून अधिकार प्रदान करण्‍याकरीता नांदेड जिल्ह्यातील या आदेशासोबत संलग्न केलेल्या यादीप्रमाणे 59 नायब तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांना 2 मार्च 2023 रोजीच्या सायं. 6 वाजल्यापासून ते 31 मार्च 2023 रोजी पर्यंतच्या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. तसेच नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना उक्त संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खाली शक्ती प्रदान करण्‍यात येत आहे. हा आदेश दिनांक 2 मार्च, 2023 रोजी निर्गमीत करण्यात आला आहे.

000000

वृत्त क्रमांक 101

आर्थिक निर्भरता यातच महिलांच्या सुरक्षिततेचा मार्ग 

- वर्षा ठाकूर-घुगे

▪️नांदेड जिल्हा कृषी महोत्सवात कृषि क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा गौरव
▪️आरोग्यासह सेंद्रिय शेतीतून प्रगतीवर संवाद
नांदेड, (जिमाका) दि. 2 :- महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात तिची आर्थिक निर्भरता व स्वालंबन हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकवेळी समोर येतो. जिच्यामुळे शेतीचा शोध लागला, जिच्या योगदानातून शेती फुलवली जाते त्या शेती असलेल्या ग्रामीण भागातील महिलांना अधिक सुरक्षित जर करायचे असेल तर आर्थिक निर्भरता ही अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी शेती व शेतीपूरक उद्योगात दडलेल्या रोजगाराच्या संधी महिलांच्या हाती असणे आवश्यक आहे. यातूनच आर्थिक निर्भरता व आत्मनिर्भरता महिलांना मिळेल. महिलांनो आपले संघटन करा व आपल्या परिसरात जी काही संसाधने आहेत त्यावर आधारीत उद्योगासाठी पुढे या, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
नांदेड जिल्हा कृषि महोत्सवानिमित्त आज दुसऱ्या दिवशी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय परसबाग लागवड स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी वृक्षमित्र फाउंडेशन संतोष मुगटकर, डॉ. मानशी पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, आत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, माविमचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड आदी उपस्थित होते.
माविम व वृक्षमित्र फाउंडेशन आयोजित सेंद्रीय परसबाग लागवड उपक्रमातील विजेत्या स्पर्धकांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तुप्पा नांदेड येथील सिंधुताई सुर्यकांत भालेराव यांना प्रथम पारितोषिक, घोटी किनवट येथील मंजुषा वाडगुरे यांना द्वितीय पारितोषिक तर वाई माहुर येथील स्वाती खराटे यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. अनुक्रमे रोख 7 हजार, 5 हजार व 2 हजार रक्कम मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप वृक्षमित्र फाउंडेशनने दिले आहे.
स्त्रियांची ताकद एक झाली तर येणाऱ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व महिलाच करतील. ही क्रांती शेतीपुरक उद्योगातील बचतगटांच्या चळवळीतून पुढे येईल. महिलांनो आपल्या आरोग्यासाठी एक व्हा. संघटित व्हा व कृषि आधारित उद्योगासाठी पुढे या असे आवाहन यावेळी पुणे येथील सेंद्रीय शेती तज्ज्ञ डॉ. मानसी पाटील यांनी केले. सेंद्रीय शेती प्रमाणिकरण यावर त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. बचतगटाची ताकद खूप मोठी आहे. ही चळवळ एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करते. उद्योजक होण्यासाठी धीटपणा देते. रोजगार निर्मितीसह आर्थिक प्रगती देते. यासाठी सकारात्मक दृष्टिकोण ठेऊन महिलांनो पुढे या असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील समाजशास्त्र विभागाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे यांनी केले.
वाडी-वस्ती-तांड्यावर जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायत, पोहचलेली आहे. प्रत्येक भागातील महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गावपातळीवर आमच्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकेपासून सर्व अधिकारी, कर्मचारी उदात दृष्टिकोण ठेऊन प्रयत्नशील आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणू असे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी सांगितले.
000000


























वृत्त क्रमांक 100

 महिलांसाठी पौष्टिक तृणधान्य

पाककला स्पर्धेचे शनिवारी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने नवा मोंढा, नांदेड येथील मैदानावर 1 ते 5 मार्च दरम्यान जिल्हा कृषि महोत्सव सुरू आहे. सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शनिवार 4 मार्च 2023 रोजी पौष्टीक तृणधान्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांची पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी, बचत गटातील व सर्वसामान्य महिला यांनी या तृणधान्य पाककला स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी, बचतगटातील महिला तसेच सर्वसामान्य महिला यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी नवामोंढा, नांदेड येथील मैदानावर सुरू असलेल्या नांदेड जिल्हा कृषि महोत्सवातील नोंदणी कक्षात 4 मार्च 2023 सकाळी 11 वाजेपर्यंत स्पर्धकांनी नोंदणी करावी. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमीत्त ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा,राजगिरा इ. पौष्टिक तृणधान्या पासून बिस्कीट, लाडू, पापड, चिक्की, थालीपीठ, धपाटे,खिचडी, खीर, पराटे,चकल्या, बेकरी पदार्थ इ. असे विविध पदार्थ बनवून आणावेत. सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक स्वरूपात प्रमाणपत्र, भेट वस्तू देवून गौरविण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

0000

वृत्त क्रमांक 99

 प्रगतशील शेतकरी, महिला बचतगटासह

उत्पादक कंपन्यांचा होणार सत्कार

 

शेतकरी सन्मान दिवसाचे शुक्रवारी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाचे अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त व आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष 2023 चे औचित्‍य साधून 1 ते 5 मार्च 2023 या कालावधी नांदेड जिल्‍हा कृषि महोत्‍सवाचे आयोजन कृषि विभाग, आत्‍मा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे संयुक्‍त विद्यमाने, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे करण्‍यात आले आहे. या महोत्‍सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. शुक्रवार 3 मार्च 2023 रोजी शेतकरी सन्‍मान दिवस साजरा करण्‍यात येणार आहे.

 

या दिवशी जिल्‍हयातील 16 प्रगतशील शेतकऱ्यांचा सपत्‍नीक सन्‍मान व जिल्‍हयातील 16 महिला बचत गट व 5 शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांचा सत्‍कार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे हस्‍ते करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...