Monday, July 22, 2024

 वृत्त क्र. 622

आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया
मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत
 
नांदेड, दि. 22 जुलै :- आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात 50 टक्के ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थींनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाने सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा 8 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानीत अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानीत (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानीत महाविद्यालये,तंत्र निकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभीमत विद्यापीठे (खाजगी अभीमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहायीत विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठे अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायीक अभ्यासक्रमास, शासनाच्या सक्षम प्राधिकारामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रकियेद्वारे (Centralized Admission Process - CAP ) (व्यवस्थापन कोटयातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थीकदृष्टया दुर्बल घटकातील (EWS), इतर मागास प्रवर्गातील (OBC), सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास प्रवर्गातील (SEBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 100 टक्के सवलत देण्यात आलेली आहे. उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या (नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली) विद्यापीठ/महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक, उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
00000

  वृत्त क्र. 621

 वृत्त क्र. 620 

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  19.40  मि.मी. पाऊस

 

नांदेड दि. 22 जुलै :- जिल्ह्यात सोमवार 22  जुलै रोजी सकाळी  संपलेल्या गत 24 तासात सरासरी  19.40  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 361.80  मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

जिल्ह्यात सोमवार 22 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 15.40 (336.20), बिलोली-16.60 (408.70), मुखेड- 39.50(408.40), कंधार-24.10 (381), लोहा-21.70 (366), हदगाव-9.90 (284.80), भोकर-14.10 (312.90), देगलूर-42.70 (321.60), किनवट-13.20(462.20), मुदखेड- 20.40 (379.90), हिमायतनगर-12.20 (331.40), माहूर- 2.10 (349.20), धर्माबाद- 12.20 (429.30), उमरी- 10.90 (301.70), अर्धापूर- 16.80 (401), नायगाव-16.40 (257.70) मिलीमीटर आहे.

0000

 वृत्त क्र. 619

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

·    या आर्थिक वर्षासाठी 628 शेततळयाचा लक्षांक प्राप्त

नांदेडदि. 22 जुलै :- राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत 29 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज पुढील तपशिलाप्रमाणे करावा. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतूसुविधा केंद्रगावातील कृषि सहाय्यकतालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

लाभार्थी पात्रता

अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी निवड

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडती नुसार लाभ देण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची पध्दत

महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

शेततळयासाठी आकारमान

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयासाठी कमाल मर्यादा रुपये 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. शेततळयाच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम निश्चीत करण्यात आली आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम 75 हजार रुपये इतकी राहील. रक्कम 75 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबधित लाभार्थ्याने स्वत: करणे अनिवार्य राहील. जिल्ह्यात आजपर्यत सन 2024-25  या आर्थिक वर्षात अनुसूचित जातीसाठी 61 अनुसूचित जमातीसाठी 39 व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 528 असे एकूण 628 शेततळयाचा लक्षांक प्राप्त झाला असून आर्थिक लक्षांक 418 कोटी 66 लाख रुपये इतका आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  या योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...