Tuesday, February 9, 2021

 लेख :

लोकराज्य अंकासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मुलाखत

विद्यार्थी हितासाठी…


विद्यार्थी केंद्रबिंदु मानून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत.कोरोनाच्या या जागतिक संकटाशी लढताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रिया राबविणे मोठे आव्हान होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी हितासाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार परिक्षेचे नियोजन करून राज्यातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन, ऑफलाईन, मिश्रपध्दतीने सुरळीतपणे परीक्षा पारपाडण्यात आल्या. या परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली गेली. आणि ही सर्व प्रक्रिया सुरक्षित पार पाडण्यात आली.

अध्यापकांच्या व्यावसायिक क्षमतेची वृध्दी सुधारणेसाठी आणि प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेची (महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अँकेडमी) स्थापना करण्यात आली. या संस्थेसाठी ६० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यात पारंपारिक प्रशिक्षण पध्दतीमध्ये सुधारणा करुन शैक्षणिकदृष्टया प्रगत देशांमधील व इतर राज्यातील शैक्षणिक पध्दतीचा अभ्यास करुन अद्यावत तंत्रज्ञानाधिष्ठीत व रोजगाराभिमुख कौशल्याधारित प्रशिक्षण अध्यापकांना देण्यात येणार आहे.

संतपरंपरा आणि वारकरी सांप्रदायाचे संस्कार पुढील पिढयांना मिळण्याकरीता पैठण येथे संतपीठ सुरू करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत संतपीठ कार्यान्वित करण्यासाठी 1 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आाहेत. या संतपीठात पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु करण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्र –कर्नाटक सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून किमान उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी काही निवडक अभ्यासक्रम ऑनलाईन सुरु करण्यात येणार आहेत.

नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातले पहिले संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाच्या सेवांमध्ये मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग येथे भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येत आहेत. सर जे.जे. कला महाविद्यालय, सर जे. जे. वास्तुविशारद महाविद्यालय व सर जे. जे. उपयोजित कला या तिन्ही महाविद्यालयांचे अभिमत विद्यापीठ करण्यात येत आहे.

शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असून गोंडवाना विद्यापीठात डेटा सेंटर उभारणी करण्यात येत आहे. दुर्गम आणि आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण सहज उपलब्ध व्हावे यासाठी नवीन सॅटेलाईट केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षापासून नवीन सॅटेलाईट केंद्र मंजुरीसाठी कार्यपद्धती व निकष जाहीर सुध्दा करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुचविल्याप्रमाणे Online व Open Distance Learning (ODL) पध्दतीचा वापर वाढणवण्यासाठी सॅटेलाईट केंद्राचा उपयोग व्हावा म्हणून आवश्यक माहिती तंत्रज्ञान व्यवस्था सॅटेलाईट केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुने विद्यापीठ असून या विद्यापीठाला 163 वर्षाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. हावर्ड विद्यापीठ तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसचा वर्ल्ड क्लास हेरिटेज सेंटर बनवण्याचा आमचा मानस असून मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पसचा वारसा संवर्धनासाठी 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत म्हणून या प्रवेश पात्रतेच्या गुणांमध्ये 5 टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यात खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के ऐवजी आता 45 टक्के, मागासप्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांगांसाठी 45 टक्के ऐवजी आता 40 टक्के गुणांची प्रवेश पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता 5 टक्के आणि कमाल 5 जागांची अट रद्द करुन एकुण प्रवेश क्षमतेच्या 5 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परिक्षा कक्षांनी विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा प्रक्रिया यशस्वी पार पाडली. यामध्ये अतिवृष्टी, पुरपरिस्थिती व कोविडमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांकरिता परिक्षेची पुन्हा संधी उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच अंतिम वर्षाव्यतिरिक्त इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्या सत्रातील कामगिरी आणि अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे प्रवेश देण्यात आला. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, गुणवत्ता वाढविणे व बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मध्ये सुधारणा करण्यासाठी कार्यबल गटाची स्थापना करण्यात आली आहे.

मराठी भाषा संवर्धनासाठी कविवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रवुारी, हा जन्मदिन सर्व महाविद्यालयांमध्ये “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात आला. तसेच सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, सर्व स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठे, सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये, परीसंस्था तसेच तंत्र शिक्षण संचालनालयाच्या व कला संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये लावण्यात येणारे नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राष्ट्रीय भावना जोपासण्यासाठी महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्ययन वर्ग सुरु होण्यापूर्वी आणि महाविद्यालयातील कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीतीने करावी असे बंधनकारक करण्यात आले आहे. दोहा (कतार) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून शैक्षणिक केंद्र सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भात कतार शासनाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण उपलब्ध होणार आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये कोरोना तपासणीसाठी प्रयोग शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या शकांचे निरसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणमंडळाने विभागीय संचालक कार्यालायानुसार हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. तसेच तंत्र शिक्षण, कृषी अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठीचे केंद्र बदलण्याची मुभा प्रवेश नियमन प्राधिकरणाने दिली त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ परीक्षा केंद्र मिळण्यास मदत झाली.

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची साहित्यसंपदा एका ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र मुंबई विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. या अध्यासन केंद्राचा फायदा विद्यापीठातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना होत असून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सुध्दा मोठी मदत होणार आहे. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त मुंबई विद्यापीठामध्ये त्यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना टिळकांच्या जीवनाबद्दल माहिती आणि दुर्मिळ साहित्य उपलब्ध होत आहे.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सहाय्यक अनुदानासाठी सन 2020-21 या आर्थिक वर्षात रु. 123 कोटी 75 हजार इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.तर सन 2019-20 या आर्थिक वर्षातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या देय थकीत अनुदानासाठी रु. 30 कोटी , 93 लाख , 75 हजार इतका निधी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वितरीत व खर्च करण्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालययांना मान्यता देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांचे समग्र साहित्य ग्रंथरूपाने सर्वसामान्यांसमोर आणण्यासाठी दोन स्वतंत्र चरित्र साधने प्रकाशन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांची चरित्रे लिहिणाऱ्या अभ्यासकांची समिती गठीत करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांचे समग्र वाङमय प्रसिद्ध करून , त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आदि भाषांमध्ये भाषांतर करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या माध्यमातून अप्रकाशित साहित्याचे संकलन व संपादन करण्यात येणार आहे.

विद्यापिठातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 7 वा वेतनआयोग लागू करवा अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. यामध्ये जी पदे न्यायप्रविष्ठ आहेत ती वगळून उर्वरित पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्या रिकाम्या जागेवरील अतिक्रमण हटवून 30 वर्षे पूर्ण झालेली महाविद्यालये आणि वसतीगृहे यांच्या इमारतींचे संरचनात्मक लेखा परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात येत आहे.तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे नवीन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शिक्षकीय पदे निर्मिती मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावरही अभ्यास करण्यासाठी कार्यबल गटाची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल असे शैक्षणिक धोरण निश्चित करण्यात येईल. महाराष्ट्र शैक्षणिक दृष्टया सुदृढ व्हावा आणि विद्यार्थी हित जोपासले जावे यासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

शब्दांकन काशीबाई थोरात- धायगुडे
000000

27 कोरोना बाधितांची भर तर 30 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 9:- मंगळवार 9 फेब्रुवारी  2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 27  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 30 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 406 अहवालापैकी 374 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 700 एवढी झाली असून यातील 21 हजार 664 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 239 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 589 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 11, कंधार तालुक्यांतर्गत 04, किनवट कोविड रुग्णालय 02, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, माहूर तालुक्यातर्गंत 1, बिलोली तालुक्यातर्गंत 02, खाजगी रुग्णालय 3  असे एकूण 30 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.43 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 11, किनवट तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, यवतमाळ 1 असे एकुण 14 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 3, किनवट तालुक्यात 5,तेलगंणा 1,बिलोली 1 तालुक्यात 1,मुखेड 3 असे एकूण 13 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 239 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 2, मुखेड कोविड रुग्णालय 3, किनवट कोविड रुग्णालय 1, महसूल कोविड केअर सेंटर 03, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड  मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 154,  नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गंत गृह विलगीकरण 40, हैद्राबाद येथे संदर्भित 1नांदेड खाजगी रुग्णालय 7 आहेत.   

मंगळवार 9 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 172, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 94 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 15 हजार 167

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 88 हजार 92

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 700

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 664

एकुण मृत्यू संख्या-589

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 94.43 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00 

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-239

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-08          

00000

 

 

नवी तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 9:- नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, नवा मोंढा नांदेड येथे दु.क्र. 02462-284291 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नांदेड  यांनी  केले आहे. सन 2021-22 मध्ये समुहाने मनरेगा योजनेअंतर्गंत तसेच वैयक्तीक नवीन तुती लागवड करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महा-रेशीम अभियान 2021 ‍हे 25 जानेवारी पासून 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत राबविण्यात येत आहे.

0000

 

उच्च शिक्षण विभागाचा

उच्च व तंत्र शिक्षण विभाग @ उपक्रम

नांदेड, (जिमाका) दि. 9:- विद्यार्थी पालक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थेच्या अडी-अडचणीवर चर्चा करुन त्या सोडविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने उच्च व तंत्र शिक्षण विभाग @ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, पुणे येथील संचालक (उच्च शिक्षण ) आदी मान्यवर शनिवार 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थी पालक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्था यांच्या अडचणी व उच्च शिक्षणाच्या विकासाविषयक सूचना असतील त्या jdhe.nanded-mh@gov.in या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. नलिनी टेंभेकर यांनी केले आहे.  

0000

 

सीसीटीव्ही क्षेत्रात उपलब्ध प्रशिक्षण व

व्यावसायिक संधीविषयी ऑनलाईन वेबिनार

नांदेड, (जिमाका) दि. 9:- जिल्ह्यातील तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेडच्यावतीने आणि एम्पॉवर प्रगती व्होकेशनल अँड स्टाफइंग प्रा. ली.च्या प्रधानमंत्री कौशल केंद्र यांच्या सहाय्याने आयोजित सीसीटीव्ही क्षेत्रात उपलब्ध प्रशिक्षण आणि व्यावसायिक संधी बद्दल ऑनलाईन वेबिनार बुधवार 10 फेब्रुवारी 2021  रोजी सायं. 4 वा. सादर होणार आहे. या वेबिनारमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार व प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे केंद्र प्रमुख विजय पुरोहित यांनी केले आहे. 

ऑनलाईन वेबिनार हे ZOOM या आप्लिकेशनद्वारे आमेर अली खान पठाण प्रशिक्षक प्रधानमंत्री कौशल्य केंद्र नांदेड  यांच्या द्वारे घेण्यात येणार आहे. व्यवसायात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पुरुष व महिलांना या वेबिनारमध्ये सहभाग घेता येईल. अधिक माहितीसाठी ८२७५१९६४२१ या भ्रमणध्वनी वर "CCTV Webinar" लिहून Whatsapp वर संदेश पाठवावा. इच्छुक सहभाग घेणाऱ्याना वेबिनारची झूम लिंक पाठवण्यात येईल ज्याद्वारे वेबिनारमध्ये सहभाग घेऊ शकतील.

0000 

 

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान,

बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 9:- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेंतर्गत 20 लाभार्थी व बीजभांडवल योजनेंतर्गत 16 लाभार्थ्यांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज 1ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर तळमजला, कामठा रोड, नांदेड येथे स्विकारले जातील. 

या दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत पुढील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपसिथत राहून दाखल करावीत. त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसिलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, बिजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स परवाना बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. अनुदान न घेतल्याबाबत शंभर रुपयाच्या बॉडवर प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे. 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एच. डी. गतखणे यांनी केले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...