Tuesday, February 9, 2021

 लेख :

लोकराज्य अंकासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मुलाखत

विद्यार्थी हितासाठी…


विद्यार्थी केंद्रबिंदु मानून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत.कोरोनाच्या या जागतिक संकटाशी लढताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रिया राबविणे मोठे आव्हान होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी हितासाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार परिक्षेचे नियोजन करून राज्यातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन, ऑफलाईन, मिश्रपध्दतीने सुरळीतपणे परीक्षा पारपाडण्यात आल्या. या परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली गेली. आणि ही सर्व प्रक्रिया सुरक्षित पार पाडण्यात आली.

अध्यापकांच्या व्यावसायिक क्षमतेची वृध्दी सुधारणेसाठी आणि प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेची (महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अँकेडमी) स्थापना करण्यात आली. या संस्थेसाठी ६० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यात पारंपारिक प्रशिक्षण पध्दतीमध्ये सुधारणा करुन शैक्षणिकदृष्टया प्रगत देशांमधील व इतर राज्यातील शैक्षणिक पध्दतीचा अभ्यास करुन अद्यावत तंत्रज्ञानाधिष्ठीत व रोजगाराभिमुख कौशल्याधारित प्रशिक्षण अध्यापकांना देण्यात येणार आहे.

संतपरंपरा आणि वारकरी सांप्रदायाचे संस्कार पुढील पिढयांना मिळण्याकरीता पैठण येथे संतपीठ सुरू करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत संतपीठ कार्यान्वित करण्यासाठी 1 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आाहेत. या संतपीठात पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु करण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्र –कर्नाटक सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून किमान उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी काही निवडक अभ्यासक्रम ऑनलाईन सुरु करण्यात येणार आहेत.

नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातले पहिले संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाच्या सेवांमध्ये मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग येथे भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येत आहेत. सर जे.जे. कला महाविद्यालय, सर जे. जे. वास्तुविशारद महाविद्यालय व सर जे. जे. उपयोजित कला या तिन्ही महाविद्यालयांचे अभिमत विद्यापीठ करण्यात येत आहे.

शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असून गोंडवाना विद्यापीठात डेटा सेंटर उभारणी करण्यात येत आहे. दुर्गम आणि आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण सहज उपलब्ध व्हावे यासाठी नवीन सॅटेलाईट केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षापासून नवीन सॅटेलाईट केंद्र मंजुरीसाठी कार्यपद्धती व निकष जाहीर सुध्दा करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुचविल्याप्रमाणे Online व Open Distance Learning (ODL) पध्दतीचा वापर वाढणवण्यासाठी सॅटेलाईट केंद्राचा उपयोग व्हावा म्हणून आवश्यक माहिती तंत्रज्ञान व्यवस्था सॅटेलाईट केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुने विद्यापीठ असून या विद्यापीठाला 163 वर्षाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. हावर्ड विद्यापीठ तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसचा वर्ल्ड क्लास हेरिटेज सेंटर बनवण्याचा आमचा मानस असून मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पसचा वारसा संवर्धनासाठी 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत म्हणून या प्रवेश पात्रतेच्या गुणांमध्ये 5 टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यात खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के ऐवजी आता 45 टक्के, मागासप्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांगांसाठी 45 टक्के ऐवजी आता 40 टक्के गुणांची प्रवेश पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता 5 टक्के आणि कमाल 5 जागांची अट रद्द करुन एकुण प्रवेश क्षमतेच्या 5 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परिक्षा कक्षांनी विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा प्रक्रिया यशस्वी पार पाडली. यामध्ये अतिवृष्टी, पुरपरिस्थिती व कोविडमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांकरिता परिक्षेची पुन्हा संधी उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच अंतिम वर्षाव्यतिरिक्त इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्या सत्रातील कामगिरी आणि अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे प्रवेश देण्यात आला. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, गुणवत्ता वाढविणे व बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मध्ये सुधारणा करण्यासाठी कार्यबल गटाची स्थापना करण्यात आली आहे.

मराठी भाषा संवर्धनासाठी कविवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रवुारी, हा जन्मदिन सर्व महाविद्यालयांमध्ये “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात आला. तसेच सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, सर्व स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठे, सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये, परीसंस्था तसेच तंत्र शिक्षण संचालनालयाच्या व कला संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये लावण्यात येणारे नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राष्ट्रीय भावना जोपासण्यासाठी महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्ययन वर्ग सुरु होण्यापूर्वी आणि महाविद्यालयातील कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीतीने करावी असे बंधनकारक करण्यात आले आहे. दोहा (कतार) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून शैक्षणिक केंद्र सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भात कतार शासनाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण उपलब्ध होणार आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये कोरोना तपासणीसाठी प्रयोग शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या शकांचे निरसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणमंडळाने विभागीय संचालक कार्यालायानुसार हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. तसेच तंत्र शिक्षण, कृषी अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठीचे केंद्र बदलण्याची मुभा प्रवेश नियमन प्राधिकरणाने दिली त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ परीक्षा केंद्र मिळण्यास मदत झाली.

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची साहित्यसंपदा एका ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र मुंबई विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. या अध्यासन केंद्राचा फायदा विद्यापीठातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना होत असून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सुध्दा मोठी मदत होणार आहे. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त मुंबई विद्यापीठामध्ये त्यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना टिळकांच्या जीवनाबद्दल माहिती आणि दुर्मिळ साहित्य उपलब्ध होत आहे.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सहाय्यक अनुदानासाठी सन 2020-21 या आर्थिक वर्षात रु. 123 कोटी 75 हजार इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.तर सन 2019-20 या आर्थिक वर्षातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या देय थकीत अनुदानासाठी रु. 30 कोटी , 93 लाख , 75 हजार इतका निधी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वितरीत व खर्च करण्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालययांना मान्यता देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांचे समग्र साहित्य ग्रंथरूपाने सर्वसामान्यांसमोर आणण्यासाठी दोन स्वतंत्र चरित्र साधने प्रकाशन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांची चरित्रे लिहिणाऱ्या अभ्यासकांची समिती गठीत करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांचे समग्र वाङमय प्रसिद्ध करून , त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आदि भाषांमध्ये भाषांतर करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या माध्यमातून अप्रकाशित साहित्याचे संकलन व संपादन करण्यात येणार आहे.

विद्यापिठातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 7 वा वेतनआयोग लागू करवा अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. यामध्ये जी पदे न्यायप्रविष्ठ आहेत ती वगळून उर्वरित पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्या रिकाम्या जागेवरील अतिक्रमण हटवून 30 वर्षे पूर्ण झालेली महाविद्यालये आणि वसतीगृहे यांच्या इमारतींचे संरचनात्मक लेखा परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात येत आहे.तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे नवीन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शिक्षकीय पदे निर्मिती मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावरही अभ्यास करण्यासाठी कार्यबल गटाची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल असे शैक्षणिक धोरण निश्चित करण्यात येईल. महाराष्ट्र शैक्षणिक दृष्टया सुदृढ व्हावा आणि विद्यार्थी हित जोपासले जावे यासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

शब्दांकन काशीबाई थोरात- धायगुडे
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...