Tuesday, February 4, 2025

 वृत्त क्र. 147

नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

 अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी 

नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजी नगर येथे वस्तू व सेवा कर सहआयुक्त पदावर बदली झाली आहे.

मंगळवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदली जाहीर केल्या. यामध्ये सन 2015 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असणारे राहुल कर्डिले यांची नांदेड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी यापूर्वी अमरावती सहाय्यक जिल्हाधिकारी ,परभणी सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,वर्धा जिल्हाधिकारी आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आदी विविध पदे भूषविली आहेत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची सह आयुक्त वस्तू व सेवा कर छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत गेल्या अडीच वर्षापासून नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर होते. 30 सप्टेंबर 2022 रोजी ते नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर रुजू झाले होते.विविध जन उपयोगी उपक्रम ,सामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवणारे अधिकारी, उत्कृष्ट प्रशासक म्हणून अभिजीत राऊत यांची कारकीर्द कायम स्मरणात राहणारी आहे.

00000




  वृत्त क्र. 146

दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू 

तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्त   

नांदेड दि. 4 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.  लातूर विभागीय मंडळस्तरावर 10 वी साठी 02382-251633 तर  12 वी साठी 02382-251733 हा हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.  

या हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले नावे व भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहेत. कुंभार ए.आर (सहाय्यक सचिव)  मो.नं. 9405077991, उच्च माध्यमिक बारावीसाठी कारसेकर जे. एस. (व.अ.) मो.नं. 9822823780, डाळींबे एम.यु. (प.लि.) मो.नं. 9423777789, जानकर एच.एस. (व.लि.) मो.नं. 9764409318 आहेत.  

माध्यमिक (दहावी) साठी जेवळीकर सी. व्ही. (व.अ.) मो.नं. 9420436482, घटे एस.एच. (प.लि.) मो.नं. 9405486455, सुर्यवंशी ए. एल. (क.लि.) मो.नं. 7620166354 हे भ्रमणध्वनी क्रमांक असतील. विद्यार्थी, पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत साधावा.  

भयमुक्त-तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्ती

माध्यमिक व उच्च माध्यमिक प्र. परीक्षा फेब्रु- मार्च 2025 या भयमुक्त व तणावमुक्त होवून परीक्षेस सामोरे जाणे आवश्यक आहे. यासंदर्भात विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पुढीलप्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल. नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशकाचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. कच्छवे बी.एम. 9371261500, कारखेडे बी.एम. 9860912898, सोळंके पी.जी. 9860286857, पाटील बी. एच. 9767722071 असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे  लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 145

दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक  स्पर्धेचे उद्घाटन संपन्न 

नांदेड दि. 4 फेब्रुवारी :- समाज कल्याण विभाग व नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने कुसुम सभागृहात आज दि.4 फेब्रुवारीला दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय सांस्कृतिक  स्पर्धेचे उद्घाटन झाले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज होत्या. यावेळी जिल्हा समाज  कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार ओम प्रकाश गिल्डा, डॉ.अजय मालपाणी, बापू दासरी आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील एकूण 55 शाळांनी सहभाग नोंदवला पारंपारिक लोककला,नृत्य,गायन या सह विविध कला गुणांचे अविष्कार विद्यार्थ्यांनी  सादर केले

0000













वृत्त क्र. 144

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

 १५ फेबुवारी शेवटची तारीख 

नांदेड, दि. ४ फेब्रुवारी : सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी शासनाने विविध पुरस्कार जाहीर केले आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारी शेवटची तारीख असून तत्पूर्वी अर्ज दाखल करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रवीण पुरस्कार असे पुरस्कार दिले जातात. सध्या 2023-24 या आर्थिक वर्षात देणार येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा शासनाने केली असून यासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी गणना केली जाणार आहे. त्यामुळे एक जानेवारी 23 ते 31 डिसेंबर 23 या काळात केलेल्या कार्यकाळाची माहिती आपल्या अर्जामध्ये असावी.

अर्जाचा नमुना समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्याकडे तसेच शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पुरस्काराचे प्रस्ताव शनिवार, रविवार व कार्यालयातील सुट्टीच्या दिवशीही स्वीकारण्यात येतील, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागातील एस सी पाटील ( 87669 O5865 )यांच्याशी संपर्क साधावा.

0000

  वृत्त क्र. 143

खासगी पशुसेवकांना नोंदणी करणे बंधनकारक 

नांदेड दि. ४ फेब्रुवारी : जिल्हात प्रजनन क्षम पशुंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा व अन्य सुविधा पुरविणाऱ्या सर्व खाजगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी,असे आदेश  सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी जारी केले आहे.त्यामुळे सर्व खाजगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात प्रजनन क्षम पशूंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम रेतन करणारे खाजगी पशु सेवक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी कृत्रिम रेतन सेवा पुरविणाऱ्या तंत्रज्ञ, गोठीत रेत मात्रा वितरक व रेत बँकांनी पशुसंवर्धन उपायुक्त किंवा गोजातीय प्राधिकरण यांच्याकडे नाव नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे आदेश काढण्यात आले आहे.

कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणून नोंदणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यक परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी, भारत सरकारच्या मैत्री भारतातील बहुउपयोगी कृत्रिम रेतनचे प्रशिक्षण घेतलेले असावे. तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण, आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव आहे. किंवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पशुसखी अशा पात्र खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञानांना तंत्रज्ञांना पाच वर्षाकरिता 1000 रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. 

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात किंवा सहाय्यक आयुक्त जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नांदेड येथे भरून नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे.अन्यथा या कायद्याचे कलम चार व पाच अन्वये दंड आकारणी होऊ शकते, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.राजकुमार पडले यांनी दिली आहे.

0000

 वृत्त क्र. 142

नांदेड जिल्हा रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनाचे उद्घाटन

 

नांदेड दि. 4 फेब्रुवारी :जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या हस्ते जागतिक कर्करोग दिनाचे उद्घाटन आज करण्यात आले. याप्रसंगी कर्करोग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कर्करोग आजारासंबंधी अनमोल असे मार्गदर्शन करण्यात आले. Globocan २०२० च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रामध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग, व गर्भाशयमुख कर्करोग याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे मुख कर्करोग (२६.३,) स्तन कर्करोग (७७.९,) व गर्भाशयमुख कर्करोग (५०.२) असे आहे.

 

त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यभर 100 दिवसाची कर्करोग तपासणी मोहिम सुरुवात हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यांतर्गत ३० वर्ष वयोगटावरील लोकांचे मुख कर्करोग, स्तन कर्करोग, व गर्भाशयमुख कर्करोग इ तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, मनपा वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिनिस्त उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या  आरोग्य संस्थेअंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकिस्तक, स्त्री रोग तज्ञ जनरल सर्जन यांच्या मार्फत कर्करोग संबंधित VIA, OVE, CBE इत्यादी संदर्भात  आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

 

तसेच उपरोक्त आरोग्य संस्थेमार्फत 9 फेब्रुवारी ते 16 फेबुवारी या कालावधीमध्ये कर्करोग जन जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत कर्करोग संबंधित रुग्णांना Biopsy ,Sonograpy, CT Scan इत्यादी सेवा कर्करोग उपचार केंद्राच्या माध्यमातून मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रुग्णांना कर्करोग संबंधित समुपदेशन करण्यात येणार आहे. तरी या कर्करोग मोहिमेच्या कालावधीत जिल्ह्यांतर्गत ३० वर्ष वयोगटावरील सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी केले आहे.

 

या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय परके यांनी स्त्रियांमध्ये आढळून येणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोगासंबंधी व IDA चे अध्यक्ष डॉ.संदीप दंडे यांनी मौखिक कर्करोगसंबंधी अनमोल असे मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. विद्या झिने, नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, डॉ.एच.के.साखरे, डॉ पुष्पा गायकवाड, दंत शल्य चिकित्सक डॉ. कांतीलाल इंगळे, डॉ. विजय पवार, डॉ. बालाजी माने, जनरल सर्जन डॉ गोपाळ शिंदे, स्त्रीरोग तज्ञ डॉ सुजाता राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ सुर्यकांत नागशेट्टीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ विखारुनिसा खान, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. उमेश मुंडे मेट्रन सुनिता राठोड, जिल्हा सल्लागार डॉ शीतल चातुरे, इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांची नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, सुनिल तोटेवाड, सुनील खंडागळे यांनी परिश्रम घेतले.

0000




#बारावीपरीक्षा विशेष लेख                                                                                                                    ...