Saturday, August 13, 2016

जिल्हा न्यायालय नांदेड येथे
राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न
नांदेड, दि. 13 :-  जिल्हा न्यायालय नांदेड येथे 13 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालया तर्फे बॅंक प्रकरणे: सेक्शन 138 (एन.आय.अॅक्ट), बॅंकांची वसुली दावे,  इत्यादी प्रलंबित व दाखल पुर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित केले होते. सदर लोकन्यायाल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, मा. सविता टी. बारणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, मा. न्या. ए. आर. कुरेशी, यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाले.
            जिल्हयातील सर्व न्यायालयात घेण्यात आलेल्या या लोकन्यायालयात 138 (एन.आय.अॅक्ट) चे एकुण 68 प्रकरणात तडजोड करण्यात येवून रू. 3528551 वसुल करण्यात आले. बॅंकांची वसुली प्रकरणांमध्ये 14 प्रकरणात तडजोड होवून रू. 2252597 वसुल करण्यात आले.  तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणांमध्ये विविध बॅंकांची मिळून एकुण 42 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात येवून रू. 2582000 वसुल करून देण्यात आली. म्हणजे एकुण 124 प्रकरणांमध्ये तडजोउ होवून एकुण रक्कम रू. 8363148 रू. वसुल करण्यात आले. नांदेड जिल्हा न्यायालयात एकूण 4 पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात पॅनल प्रमुख म्हणून मा. श्री. एस. आर. नरवाडे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड, मा. श्रीमती सी. व्ही. सिरसाठ, सह दिवाणी न्यायाधीश, क-स्तर, नांदेड, मा. श्री. एम. के. सोरटे, 2रे सह दिवाणी न्यायाधीश, क-स्तर, नांदेड, मा. श्रीमती इ. व्ही. धांडे, 4थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी काम पाहिले. तसेच यांना पॅनल सदस्य म्हणून अॅड. एम.एल.गायकवाड, अॅड. मो. शाहेद मो. इब्राहिम, अॅड. बी. जी. नरवाडे, अॅड. सिध्देश्वर खरात, अॅड. ए. वाय. चंदनशिवे, अॅड. सय्यद साजिद, अॅड. कु. एस. पी. गायकवाड, अॅड. आर. एम. लोणे यांचे सहकार्य लाभले या लोकन्यायालयात मा. सन्माननिय विधीज्ञ, विविध बॅंकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. पी. एस. तुप्तेवार, अधिक्षक श्री कबिर सिध्दीकी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक पी. आर. खरात, श्री. कावळे, सौ. एम. व्ही. वाहेगावकर, रणजित कदम, किशोर महाजन, संगमेश्वर मंडगे, सुनिल मुदिराज यांचे व इतर न्यायालयीन कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

000000000
जिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 13 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडून नुकतेच जिल्हा कारागृह नांदेड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  न्या. ए. आर. कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य न्याय दंडाधिकारी न्या. एस. एन. सचदेव, सह दिवाणी न्यायाधीश एम. के. सोरते, अॅड. इद्रिस कादरी, अॅड. मो., अॅड. बाळासाहेब  नरवाडे व अॅड. ए. वाय. चंदनशिवे हे उपस्थित होते. 
न्या. सचदेव यांनी बंद्यांना जामिनावर सुटण्याचा हक्क याविषयी माहिती देतांना पॅरोल बेलवर सुटण्यासाठी कारागृहातील आपली वागणुक महत्वाची असते असे सांगून त्यांनी याबाबत माहिती देतांना महाभारतातील कर्ण-दुर्योधन यांचे उदाहरण देवून विस्तृत माहिती दिली.
 न्या. कुरेशी यांनी उपस्थित बंद्यांना मार्गदर्शन करतांना समाजामध्ये वावरताना आपल्या हातून कुठलेही वाईट कृत्य होणार नाही याची काळजी घ्या. संयम बाळगा असे सांगीतले. न्या. एम. के. सोरते यांनी प्ली बारगेनिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. इद्रिस कादरी यांनी कैद्यांचे विविध अधिकार याबाबत माहिती दिली. अॅड. बाळासाहेब नरवाडे यांनी जामिनाबाबत असलेल्या तरतुदीबाबत सविस्तर माहिती दिली. अॅड. चंदनशिवे यांनी सुध्दा बंदी व न्यायधीन बंदी यांचे अधिकाराबाबत मार्गदर्शन केले.
अॅड. मो. शाहेद मो. इब्राहिम यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक. जी. के. राठोड यांनी आभार मानले. यावेळी कारागृहातील जवळपास 320 पुरूष व महिला बंदी उपस्थित होते.

00000000
ग्रंथालय पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 13 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार सन 2016-17 साठी पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज 10 सप्टेंबर,2016 पर्यंत व्दिप्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन श्री.किरण गं.धांडोरे, ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणा-या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून "डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार" देण्यात येतो.
      राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील "अ" "ब" "क" "ड" वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार रुपये, 30 हजार रुपये, 20 हजार रुपये, 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्‍मृतिचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली  विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये 15 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व  स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येते.

000000
प्राचार्य, अधिव्याख्याता पदाच्या मुलाखतीस
पात्र ठरलेल्यांसाठी मॉक मुलाखतीचे आयोजन
नांदेड दि. 13 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्ष्‍ाण संस्थेतील प्राचार्य, अधिव्याख्याता परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या नांदेड जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी मॉक मुलाखतीचे या मॉक मुलाखतीचे आयोजन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे मंगळवार 16 ऑगस्ट व बुधवार 17 ऑगस्ट 2016 रोजी केले जाणार आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा  परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल नांदेड हे विशेष अभियान जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. त्यात पुढचे पाऊल आता मॉक मुलाखतीचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना  स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता यावे यासाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.
         या मॉक मुलाखतीचे आयोजन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे मंगळवार 16 ऑगस्ट व बुधवार 17 ऑगस्ट या दोन दिवशी केले आहे.  मंगळवार 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, प्राचार्य बी.बी.पुटवाड हे मुलाखतीबदल मार्गदर्शन करणार आहेत. बुधवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपासून मोफत मॉक मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मॉक मुलाखतीला पॅनल सदस्य म्हणून पुणे येथील मनोहर भोळे, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसिलदार सुरेश घोळवे, प्राचार्य बी.बी.पुटवाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार आदी उपस्थित राहणार आहे.
             इच्छुक उमेदवारांनी आपल्या बायोडाटासह नाव नोंदणी सेतू समिती संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, गुरु गोबिंदसिंग स्टेडियम परिसर नांदेड येथे करावी, किंवा 9422881241 या भ्रमणध्वनी क्रंमाकांशी संपर्क साधून इच्छूकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.

0000000
थोरा-मोठयांचा जडणघडणीत
ग्रंथाचे योगदान महत्वपूर्ण - थोरात
राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा
            नांदेड, दि. 13 :- ग्रंथ वाचनाचा आनंद अव्दितीय असून वाचनाने मानवाचे व्यक्तिमत्व समृध्द होते. थोरा-मोठयांचा जडणघडणीमध्ये ग्रंथाचे योगदान अधिक महत्वपूर्ण असून सार्थक जीवन जगण्यासाठी वाचनाशिवाय तरणोपाय नसल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी केले. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पदश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांची जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटक  म्हणून बोलत होते. 
     
नांदेड येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात संगत प्रकाशनाचे जयप्रकाश सुरनर यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास संजय पोतदार, प्रा. राजाराम वट्टमवार, डॉ. गणेश बामणे, व्यंकटराव राजेगोरे, रा.ना.मेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
       प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी डॉ. रंगनाथन यांची पंचसूत्री विशद करुन डॉ. रंगनाथन यांचे ग्रंथालय क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाश सुरनर यांनी राष्ट्रीय ग्रंथपाल ‍दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांना वाचते व्हा चा संदेश दिला. यावेळी संजय पोतदार, तुप्पा यांची नॅशनल  जिओग्राफी सोसायटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर यांनी शाहीरी गीत सादर केले.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती कोकुलवार यांनी तर आभार अजय वट्टमवार यांनी केले. कार्यक्रमास संजय कर्वे, कोडिंबा गाडेवाड, संजय पाटील, शिवाजी पवार लहान, ज्ञानेश्वर वडगावकर नायगाव, शिवाजी सुर्यवंशी  भोकर,‍ मिरकुटे कंधार, विठठल काळे,लक्ष्मीबाई जाधव लोहा, कुबेर राठोर हदगाव, जाधव माहूर, पुंडलिक कदम देगलूर, शिवाजी हंबिरे, बालाजी पाटील  मुखेड इ.ग्रंथालय क्षेत्रातील कर्मचारी , कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.

0000000
नांदेड पोलिसांच्या सायबर लॅब,
अत्याधुनिक आय-कारचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन
नांदेड, दि. 13 :- सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व गुन्ह्यांचा तपास गतीमान पद्धतीने करण्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यात एकाचवेळी 44 सायबर फॉरेन्सीक लॅब सुरु करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या या अत्याधुनिक लॅबचे लॅबचे उद्घाटन सोमवार 15 ऑगस्ट 2016 रोजी राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच नांदेड पोलिस दलात दाखल झालेल्या घटनास्थळवर पोहचून न्यायवैधक पुरावे एकत्र करणाऱ्या आय-कार या अत्याधुनिक वाहनाचेही राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते यादिवशी उद्घाटन करण्यात येणार आहे.
माहिती तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी या सायबर लॅब सूसज्ज करण्यात आल्या आहेत. नांदेडमधील ही सायबर लॅब मुंबई मुख्यालयाशी जोडण्यात आलेली असून त्याद्वारे 24 तास सायबर गुन्ह्यांवर नजर ठेवता येणार आहे. मिळालेल्‌या माहितीच्या आधारे इंटरनेटशी संबंधित गुन्हे उदा. आर्थिक गुन्हे, ऑनलाईन बँक गुन्हे, सोशल मिडियावरील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरीता तसेच सायबर गुन्ह्यांचा जलद व गतीमान तपास करण्याकरीता त्यांचा वापर करता येणार आहे. या लॅबमुळे नांदेड जिल्हा पोलीस दलही आणखी सक्षम आणि अत्याधुनिक होणार आहे.
नांदेड पोलिसांकडे अत्याधुनिक आय कार
नांदेड पोलीस दलासाठी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) पुणे यांच्याकडून नवीन फॉरेन्सिक व्हॅन आय कार (Investigation Car) मिळाली आहे.
या फॉरेन्सिक व्हॅन आय कारमध्ये गुन्ह्यांसंबंधी एकूण 12 अत्याधुनिक उपकरणे आहेत. त्याचा उपयोग खून, बलात्कार व विविध हत्यारांनी होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच विविध स्फोटके यांच्या तपासासाठी, त्यांच्या विश्लेषणासाठी होणार आहे. यामध्ये काम करण्यासाठी आय कार (Investigation Car) विभागाचे प्रशिक्षीत असे पथकही असणार आहे. त्यामध्ये अंगुली मुद्रा विभाग, वैज्ञानिक तज्ज्ञ, छायाचित्रकार यांचा समावेश आहे. या व्हॅनद्वारे घटनास्थळी लवकरात लवकर पोहचून घटनास्थळाचा न्यायवैधक दृष्ट्या वैज्ञानिक पुरावे गोळा करता येणार आहेत. यामुळे दोषारोप पत्र तयार करताना, आणि त्यांची अचूकता वाढणार आहे. ज्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. काही गुन्ह्यांमध्ये सापडलेले भौतीक पुरावे घेण्याची व साठवण्याची अत्याधुनिक अशी यंत्रणाही यामध्ये आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा योग्य तपास होवून दोष सिद्धीच्या प्रमाणातही वाढ होईल.

0000000
दिशा समिती सभेत विविध योजना,
विकास कामांचा सर्वंकष आढावा

नांदेड दि. 13 :- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, तसेच विकास कामांबाबत आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती –दिशा सभेत सर्वंकष आढावा घेण्यात आला. योजना, उद्दिष्टे यांच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश सभेत देण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे सभा संपन्न झाली.
सभेस जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलताई गुंडले, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार अमर राजूरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंतराव चव्हाण,आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, पंचायत समितींचे सभापती नांदेड- चंदर भक्तापुरे, धर्माबाद- रामकिशन यंगलोड, कंधार- बालाजी पांडागळे, मुखेड-गंगाबाई गायकवाड, भोकर- कमलाबाई जाधव, हदगाव- बाळासाहेब कदम, हिमातनगर- आडेलाबाई हातमोडे, तसेच समिती सदस्य सुभाष पाटील-दापकेकर, रामचंद्र मुसळे, ॲड नामदेव राणवळकर, सुमती व्यावहाळकर, शेख फारुख शेख मौलाना, समिती सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर भातलंवेड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
सभेत सुरुवातीला गतसभेच्या इतिवृत्ताचा अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. तसेच 2016-17च्या वार्षिक कृती आराखड्या तसेच माहे जुलै 2016 पर्यंतचा आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाळ अंत्योदय योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन, अमृत योजना, महावितरणची उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, रेल्वे, भारत संचार निगम लिमीटेड, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह भुसंपादन आणि संसद आदर्श ग्राम योजनेतील गावांबाबचा आढावाही घेण्यात आला. संबंधित योजना तसेच त्यातील कामांबाबतचा अहवाल संबंधीत यंत्रणांनी सादर केला. त्यावर उपस्थित समिती सदस्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. तसेच काही उपयुक्त सूचनाही केल्या. बैठकीत खासदार श्री. चव्हाण यांनीही विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणाना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन उपायुक्त पी. पी. घुले यांनी सभेचे संचलन केले व शेवटी आभार मानले. 

000000000
स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी
राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 12 :- भारतीय स्वातंत्र्याच्या  69 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 15 ऑगस्ट, 2016  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पुर्वी किंवा  9.35 नंतर आयोजित करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.
*******


वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचा दौरा
नांदेड, दि. 12 :- राज्याचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर, हे नांदेड जिल्हयाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा तपशील पुढीलप्रमाणे.
  रविवार दिनांक 14 ऑगस्ट, 2016 रोजी रात्री 8.00 वाजता जालना येथून मोटरीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे  आगमन व राखीव.
 सोमवार दि. 15 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कडे प्रयाण, सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन व ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती.  त्यानंतर सोईनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथून मोटारीने पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड कडे प्रयाण. पोलीस अधिक्षक कार्यालय येथे सायबर लॅब उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड कडे प्रयाण आगमन व राखीव. सायं. 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं. 6.00 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने सीएसटी, मुंबई कडे प्रयाण.

0000000
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 12 - राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.

प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त  व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  *******
कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दौरा
नांदेड, दि. 12 :- राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री, संभाजी पाटील - निलंगेकर हे मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट, 2016 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा तपशील पुढीलप्रमाणे  मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट, 2016 रोजी सायं. 5.30 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने माहूरगड जि. नांदेड येथे आगमन होईल त्यानंतर राखीव व सायं. 6.00 वाजता माहूरगड जि. नांदेड येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

0000000
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या
केंद्र शासन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
   नांदेड, दि. 11 :-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानीत कनिष्ठ, वरिष्ठ, डीएड, बीएड व्यावसायिक अव्यावसायिक महाविद्यालयात सन 2016-17 मध्ये नियमीत प्रवेश घेतलेले मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी व जैन या अल्पसंख्यांक  समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना या विभागाअंतर्गत  सन 2016-17 साठी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन शिष्यवृत्ती व नुतनीकरण शिष्यवृत्ती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी पुढील विवरणपत्रात केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. नवीन शिष्यवृत्ती, नुतनीकरणासाठी इयत्ता अकरावी , बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक बुधवार 31 ऑगस्ट 2016 असून पदवी, पदवीत्तर, आयटीआय, डिप्लोमा, बीएड, एमफील, पीएचडी यासारखे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक सोमवार 31 ऑक्टोंबर 2016 आहे.
विद्यार्थ्यांने व महाविद्यालयाने अधीक माहितीसाठी तसेच नवीन प्राप्त होणाऱ्या सूचनांसाठी www.scholarship.go.inwww.dhepune.gov.in या संकेतस्थळावर अवलोकन करावे, असे आवाहन विभागीय सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी केले आहे.

00000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...