Saturday, August 13, 2016

दिशा समिती सभेत विविध योजना,
विकास कामांचा सर्वंकष आढावा

नांदेड दि. 13 :- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, तसेच विकास कामांबाबत आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती –दिशा सभेत सर्वंकष आढावा घेण्यात आला. योजना, उद्दिष्टे यांच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश सभेत देण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे सभा संपन्न झाली.
सभेस जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलताई गुंडले, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार अमर राजूरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंतराव चव्हाण,आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, पंचायत समितींचे सभापती नांदेड- चंदर भक्तापुरे, धर्माबाद- रामकिशन यंगलोड, कंधार- बालाजी पांडागळे, मुखेड-गंगाबाई गायकवाड, भोकर- कमलाबाई जाधव, हदगाव- बाळासाहेब कदम, हिमातनगर- आडेलाबाई हातमोडे, तसेच समिती सदस्य सुभाष पाटील-दापकेकर, रामचंद्र मुसळे, ॲड नामदेव राणवळकर, सुमती व्यावहाळकर, शेख फारुख शेख मौलाना, समिती सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर भातलंवेड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
सभेत सुरुवातीला गतसभेच्या इतिवृत्ताचा अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. तसेच 2016-17च्या वार्षिक कृती आराखड्या तसेच माहे जुलै 2016 पर्यंतचा आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाळ अंत्योदय योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन, अमृत योजना, महावितरणची उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, रेल्वे, भारत संचार निगम लिमीटेड, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह भुसंपादन आणि संसद आदर्श ग्राम योजनेतील गावांबाबचा आढावाही घेण्यात आला. संबंधित योजना तसेच त्यातील कामांबाबतचा अहवाल संबंधीत यंत्रणांनी सादर केला. त्यावर उपस्थित समिती सदस्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. तसेच काही उपयुक्त सूचनाही केल्या. बैठकीत खासदार श्री. चव्हाण यांनीही विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणाना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन उपायुक्त पी. पी. घुले यांनी सभेचे संचलन केले व शेवटी आभार मानले. 

000000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...