Wednesday, March 4, 2020

जागतिक कर्णबधिरता दिन साजरा

नांदेड दि. 4 :- तीन मार्च हा जागतिक कर्णबाधीरता दिन म्हणून संपूर्ण राज्यात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने 3 ते 11 मार्च या कालावधी जागतिक कर्णबाधीरता साप्ताह म्हणून साजरा केला जातो.

त्याअनुषंगाने नांदेड जिल्हा रुग्णालय येथे जागतिक कर्णबाधीरता दिन आज साजरा करण्यात आला आहे. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिरसिरकर यांनी उपस्थित रुग्ण व त्यांची नातेवाईक यांना कर्णबाधीरता म्हणजे काय त्याची विविध कारणे कोणती याबद्दल माहिती दिली. एखाद्या व्यक्तीस संबंधित आजाराची लक्षणे दिसून आल्यास ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय नांदेड येथे उपलब्ध असलेल्या तपासणी, उपचार सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, डॉ. प्रमोद चिखलीकर डॉ. सभा खान डॉ. हनुमंत पाटील तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव व सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
00000

     जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 4:- जिल्ह्यात शनिवार 14 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 29 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 14 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000



जनगणना प्रशिक्षणाची सुरवात  
नांदेड दि. 4 :- भारताची जनगणना 2021 साठी जिल्हा, शहर, सर्व चार्ज अधिकारी आणि रेग्युलर असिस्टंट (संबंधीत जनगणना कर्मचारी) यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन 4 व 5 मार्च 2020 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरत नांदेड येथे सकाळी 9.30 वा. करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली भारताची जनगणना-2021 चे अनुषंगाने प्रशिक्षणास आज सुरवात करण्यात आली.  
यावेळी मुंबई जनगणना कार्यालयाचे संचालक यांच्याकडून उपसंचालक रघु अनुमोल, वरिष्ठ निरीक्षक प्रविण भगत, वरिष्ठ  पर्यवेक्षक आर. एस. पाथवे, विलास होनराव (पाटील) जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर संकल्पना, कार्यपद्धती, मोबाईल ॲपचा वापर याबाबत सविस्तर माहिती दिली.
हे प्रशिक्षण जिल्हा, शहर, नगरपालिका, नगरपंचायत सर्व चार्ज अधिकारी तसेच सर्व संबंधीत जनगणना लिपीक उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
000000


राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबादकडून 
द्वितीय अपिलांवर नांदेडला सुनावणी कार्यक्रम
संकेतस्थळावर सुनावणी बोर्डाची माहिती प्रसिद्ध   
नांदेड दि. 4 :- राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्यावतीने येत्या 17, 18 19 मार्च 2020 रोजी द्वितीय अपिलांची साहशे विशेष सुनावणीचा कार्यक्रम नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांना प्राप्त होणाऱ्या द्वितीय अपिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेता राज्य माहिती आयुक्तांनी नांदेड जिल्हयातील अपिलार्थीकडून प्राप्त होणाऱ्या द्वितीय अपिलांची सुनावणी नांदेड येथे घेण्यासाठी विशेष मोहिम प्रस्तावित केली आहे.
सुनावणी कार्यक्रम नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिनांक 17, 18 19 मार्च 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहे. द्वितीय अपिलांची संख्या सुमारे 600 सुनावण्या घेण्याबाबत सुचित केले आहे.
राज्य माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद यांनी द्वितीय अपिल प्रकरणाची माहिती https://sic.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर सुनावणी बोर्ड तारखेनिहाय प्रसिद्ध केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सामान्य शाखा (माहिती अधिकारी) यांनी 3 मार्च 2020 ते 20 मार्च 2020 पर्यंत nanded.gov.in या संकेतस्थवळावर जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना प्रसिद्धी देण्याबाबत सुचना दिली आहे. नांदेड जिल्हयातील विविध कार्यालयांना सुनावणी बोर्ड उपलब्ध होण्यासाठी 3 मार्च 2020 पासून nanded.gov.in या जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...