Saturday, December 16, 2017

श्रीक्षेत्र माळेगाव खंडेरायाच्या यात्रेस 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या गजरात प्रारंभ

श्रीक्षेत्र माळेगाव खंडेरायाच्या यात्रेस
'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या गजरात प्रारंभ  
नांदेड दि. 16 :-  बेल-फुल भंडाऱ्याची उधळण..आणि येळकोट...येळकोट जय मल्हारचा गजर. भंडाऱ्यात रंगलेले, खंडरायाच्या भक्तीत दंगलेले भाविक...अशा वातावरणात आज शनिवार श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाच्या यात्रेला प्रारंभ झाला. दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि अनेक घटाकांसाठीची जिव्हाळ्याची म्हणून माळेगावच्या यात्रेस मान्यता आहे. या यात्रेस आज हजारो भक्तांच्या साक्षीने खंडोबाच्या देवस्वारीने प्रारंभ झाला. यात्रेसाठी माळेगाव यंदाही दरवर्षीप्रमाणेच भाविक, यात्रेकरु आणि व्यापारी, खेळ-मेळ्यांनी फुलून गेले आहे.
श्री खंडोबा देवस्थानातून परंपरेनुसार देवांची पालखी काढण्यात आली. या पालखीच्या पुढे परंपरेनुसार रिसनगावचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक यांची पालखी होती. वाजत-गाजत आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात पालख्या मार्गस्थ झाल्या. त्याबरोबर बेलफुलभंडार, खोबऱ्यांची उधळण सुरु झाली. भंडाऱ्याच्या उधळणीने आणि तोंडी खंडोबारायाचे जयघोषणाने वातावरण भक्तीमय होऊन गेले. पारंपारिक पेहरावातील वाजंत्री आणि शरीरावर आसुडांचे फटके मारुन घेणारे वारुंचीही मिरवणुकीत हजेरी होती. देवस्वारी आणि पालखीची नगर प्रदक्षिणा मुख्य रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोर आली. यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने पारंपरिक पद्धतीने मानकऱ्यांचा स्वागत-सत्कार करण्यात आला व देवाच्या पालखीचे पूजन करण्यात आले.  
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती समाधान जाधव, शिक्षण व आरोग्य समिती सभापती माधवराव मिसाळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, महिला व बालकल्याण सभापती सौ. मधुमती देशमुख, समाज कल्याण सभापती सौ. शिलाताई निखाते, लोहा पंचायत समिती सभापती सतीश पाटील उमरेकर, माजी आमदार माधवराव पाटील, हरिहरराव भोसीकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, संजय बेळगे, गंगाप्रसाद काकडे, बाळासाहेब रावणगावकर, प्रवीण पाटील चिखलीकर, रामराव नाईक, सौ. संगीता गायकवाड, सौ. महालनबाई भुजबळ, सौ. अंकिता देशमुख, सौ. अरुणा कल्याणे, सौ. पुनम पवार, सौ. प्रणिता देवरे-चिखलीकर, लोहा पंचायत समितीचे उपसभापती सौ. इंदुबाई कदम, माळेगावचे सरपंच गोविंद राठोड, उपसरपंच सुंदरबाई धुळगंडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, कंधार उपविभागीय अधिकारी प्रबोधय मुळे, अहमदपूर उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसिलदार अशिष बिरादार, जि. ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ कोंडेकर, गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड आदींनी पालखीचे दर्शन घेतले.   
मानकऱ्यांचा सत्कार
श्री खंडोबाचे मानकरी गणपतराव नाईक- रिसनगाव, नागेश महाजन- कुरुळा, व्यंकटराव पांडागळे- शिराढोण, खुशालराव भोसीकर- पानभोसी, गोविंदराव नाईकवाडे- कंधार या मानकऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
कृषी प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्यावतीने श्रीक्षेत्र माळेगाव येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची दालने थाटण्यात आली आहे. यात्रेतील कृषी प्रदर्शनाचेही जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात विविध दालने आहेत. ज्यामध्ये वैशिष्ट्यपुर्ण वाणाचे विविध फळ, भाजीपाला आणि पिकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत. तसेच कृषी अवजारांची, खते व विविध कृषोपयोगी उपकरणे-घटकांची दालने आहेत. याशिवाय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषि व पशुसंवर्धन विभाग, पोलीस यांच्यासह विविध विभागाचे दालने आहेत. त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध जनावरे घेऊन पशुमालक दाखल झाले आहेत. उच्च प्रतीची जनावरे मिळण्याचे दक्षिण भारतातील महत्वाचे ठिकाण म्हणून यात्रेचा लौकिक आहे. याठिकाणी व्यापाऱ्यांची अनेक वस्तु विक्रीची दुकाने थाटली. शेती आणि घरातील उपयोगाच्या लहान-मोठ्या वस्तु या यात्रेत नागरिक खरेदी करीत असल्याने यावर्षीही व्यापारपेठ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या लहान मुलांपासून थोरा-मोठ्या पर्यंतच्या सर्व प्रकारच्या मनोरंजनाच्या गोष्टींनी ही यात्रा सजली आहे. लोककलाच्या सादरीकरणासाठी कलावंतांच्या संचांनी ठिकठिकाणी तंबू थाटले आहेत. मनोरंजनाच्या खेळांचे अनेकविध प्रकारही दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषदेने दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक स्पर्धा, पशुपालकासाठी स्पर्धा, पशु प्रदर्शन यांचे आयोजन केले आहे. याशिवाय लोककला, आणि लावणी महोत्सवही यात्रेचे मोठे आकर्षण आहे. यात्रेसाठी आरोग्यविषयक सुविधा आणि पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.

0000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...