Saturday, February 6, 2021

 

12 कोरोना बाधितांची भर तर  

27 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- शनिवार 6 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 12 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 10 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 2 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 27 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 317 अहवालापैकी 305 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 634 एवढी झाली असून यातील 21 हजार 584 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 259 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 7 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 587 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, माहूर तालुक्यांतर्गत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, बिलोली तालुक्यांतर्गत 2, खाजगी रुग्णालय 3 असे एकूण 27 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.36 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, मुखेड तालुक्यात 2, कंधार 1, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 1 असे एकुण 10 बाधित आढळले. तर ॲटीजन किट्स तपासणीद्वारे कंधार तालुक्यात 1, यवतमाळ 1 असे एकुण 2 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 259 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 07, मुखेड कोविड रुग्णालय 3, हदगाव कोविड रुग्णालय 4, महसूल कोविड केअर सेंटर 11, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 150, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 28, हैदराबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 12 आहेत.   

शनिवार 6 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 163, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 90 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 14 हजार 260

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 87 हजार 272

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 634

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 584

एकुण मृत्यू संख्या-587

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक 

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-259

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-07          

0000

 

 

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या

अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार मोहनअण्णा हंबर्डे

सदस्य पदी आमदार बालाजी कल्याणकर, संतोष पांडागळे यांच्यासह सात जणांची नियुक्ती 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची घोषणा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने नुकतीच केली. अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्यांमध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांच्यासह सात जणांचा समावेश आहे. 

शासकीय रूग्णालय व महाविद्यालयातील अडीअडचणीची आपणास चांगलीच जाणीव असून आपल्या व शेजारील जिल्ह्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना योग्य ते औषधोपचार व चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या मंडळावर आपली नियुक्ती केल्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना आपण मनातून धन्यवाद देतो असे उद्गार आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी काढले. 

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न असलेल्या रूग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून अभ्यागत मंडळाची स्थापना करण्यात येते. शासनाने या मंडळाची नुकतीच पुर्नरचना करून अध्यक्षपदी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांची नेमणुक केली. सदस्य म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार बालाजीराव कल्याणकर, पत्रकार संतोष पांडागळे, अब्दुल हबीब अब्दुल लतीफ, डॉ.करूणा जमदाडे, श्रीमती कल्पना शिरपुरे, दिगांबर पवार, रोहिदास जाधव, कैलास धोत्रे, डॉ. दि. बा. जोशी यांचा समावेश आहे. या वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर नियुक्त केल्याबद्दल अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

000000

लेख : 

सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा लोकराज्य मासिकासाठी वर्षपूर्ती लेख 

शेतीसह सहकार क्षेत्राच्या विकासावर भर 

राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, कृषी, सहकार क्षेत्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने काम करण्यास सुरूवात केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, त्यांना चांगले बीबियाणे मिळावे, यासाठी कृषी व सहकार विभागाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली. कोवीडमुळे करण्यात आलेले लॉकडाऊनमुळे असो की, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असो, शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घेतला. 

शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली. त्यातून अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्यांचे तसेच पुनर्गठन व फेरपुनर्गठन केलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. 

लॉकडाऊन काळात नागरी सहकारी बँका तसेच पतसंस्थांची एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ, नागरी सहकारी बँकांमधील भागधारणाची कमाल मर्यादा वाढविणे असे निर्णयही घेण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनानेही व्याज परतावा योजना सुरू केली. 

शेतीसाठीच्या अनेक योजना राज्य व केंद्र शासन राबवित असते. या योजनांसाठी वेगवेगळे अर्ज करावे लागू नये तसेच त्यांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहचावा यासाठी महाडिबीटी पोर्टलद्वारे एकाच अर्जाद्वारे सर्व लाभ देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार फेऱ्या मारणे थांबले. शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले तर शेतकऱ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. हे जाणून सुमारे एक लाख शेतमजुरांना कौशल्याधारित कामांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे शेती उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. 

शेती क्षेत्रासाठी वेगवेगळ्या योजनाही राज्य शासनाने सुरू केल्या. त्यामध्ये पिकेल तिथे विकेल अभियान, रानभाज्या महोत्सव, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना, शेती शाळांचे आयोजन, ग्राम कृषी विकास समिती स्थापण करणे असे विविध योजना सुरू करण्याचा निर्णय या एक वर्षात घेतल्या. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कृषी विस्ताराची नवी दिशा देण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे. यामध्ये यूट्यूब चॅनेल, व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देणे, शेती क्षेत्रातील नवनव्या योजनांच्या माहितीसाठी वेबिनारचे आयोजन यांचा समावेश आहे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट कृषी प्रकल्पातून शेती क्षेत्राचे शाश्वत व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यावर भर देण्यात आला आहे. 

जून ते ऑक्टोंबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत देण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी सुमारे 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त 86.19 लाख शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी एकूण 6213.68 कोटी विमा रकमेचे वाटप करण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य गरीब जनतेला दिलासा देण्यासाठीही अनेक निर्णय घेऊन त्यांची अमंलबजावणी राज्य शासनाने केली आहे. त्यामध्ये शिवभोजन थाळी ही महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे राज्यातील गरिब व गरजू नागरिकांना अत्यंत कमी पाच रुपये दराने जेवण मिळत आहे. सध्या प्रति दिवस सुमारे दीड लाख थाळ्यांचे वितरण होते. हे अन्न चांगले व दर्जेदार असावे , यासाठी कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येत आहे. 

कोवीड काळात राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सुमारे 9 लाख 42 हजार शेतकऱ्यांना खते व बि बियाणे यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये सुमारे 2 लाख क्विंटल बी-बीयाणे, 2 लाख 79 हजार मेट्रिक टन रासायनिक खत, 6 लाख 26 हजार क्विंटल कापूस बियाणे वाटप करण्यात आले. तसेच शेतकरी गटाच्या माध्यमातून शहरी भागातील ग्राहकांपर्यंत सुमारे 1 लाख 37 हजार मेट्रिक टन फळ व भाजीपाला थेट पुरवठा करण्यात आला. यामुळे कोवीड काळात शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ तर मिळालीच त्याचबरोबर शहरी ग्राहकांनाही ताजा भाजीपाला व फळांचा पुरवठा झाला. त्याचप्रमाणे सहकार विभागामार्फत शहरांमधील ग्राहक संस्थांमार्फत जीवनावश्यक किराणा मालाचा पुरवठाही करण्यात आला. 

विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्तीमध्ये बदल करून पदव्युत्तर पदवीसाठी त्याच विषयाची पदवी ऐवजी इतर विषयांची पदवीही ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. समाजात आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने लॉकडाऊन काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. सवलतीच्या दरात अन्नधान्याचे वितरण केल्यामुळे लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरितांनाही या योजनांचा फायदाच झाला आहे. 

अल्पसंख्यांक विभागाच्या मार्फत अल्पसंख्यांक समाजातील तरुणांसाठी शासकीय पॉलिटेक्निक मध्ये दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच या समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी 23 ठिकाणी वसतिगृहे सुरू करण्यात येत आहेत. 

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच राज्याच्या सीमाभागात मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची मराठी भाषा अधिक चांगली होईल. तसेच इतर भाषिक विद्यार्थ्यांना स्थानिक मराठी भाषेची ओळख होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. 

भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातील कोवीडची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाबरोबर समन्वय ठेवून योग्य सूचना दिल्या. कोवीड रिकव्हरी रेट वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमद्वारे जिल्ह्यातील 12 लाख लोकांचा सर्व्हे करण्यात आला. तसेच चाचण्यांसाठी जिल्ह्यात मोबाईल व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. 

राज्यातील शेतकरी, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजासह सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊन त्याचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी राज्य शासन काम करत आहे. कोणताही घटक विकासापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेत आहोत. मात्र, कोवीडचा संसर्ग अद्याप पूर्णपणे संपला नाही. त्यामुळे या संसर्गाशी लढा देत असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी या भूमिकेतून नागरिकांनी सावधानता बाळगावी. 

डॉ. विश्वजित पतंगराव कदम

राज्यमंत्री

सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

शब्दांकन - नंदकुमार बलभीम वाघमारे, सहायक संचालक (माहिती)

0000

 



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...