Monday, September 25, 2017

जिल्हा नियोजन समिती निवडणूक मतदान ,
मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम  
नांदेड दि. 25 :-  जिल्हा नियोजन समिती निवडणूक 2017 ची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने मतदानाच्या दिवशी बुधवार 27 सप्टेंबर 2017 रोजी मतदान केंद्र परिसरात व मतमोजणीच्या दिवशी गुरुवार 28 सप्टेंबर रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश लागू केला आहे.  
जिल्हा नियोजन समिती निवडणुकीचे मतदान केंद्र तहसिलदार नांदेड, 7/12 वितरण केंद्र प्रशासकीय इमारत चिखलवाडी नांदेड, जुने सेतू सुविधा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड परिसर व मतमोजणी केंद्र बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड परिसर हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे.  
हा आदेश मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत 27 सप्टेंबर रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तर मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 28 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे.
00000



जिल्हा नियोजन समिती निवडणुकीचे
27 सप्टेंबरला मतदान ; 28 सप्टेंबरला मतमोजणी   
नांदेड दि. 25 :- नांदेड जिल्‍हा नियोजन समितीच्‍या निवडणुकीचे मतदान बुधवार 27 सप्‍टेंबर 2017 रोजी सकाळी 8 ते सायं. 5 यावेळात निश्‍चीत केलेल्‍या मतदान केंद्रावर घेतले जाणार आहे. या निवडणुकीत जिल्‍हा परिषद सदस्‍यांसाठी ग्रामीण मतदारसंघ, नगरपरिषद नगरसेवकांसाठी लहान नागरी मतदारसंघ, महानगरपालिकेचे नगरसेवकांसाठी मोठा नागरी मतदारसंघ या तीन मतदारसंघात मतदान घेण्‍यात येणार आहे. या मतदारसंघासाठी तीन मतदान केंद्र नांदेड येथे करण्‍यात आले आहेत.
त्‍यानुसार जिल्‍हा परिषद / ग्रामीण मतदारसंघासाठी तहसिलदार नांदेड यांचे कक्ष, प्रशासकीय इमारत, चिखलवाडी नांदेड.  नगरपरिषद लहान नागरी मतदार संघासाठी 7/ 12 वितरण केंद्र,  प्रशासकीय इमारत परिसर, चिखलवाडी नांदेड. महानगरपालिका क्षेत्र मोठा नागरी मतदारसंघासाठी जुने सेतु केंद्र, जिल्‍हाधिकारी कार्यालय, परिसर नांदेड असे निश्‍चीत करण्‍यात आले आहेत. या निवडणूकीची मतमोजणी गुरुवार 28 सप्‍टेंबर 2017 रोजी सकाळी 8 वा. बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे होणार असून मतमोजणीनंतर लगेच निकाल जाहीर करण्‍यात येणार आहेत.
            या निवडणुकीतील सर्व मतदारांना मतदान करण्‍यासाठी संबंधीत प्राधिकरणाने दिलेले छायाचित्र (फोटो) ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे. जिल्‍हा परिषद सदस्‍यांनी मुख्‍य कार्यकारी अधिकारी जिल्‍हा परिषद नांदेड, नगरपरिषदेच्‍या नगरसेवकांनी त्‍या-त्‍या नगरपरिषदेच्‍या मुख्‍याधिका-याकडून, महानगरपालिकेच्‍या नगरसेवकांनी आयुक्‍त महानगरपालिका नांदेड यांचेकडून व आपले दिनांकित छायाचित्र ओळखपत्र हस्‍तगत करावे. ओळखपत्रावर मतदाराचा फोटो व मतदारांची स्‍वाक्षरी असणे आवश्‍यक आहे. तसेच ओळखपत्र दिल्‍याची तारीख नमुद असणे आवश्‍यक आहे. छायाचित्र ओळखपत्र असल्‍याशिवाय मतदान करता येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले आहे.
000000




विद्यार्थ्यांनी मुलाखतीस आत्मविश्वासाने सामोरे जावे
- प्रा. मनोहर भोळे
नांदेड दि. 25 :- मुलाखत ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाची परीक्षा असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग याबाबत विद्यार्थी निवड केलेल्या पदासाठी कितपत योग्य आहे हे मुलाखतीत तपासले जाते. पूर्व आणि मुख्य परीक्षेद्वारे  विद्यार्थ्यांनी ज्ञानाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असते. त्यामुळे मुलाखतीचा  ताण न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास यश हमखास प्राप्त होते, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा मुलाखत तज्ञ प्रा. मनोहर भोळे यांनी केले. "उज्ज्वल नांदेड" मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित
करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या प्रतिरूप मुलाखतीच्या प्रसंगी आयोजित मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी गठीत केलेल्या  मुलाखत मंडळामध्ये प्रा. मनोहर भोळे, पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख बळवंत मस्के, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी चंदेल, अप्पर कोषागार अधिकारी विशाल हिवरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांचा समावेश होता. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 80 विद्यार्थ्यांच्या 23 व 24 सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये  मुलाखती नियोजन भवन, नांदेड येथे घेण्यात आल्या.  
प्रा. भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलाखतीचे बारकावे, पोशाख, बसण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, संवाद शैली या सर्व बाबी विषयी माहिती दिली तसेच एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास नम्रपणे माहीत नसल्याचे सांगावे, चुकीचे वा असंबद्ध उत्तर देऊ नये, असे त्यांनी सांगितले. अशोक बनकर व बालाजी चंदेल यांनी पोलीस प्रशासनाबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे सुद्धा पॅनल तयार करुन त्यांची मुलाखत देणारे व मुलाखत घेणारे या दोन्ही भुमिकेतुन तयारी करून घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. या मुलाखतीच्या आयोजनासाठी शैलेश झरकर, प्रताप सूर्यवंशी, आरती कोकुलवार, अजय वट्टमवार, कोंडीबा गादेवाड, मुक्तीराम शेळके,वैभव शहाणे,मयूर वाकोडे व राहुल बोकारे यांनी परिश्रम घेतले.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...