Saturday, March 7, 2026

 वृत्त क्रमांक  283

प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी येथे NQAS राज्यस्तरीय मूल्यांकन संपन्न; आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर 'NQAS' टीमकडून समाधान

नांदेड दि.७ मार्च :- जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी (ता. उमरी, जि. नांदेड) येथे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) अंतर्गत राज्यस्तरीय मूल्यांकन प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या पूर्वतयारीबद्दल आणि आरोग्य केंद्राच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल मूल्यांकन समितीने विशेष समाधान व्यक्त केले आहे.

प्रमुख उपस्थितांची उपस्थिती

या मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय समितीचे प्रतिनिधी म्हणून डॉ. सुहास वाहूळे (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मालेगाव, वाशिम) आणि डॉ. वसुंधरा खैरे (दक्षता मेंटर, जिल्हा हिंगोली) यांनी उपस्थित राहून केंद्रातील विविध विभागांची बारकाईने पाहणी केली.

 * प्रशासकीय मार्गदर्शन: हे मूल्यांकन यशस्वी करण्यासाठी डॉ. संगीता देशमुख आणि डॉ. संजय पेरके यांनी वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य केले.

 * लक्ष्य २०२६: शासनाच्या उद्दिष्टानुसार डिसेंबर २०२६ पर्यंत ५० टक्के उपकेंद्रे आणि ७५ टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे NQAS मानांकित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

 * स्थानिक टीमचे प्रयत्न: तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन देवराई, डॉ. सोहेल, आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हमंद यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका मूल्यांकनावेळी उपस्थित होते.

 * समन्वय: जिल्हा परिषदेचे जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक (DQAC) डॉ. शामसुंदर लोखंडे यांनी या संपूर्ण प्रक्रियेत समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.

सिंधी आरोग्य केंद्रात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, स्वच्छता, दप्तर तपासणी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता पाहून समितीने सकारात्मक दाद दिली आहे. या मूल्यांकनामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

०००००




  वृत्त क्रमांक  282

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

नांदेड, दि. ७ मार्च  : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील पहिले शिबिर तुप्पा येथे उत्साहात पार पडले. 

विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये ग्रामविकास, आरोग्य, कृषी, भूमिअभिलेख (मोजणी) तसेच दुय्यम निबंधक विभागासह विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले.

तहसील कार्यालय, नांदेड यांच्यावतीने शिबिरात महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये ७४२ ऑनलाईन सातबारा उतारे व ५१२ आठ-अ उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच ४५ पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय फेरफार संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले.

शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारा, ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभाग, भूमिअभिलेख विभाग व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या.

या कार्यक्रमास आमदार आनंदराव बोंढारकर तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी मार्गदर्शन केले. 

तहसीलदार संजय वारकड यांनी प्रास्ताविकातून अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. नायब तहसीलदार माचेवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वप्नील दिगलवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले.

तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी संतोष अस्कूलवार तसेच तलाठी गौतम पांढरे, योगिता अण्णमवार आणि दिलीप पवार यांनी विशेष योगदान दिले. तसेच तलाठी तालुका संघटनेचे अध्यक्ष अंकुर सकवान, सचिन उपरे, मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, येलमट्टी व बडवणे यांनीही सहकार्य केले.

शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

००००००

















 जागतिक महिला दिन ८मार्चसाठी विशेष लेख      

महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस

8 मार्च जागतिक महिला दिन. हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आत्मपरीक्षणाचा, नव्या संकल्पांचा आणि पुढच्या पिढीसमोर नवा आदर्श ठेवण्याचा दिवस आहे. समाज परिवर्तनाच्या वाटचालीत स्त्री-पुरुष समानतेचा विचार हा केवळ घोषवाक्य न राहता तो घराघरात कृतीत उतरला पाहिजे. त्यासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांनी काकणभर पुढे सहभाग नोंदवला पाहिजे. त्यासाठी आपापल्या घरातील मुलींना नव्हे मुलांना लिंग समानतेचा संदेश देण्याची, आजची खरी गरज आहे.

राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण, गृह, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, क्रीडा व जवळपास सर्वच विभागामार्फत महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना व धोरण राबवले जाते. राज्य महिला आयोगही स्वतंत्रपणे काम करते.  मात्र शासनासोबतच समानतेच्या शिक्षणाची घराघरात प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता आहे.

भारतीय समाजाने परंपरांचा वारसा जपला आहे; या परंपरांमध्ये पितृसत्ताक विचारांचा पगडा अद्यापही दिसून येतो.  घरामध्ये मुलगा आणि मुलगी यांना समान संधी, वागणूक आणि प्रोत्साहन मिळणे अजूनही सर्व स्तरांवर पूर्णत्वास गेलेले नाही. मुलाने कसे वागावे, मुलीने कसे वागावे, कोणते कपडे योग्य आणि कोणते अयोग्य, अशा अनेक पूर्वग्रहांनी अजूनही अनेक घरांची दारे बंदिस्त आहेत. या बंद दारांना उघडण्याची किल्ली म्हणजे शिक्षण,संवाद आणि आधुनिक दृष्टिकोन. आजच्या नवशिक्षित  व अशिक्षित मातांनीही नव्या समाज निर्मितीसाठी आपले हे दायित्व समजून घेणे म्हणजे महिला दिन साजरे करणे होय.

लहानपणापासूनच मुलांना ‘हे मुलांचे काम, हे मुलींचे काम’ असे शिकवले तर त्यांच्या मनावर लिंगभेदाचे ठसे उमटतात. यामुळेच आपल्यापेक्षा वयस्क आईला पिण्याचे पाणी हातात मागणारी,जेवणाचे ताट धुवायला लावणारी,आंघोळीनंतर स्वत:ची चड्डी बनियनही धुवायला लावणारी पिढी अजूनही अस्तित्वात आहे. एकीकडे ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ म्हणायचे आणि स्वतःचे ताट आईला धुवायला लावायचे.  यामध्ये  सर्वात वाईट म्हणजे आईने म्हातारपणाची काठी म्हणून धन्यता मानायची, ही संस्कृती आपल्यातला लिंगभेद कधीही नष्ट करणार नाही. त्यामुळे मुलगा असो की मुलगी लहानपणापासूनच घरकाम, खेळ, बालसंगोपन, आई-वडिलांच्या म्हातारपणाची जबाबदारी , आर्थिक निर्णयप्रक्रिया यामध्ये समान सहभागाची सवय लावणे गरजेचे आहे. किंबहुना घरातील वडिलांनी याबाबत आदर्श पुढे ठेवणे गरजेचे आहे.  

सहशिक्षण आणि परस्पर आदराची जाणीव ही समतेची पहिली पायरी आहे. शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणी ‘आपली मैत्रीण ही कुणाची तरी बहीण आहे’ आणि ‘आपल्या बहिणीलाही मित्र असू शकतो’ ही सहज आणि सन्मानपूर्वक मान्यता देणे,ती मुलांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर स्त्री व पुरुष या लिंगासोबत एक तृतीय लिंगी समाज आपल्याच घरातून तयार होतो.  अशा मुलांना, मुलगा किंवा मुलगी म्हणून नैसर्गिक बदलानुसार जगण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा तृतीय पंथीयांना देखील सन्मानाने जगण्याचा तुमच्या सारखाच अधिकार आहे, ही जाणीव मुलांना लहाणपणीच होणे आवश्यक आहे. ही जाणीव मुलांना संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनवते.

 वयात येणे ही प्रत्येक मुलगा आणि मुलगी यांच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. या विषयांवर घराघरांत मोकळेपणाने, वैज्ञानिक दृष्टीकोनातून चर्चा होणे आवश्यक आहे. लैंगिक शिक्षण ही संस्कृतीवरील घाला नसून नव्या विज्ञानवादी संस्कृतीची पायाभरणी आहे.माध्यमिक शिक्षणात प्रजनन आणि लैंगिक आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास गैरसमज, भीती आणि चुकीच्या समजुती दूर होऊ शकतात. अगदी लहान वयातच ‘गुड टच - बॅड टच’ याची माहिती मुलांना देणे हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा शिक्षणामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि ते स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम होतात.सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतामध्ये घरात होणाऱ्या लैंगिक शोषणाला, नात्यात होणाऱ्या लैंगिक शोषणाला या छोट्याशा गोष्टीमुळे पायबंद बसू शकतो, हे लक्षात घेण्याचाही आजचा दिवस आहे.

घरामध्ये आईची भूमिका या परिवर्तनात अत्यंत महत्त्वाची ठरते. आई ही केवळ कुटुंबाची आधारवड नसून मूल्यांची पहिली शाळा असते. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेद न करता दोघांनाही समान प्रेम, समान शिस्त, समान जाणीव आणि समान संधी देणे हे तिच्या हातात आहे. मुलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे, मुलींना स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य देणे, महिलांप्रती मुलांमध्ये आदर निर्माण करणे, या कृतीतून समतेचा पाया मजबूत होतो. कुणाचीही बहिण असो, तिच्यासोबत कसे वागावे, याचे बाळकडून प्रत्येक घरातील आईनेच देणे महत्वाचे आहे.  घरातून हा भेद नाकारला, घरातून त्यासाठी कृतीशील वस्तूपाठ अंमलात आला तर ‘निर्भया’ प्रकरणासारख्या घटना देशात घडणार नाही.  या पायाभरणीची शपथ घेण्याचाही आजचा दिवस आहे.

संपत्ती आणि वारसा या संदर्भातही समानतेची जाणीव रुजवणे आवश्यक आहे. 'बायकांना व्यवहारात ठेवू नये ', 'महिलांना व्यवहारातले काय कळते ', या पूर्वापार अंधश्रद्धांना दूर करण्याचाही आजचा दिवस आहे.

शेतीच्या काही गुंठ्यांसाठी सही करण्यापुरतीच बहिणीची भूमिका मर्यादित नाही, हे समजून घेतले पाहिजे. जमिनीच्या बाबत तिचे स्वप्न, तिची मेहनत आणि तिचे निर्णय यांनाही स्थान असायला हवे.  लहानपणापासूनच मुलींना आर्थिक साक्षरता, मालमत्तेची जाणीव आणि स्वावलंबनाचे शिक्षण देणे ही नव्या समाजव्यवस्थेची गरज आहे. यासाठी स्वतः आईने या समान हक्काची पेरणी लहानपणीच करण्याचा आजचा दिवस आहे.

कर्मकांड आणि रूढीपरंपरांमध्ये स्त्रियांच्या शुद्ध-अशुद्धतेच्या मान्यता आजही काही ठिकाणी आढळतात. परंतु नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया ही कोणत्याही प्रकारे अपवित्रतेचे लक्षण नाही. देवाला जर काही अपवित्र वाटले असते तर त्यांनी ही क्रियाच निर्माण केली नसती.त्यामुळे शुद्ध अशुद्ध हा भेद कर्मकांडातूनच निर्माण झाला आहे.मासिक पाळी हा स्त्रीदेहाचा नैसर्गिक भाग आहे. यावर खुली चर्चा झाली पाहीजे. या काळात स्त्रियांना वेगळे ठेवणे, त्यांच्या हातचे अन्न न खाणे किंवा धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊ न देणे या कालबाह्य समजुतींना आता तिलांजली देणे आवश्यक आहे. विज्ञाननिष्ठ, विवेकी आणि संवेदनशील दृष्टिकोन स्वीकारून अशा रूढींचा पुनर्विचार करणे हीच खरी संस्कृतीची प्रगती आहे. यातूनच आपली संस्कृती प्रगल्भ होईल. संस्कृती, धर्म, रुढी,परंपरांच्या नावाखाली ज्या घरांमध्ये हा अघोरी उच्छाद सुरू आहे, ती घरे सुसंस्कृत समजायची का यावर चिंतन करण्याचाही आजचा दिवस आहे.

सामाजिक व्यवहारातही समानतेची जाणीव महत्त्वाची आहे. मुलगी सासरी जाणे हीच एकमेव दिशा नसून घरजावई होणेही तितकेच सन्माननीय असू शकते, ही मानसिकता समाजात रुजवणे आवश्यक आहे. त्यामुळे जशी आपली मुलगी सासरी जाऊ शकते तसाच आपला मुलगा घर जावई जाऊ शकतो, हे सामाजिक सत्य बिंबविण्याचाही  आज दिवस आहे.

कार्यालयातील महिलांच्या पेहरावावर किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर उपरोधिक टिप्पणी करणे ही सवय थांबली पाहिजे. एखाद्या महिलेच्या पोशाखाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देणे हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अपमान तर आहेच, पण आपल्यातील समतेच्या शिक्षणातील उणीवही दर्शवते.परस्पर आदर आणि व्यावसायिकता ही आधुनिक समाजाची ओळख असली पाहिजे.

आजच्या भारतात अशी परिस्थिती निर्माण व्हावी की अर्ध्या रात्री एकटा जाणारा मुलगा आणि एकटी जाणारी मुलगी, या दोघांच्या सुरक्षिततेत कोणताही फरक उरू नये. ही सुरक्षितता केवळ कायद्याने नव्हे, तर घराघरातल्या संस्कारांनी निर्माण होते. मुलगा आणि मुलगी यांच्यातील अंतर कमी करून, त्यांना समानतेचे आणि सहजीवनाचे मूल्य शिकवूनच हा बदल साध्य होईल.तो बदल साधण्यासाठी वचनबद्ध होण्याचा आजचा दिवस आहे.

जगातील अनेक देशांनी लिंग समानतेच्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ स्वीडन, नॉर्वे, फिनलँड  या देशांमध्ये पालकत्व रजेचे धोरण स्त्री-पुरुष दोघांसाठी समान आहे. त्यामुळे मुलांची जबाबदारी केवळ आईची हा समज आपोआप कमी झाला. आइसलँड या देशाने समान कामासाठी समान वेतन हा कायदा कठोरपणे अंमलात आणला. न्यूझीलंडने राजकीय नेतृत्वात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवून सामाजिक दृष्टिकोनात बदल घडवून आणला. 

पाश्चात्त्य देशांमध्ये लिंगभेदाची समस्या पूर्णतः संपली असे म्हणता येणार नाही; परंतु ती कमी निश्चित झाली आहे. यासाठी वयाला अनुरूप लैंगिक शिक्षण अनिवार्य आहे. त्यामुळे शरीर, भावना आणि परस्पर आदर याबाबत खुला संवाद निर्माण झाला.  भारतीय घटनेनेही कलम 14 व 15 अन्वये लिंगभेद अमान्य केला आहे.

1908 मध्ये महिला कामगारांनी न्यूयार्कमध्ये समान हक्कासाठी लढा उभारला.  त्यातूनच 1911 पासून आस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनीत महिला दिनाची सुरुवात झाली.  संयुक्त राष्ट्राने 8 मार्च 1975 ला महिला दिनाला मान्यता दिली.  असा हा दीर्घ प्रवास आहे. त्यामुळे हा उत्सवाचा दिवस असावाच पण हक्काच्या लढयाची त्यामध्ये जाणीवही असावी.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारू या... आपल्या घरात, आपल्या वागण्यात, आपल्या शब्दांत समतेचा संदेश कितपत दिसतो? जर हा संदेश अजून अपुरा असेल, तर आजपासून त्याची सुरुवात करू या. मुलांच्या मनात आदर, संवेदनशीलता आणि समानतेची बीजे पेरू या. कारण आजची मुलेच उद्याचा समाज घडवणार आहेत. त्यामुळे लिंगभेद विरहित समाज घडविण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे.

त्यामुळे आजचा महिला दिवस साजरा करताना स्वतःच्या स्वातंत्र्य समता आणि प्रगती सोबतच आपल्या घरातील मुलांना देखील या बदलाचे साक्षीदार बनविण्यासाठी स्वतः महिलांनी प्रयत्न करणे पुरुषांनी देखील ही बाब समजून घेणे औचित्यपूर्ण ठरणार आहे.

चला तर ! घराघरातील मुलांना लिंग समानतेचा संदेश आपल्या वागण्यातून आणि संस्कारांतून देऊया. हीच खरी महिला दिनाची सार्थकता ठरेल.

 प्रवीण टाके 

 उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

9702858777

0000000



महिला दिन विशेष लेख     

दि.७ मार्च २०२६

घर आणि विश्व दोन्ही समर्थपणे सांभाळणारी स्त्रीशक्ती

आजचा काळ हा स्त्रीशक्तीच्या नव्या उभारणीचा काळ मानला जातो. समाजातील अनेक रूढी, परंपरा आणि मर्यादा ओलांडत आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. पूर्वी स्त्रीची भूमिका केवळ घरापुरती मर्यादित मानली जात होती; परंतु शिक्षण, आत्मविश्वास आणि संधी मिळाल्यामुळे आज स्त्री समाजाच्या सर्व क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहे.

आज भारतासह जगभरात स्त्रियांनी अनेक उच्च पदांवर काम करत इतिहास घडवला आहे. राष्ट्रपती पदापासून अंतराळवीरांपर्यंत, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, क्रीडापटू, कलाकार आणि राजकारणी अशा अनेक क्षेत्रांत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अंतराळ संशोधन, संरक्षण क्षेत्र, तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा अशा आव्हानात्मक क्षेत्रांमध्येही महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे आजची स्त्री पुरुषांच्या तुलनेत कुठल्याही बाबतीत कमी नाही, हे समाजाने मान्य केले आहे.

स्त्रीच्या कर्तृत्वाचा गौरव केवळ महिला दिनापुरता मर्यादित ठेवणे योग्य नाही. वर्षातील सर्व ३६५ दिवस तिच्या कष्टांचा आणि योगदानाचा सन्मान व्हायला हवा. कारण स्त्रीचे आयुष्य हे सततच्या जबाबदाऱ्यांनी व्यापलेले असते. ती आई, पत्नी, मुलगी, बहीण अशा अनेक नात्यांतून कुटुंबाची जपणूक करत असते. तिच्या त्यागामुळे आणि परिश्रमामुळेच कुटुंबाची आणि समाजाची घडी व्यवस्थित बसते.

कुटुंबाच्या जडणघडणीत स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मुलांना चांगले संस्कार देणे, कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे, घरातील आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थापन सांभाळणे या अनेक जबाबदाऱ्या ती समर्पणाने पार पाडते. विशेष म्हणजे आज अनेक महिला नोकरी किंवा व्यवसाय करत असतानाही घरातील जबाबदाऱ्या तितक्याच समर्थपणे सांभाळतात. त्यामुळे घर आणि बाहेर अशा दोन्ही आघाड्यांवर ती समतोल राखताना दिसते.

ग्रामीण भागातही महिलांची भूमिका दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत आहे. शेतीकामात पुरुषांबरोबर महिलाही खांद्याला खांदा लावून काम करतात. स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी आर्थिक स्वावलंबन मिळवले आहे. विविध लघुउद्योग, हस्तकला, अन्नप्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय अशा क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे.

शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यांची दृष्टीही व्यापक झाली आहे. आज डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, पत्रकार अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासात स्त्रियांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. कारण स्त्री सक्षम झाली तर कुटुंब, समाज आणि राष्ट्रही सक्षम होते.

तथापि, आजही काही ठिकाणी महिलांना सामाजिक असमानता, भेदभाव किंवा अन्यायाचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांना समान संधी, सुरक्षित वातावरण आणि सन्मान मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. महिलांच्या शिक्षणाला, आरोग्याला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन दिल्यास समाज अधिक प्रगत आणि समतोल होऊ शकतो.

एकूणच, स्त्री ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नसून समाजाच्या प्रगतीची प्रेरणाशक्ती आहे. तिच्या कष्टांचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान केवळ एका दिवसापुरता न ठेवता प्रत्येक दिवशी करणे आवश्यक आहे. स्त्रीला समान संधी आणि सन्मान देणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगत समाज ठरतो. स्त्रीशक्तीचा सन्मान आणि सशक्तीकरण हेच उज्ज्वल भविष्याचे खरे आधारस्तंभ आहेत.

अलका पाटील

उपसंपादक 

जिल्हा माहिती कार्यालय

नांदेड

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रीलस्पर्धा #WalkForWater #WaterConservationDay...