Monday, March 23, 2026

 वृत्त क्रमांक 350

सांस्कृतिक कार्य विभागाच्या "मोगरा फुलला" या कार्यक्रमास नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद - सभागृह केले हाऊसफुल 

ज्ञानेश्वर माऊलींना नांदेडकरांची मनोभावे मानवंदना

नांदेड दि. 21 मार्च :-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने प्रख्यात प्रभोधनकार श्री. गणेश शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीतून “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” या विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. १८ मार्च रोजी कुसुम सभागृह येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमास नांदेडकरांचा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात भक्तिमय वातावरणाची अनुभूती उपस्थितांना मिळाली.

या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून लाभलेल्या नांदेड चे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या महान ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, प्रेमभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे हे प्रभोधनकार गणेश शिंदे यांनी प्रभाविपणे मांडले. 

यानंतर अभंग, प्रवचन तसेच सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचा व विचारांचा वेध घेण्यात आला. “मोगरा फुलला” या संकल्पनेतून अध्यात्म, भक्ती आणि संस्कृती यांचा सुंदर संगम साकारण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संत ज्ञानेश्वरांनी दिलेला समानता, मानवता आणि अध्यात्माचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात विविध कलाकारांनी सादर केलेल्या अभंग व भजनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात रसिक नंतर एवढे मंत्रामुग्ध झाले कि रसिकांना अनेक दर्जेदार अभंग सादर करणाऱ्या गायिका सन्मित्रा शिंदे यांच्या अभंगावर रसिकांनी ठेका धरत ज्ञानेश्वर माऊली च्या जायघोषणे संपूर्ण सभागृह भक्तीमय केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार यांच्या यांच्या संकल्पनेतून व तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी व संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

सूंदर सादरीकरण, प्रभावी रंगमंच व्यवस्था, सभागृह परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्मिती व अचूक नियोजनाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे नांदेड मध्ये अध्यात्मिक वर्ग, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, तरुण वर्ग व इतर सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

00000













 वृत्त  

बुधवारी हदगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 23 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व वैराग्य मूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 25 मार्च 2026 रोजी  वैराग्य मूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधी साठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 25 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून वैराग्य मूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी  क्रमांक 02462-251674 व सतीष जिददेवाड 7038875544 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

 वृत्त  

आज मुखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 23 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व स्वा.से.रजितसिंग हरिसिंग चौहान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार 24 मार्च 2026 रोजी  येथे स्वा.से.रजितसिंग हरिसिंग चौहान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधी साठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी मंगळवार 24 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून स्वा.से.रजितसिंग हरिसिंग चौहान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी  क्रमांक 02462-251674 व हनुमंत रंगा 9764567456 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

 वृत्त 

ॲथलेटिक्स व टेबल टेनिस खेळासाठी २५ मार्च रोजी खेळाडू निवड चाचणीचे आयोजन 

नांदेड, दि. 23 मार्च :- राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्षवेध हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत नागपूर विभागास ॲथलेटिक्स व टेबल टेनिस या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरु करण्यास मान्यता मिळालेली आहे.

या विभागीय क्रीडा निपुणता केंद्र अंतर्गत अथलेटिक्स व टेबलटेनिस या खेळांच्या क्रीडा प्रकारची खेळाडू निवड चाचणीचे आयोजन २५  मार्च २०२६ या कालावधी मध्ये विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड मानकापूर, नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

खेळाडू निवड चाचणी कार्यक्रम खालीलप्रमाणे

अथलेटिक्स या खेळासाठी २५ मार्च २०२६ व दिनांक व वेळ कालावधी २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता इनडोअर हौंल विभागीय क्रीडा संकुल कोराडी, रोड मानकापूर, नागपूर. (श्रीमती इशिता रॉय, क्रीडा मार्गदर्शक) ६२०६४३८५८८ यांच्याशी संपर्क साधावा. 

टेबलटेनिससाठी (कालावधी २५ मार्च २०२६ ) व वेळ व कालावधी २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता इनडोअर हौंल विभागीय क्रीडा संकुल कोराडी, रोड मानकापूर, नागपूर (सुदर्शन मेसरे, क्रीडा मार्गदर्शक) ९९८८२३०६७८ याप्रमाणे आहे. 

मिशन लक्षवेध योजना अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग नागपूर येथील विभागस्तरीय क्रीडा निपुणता केंद्र अंतर्गत स्थापित होणाऱ्या निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडूंनी निवड चाचणी साठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सोबत आणायची आहेत.

जन्मदाखला, शाळा/महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र शाळा बोनाफाइड प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ 3 इ. 

खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था स्वतः करावयाची असून नागपूर विभागस्तरीय निपुणता केंद्राच्या निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्राकरिता निवड चाचणीचे आयोजन २५ मार्च २०२६ रोजी उपरोक्त नमूद ठिकाणी आवश्यक त्या साहित्यासह उपस्थित राहावे.

अधिक संपर्कासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावे

श्रीराज बलोदे क्रीडा अधिकारी (९८६०२०२२८५)

गौरव जोशी क्रीडा अधिकारी (९६६५४७४८२५)

स्वप्नील बनसोड क्रीडा अधिकारी(९८२२६८२६३९)

 निशांत पाटील राज्य क्रीडा मार्गदर्शक(९९२११११५५८)

00000

 वृत्त 

सुधारित

बीएलओ व बीएलए यांच्या समन्वयातून प्री एस आय आर मॅपिंग तात्काळ पूर्ण करा

 - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

नांदेड, दि. 23 मार्च :- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम 2025 च्या निमित्ताने नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष तालुका सचिव, सर्व नगरसेवक, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, रास्त भाव दुकानदार, पोलीस पाटील, निवडक बीएलओ आणि सर्व पर्यवेक्षक यांची कार्यशाळा आज संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बोलताना सांगितले, अद्याप निवडणूक आयोगाने एस आय आर (SIR) कार्यक्रम जाहीर केला नसला. तरी त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून सर्व मतदारांची 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग करणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक विभागाने पर्यवेक्षक आणि बीएलओ यांची यंत्रणा कामाला लावली आहे. त्या माध्यमातून सर्व मतदारांनी आपले नाव 2002 च्या मतदार यादीशी मॅप करून घेणे गरजेचे आहे. 

सदर काम केवळ बीएलओ यांच्या प्रयत्नातून पूर्ण होणे थोडे कठीण आणि वेळखाऊ असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आप-आपले बूथ लेवल एजंट (बीएलए) प्रत्येक मतदान केंद्रावर नेमल्यास बीएलओ आणि बीएलए यांच्या समन्वयातून मॅपिंगचे हे काम सुलभ आणि लवकर पूर्ण करणे शक्य होणार आहे. यासाठी रास्त भाव दुकानदार, पोलिस पाटील यांची सुद्धा मदत घेण्यात येणार असून मॅपिंगची टक्केवारी लवकरात लवकर 95 टक्केपर्यंत नेणे गरजेचे आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने यांनी एस आय आर नेमके काय आहे ? ते का आवश्यक आहे ? ते कसे करायचे आहे ? याबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना केले. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे मतदान नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी उपस्थित सर्व पर्यवेक्षक, पोलीस पाटील आणि रास्त भाव दुकानदार या सर्वांना पीपीटीच्या माध्यमातून एस आय आर निमित्त करावयाच्या कार्यवाहीचे प्रत्यक्ष सादरीकरण करून समजावून सांगितले. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाच्या संदर्भात राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना असणाऱ्या शंका कुशंका, विविध समस्या - प्रश्नांचे समाधान यावेळेस डॉ. खल्लाळ यांनी केले. 

यावेळी मॅपिंगचे अति उत्कृष्ट काम करणारे बीएलओ आणि त्यांचे पर्यवेक्षक यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सदर कार्यशाळेवेळी नांदेड उत्तरचे मतदार नोंदणी अधिकारी कोळेकर, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संजय वारकड, गट विकास अधिकारी, नांदेड मनपाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

या कार्यशाळेचे यशस्वी संयोजन नायब तहसीलदार नितीशकुमार बोलोलू यांनी केले. यावेळी कार्यशाळेचे सूत्रसंचालन अक्षय ढोके यांनी केले तर आभार नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी  मानले.

00000

  वृत्त क्रमांक 350 सांस्कृतिक कार्य विभागाच्या "मोगरा फुलला" या कार्यक्रमास नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद - सभागृह केले हाऊसफुल  ज्ञ...