Monday, October 12, 2026

वृत्त क्रमांक

 मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत

दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ 

वाढीव कालावधीचा नव मतदारांनी तसेच गणना पत्रक भरून न दिलेल्या मतदारांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांचे मतदारांना आवाहन 

नांदेड, दि. 12 ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (Special Intensive Revision – SIR) दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यानुसार, दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत दिनांक 12 ऑक्टोबर 2026 वरून 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

दिनांक 01 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करून राबविण्यात येत असलेल्या सदर कार्यक्रमांतर्गत दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने नागरिकांना आपले नाव व इतर तपशील तपासून घेता यावेत तसेच आवश्यक असल्यास दावे व हरकती दाखल करता याव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव व संबंधित तपशील तपासून घ्यावेत. मतदार यादीमध्ये नाव नसल्याचे किंवा नोंदींमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह दावा किंवा हरकत दाखल करावी.

 सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे

दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी दिनांक 31 ऑगस्ट 2026 ते 26 ऑक्टोबर 2026,

दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी 31 ऑगस्ट 2026 ते 10 नोव्हेंबर 2026,

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे 16 नोव्हेंबर 2026. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी पुढे आवाहन केले आहे की, सर्व पात्र मतदारांनी या मुदतवाढीची नोंद घेऊन दिनांक 26 ऑक्टोबर 2026 पूर्वी मतदार यादीत नोंद करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. तसेच, आपल्या कुटुंबातील सदस्य, परिसरातील नागरिक आणि पात्र मतदारांनाही मतदार यादीतील नोंदी तपासण्याबाबत माहिती द्यावी, जेणेकरून कोणताही पात्र मतदार मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून  वंचित राहणार नाही तसेच कोणताही अपात्र मतदार मतदार यादीत समाविष्ट होणार नाही 

भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी दिनांक 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासून घ्यावेत आणि आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

000000


वृत्त 

उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जी. श्रीकांत

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांची बैठक

छत्रपती संभाजीनगर, दि.१२ :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उमेदवारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त प्रताप काळे, मंजुषा मिसकर, देविदास टेकाळे व उमेदवार उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेबाबत काही तक्रारी किंवा सूचना असल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असेही श्रीकांत यांनी सांगितले.

या मतदारसंघात एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार असून, मतदानासाठी ८४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे ३५० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत ओळखपत्रे सादर करावीत. ओळखपत्राशिवाय मतदान केंद्रात प्रवेश मिळणार नाही. मतदान केंद्रात भ्रमणध्वनी व अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करण्यास मनाई आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मतदानाच्या ४८ तास आधी सर्व प्रकारचा निवडणूक प्रचार बंद करणे बंधनकारक आहे. या कालावधीत सभा, ऑनलाइन माध्यमांद्वारे प्रचार व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रचारात्मक कृती करता येणार नाहीत. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. छापील प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद करावा. जात, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर मतदारांमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या प्रचारास मनाई आहे. तसेच, मतदारांना प्रलोभने देणे, धार्मिक स्थळांवर प्रचार करणे, मतदानाची गोपनीयता भंग करणे व मतदान केंद्राजवळ प्रचार करणे प्रतिबंधित आहे. बोगस मतदानाची बाब निदर्शनास आल्यास तातडीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.

उमेदवारांच्या मदतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये तसेच मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले आहे. या ठिकाणावरून उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेतील सर्व आवश्यक सोयी सुविधा व मार्गदर्शन मिळेल. प्रसार माध्यमांसंदर्भातील जाहिरातींचा मजकूर तपासणे आवश्यक आहे. यासाठी माध्यम सनियंत्रण व प्रमाणन केंद्र कक्षातून परवानगी घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा उप निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत असून या आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून आवश्यक त्या परवानगी घेण्यात याव्या असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी वंदे मातरम् सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या तीन ते चार दिवस आधी प्रतिनिधींची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी. मतमोजणीसाठी ७० टेबल व टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल, असे एकूण ७१ टेबल असतील. 

प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक टेबलासाठी एक याप्रमाणे ७१ प्रतिनिधी नेमता येतील. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या विहित नमुन्यात अर्ज भरून ओळखपत्र घेणे आवश्यक आहे. मतमोजणीत आवश्यक मतसंख्या कोणत्याही उमेदवाराला न मिळाल्यास सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद करून त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीक्रमानुसार मतांचे हस्तांतरण केले जाईल. यावेळी सहआयुक्त प्रताप काळे व मंजुषा मिसकर यांनी निवडणूक प्रक्रिया, आचारसंहितेचे पालन, मतदान प्रतिनिधींची नियुक्ती, प्रचार साहित्याच्या मुद्रणाचे नियम व मतदानाच्या दिवशी पाळावयाच्या नियमांची माहिती दिली.

***








वृत्त क्रमांक

सेवासंकल्प अभियानांतर्गत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

• 15 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे आयोजन

• सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना संधी

• ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन

• दोन सत्रांत विविध चाचण्या व मार्गदर्शन

नांदेड (जिमाका), दि. 12 : सेवासंकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, अभिरुची, अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासह त्यांना शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील योग्य संधींची ओळख करून देण्यासाठी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन गुरुवार, दि. 15 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), नांदेड यांच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत बुध्यांक मापन, अभिवृत्ती चाचणी, व्यक्तिमत्त्व चाचणी, मानसशास्त्रीय समुपदेशन आणि डिजिटल साक्षरतेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेसाठी नांदेड तालुक्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधून इयत्ता दहावीतील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक शाळेतील प्रथम क्रमांकाचा एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आणि एकल पालक असलेला एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांचा समावेश असेल.

कार्यशाळेचे पहिले सत्र सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार असून, यामध्ये पूर्वपरीक्षा, बुध्यांक मापन, अभिवृत्ती चाचणी, व्यक्तिमत्त्व चाचणी आणि कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.

दुसरे सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत होईल. या सत्रात विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय समुपदेशन, शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन तसेच डिजिटल साक्षरतेविषयी माहिती देण्यात येणार आहे.

नांदेड तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी विहित मुदतीत पूर्ण करून घ्यावी. तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनीही दिलेल्या https://forms.gle/sQsUqUDm4nfErR2PA  या ऑनलाइन लिंकद्वारे आवश्यक माहिती भरुन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

***

वृत्त क्रमांक

सर्व शासकीय सेवा शंभर टक्के ऑनलाइन करून प्रशासन अधिक पारदर्शक करा-राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांचे निर्देश

• लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसह नांदेडला राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 12 : कार्यक्षम, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनासाठी सर्व शासकीय सेवा शंभर टक्के ऑनलाइन कराव्यात. ऑनलाइन सेवांमुळे कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवणे सुलभ होते. नागरिकांना पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना अधिसूचित शासकीय सेवांचा लाभ विहित कालमर्यादेत मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने नांदेड जिल्ह्याचे काम चांगले असून, जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले. जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीतील उत्कृष्ट आपले सरकार सेवा केंद्र, उत्कृष्ट ग्रामपंचायतस्तरीय आपले सरकार सेवा केंद्र आणि महानगरपालिकेच्या उत्कृष्ट सेवा केंद्रांना विभागीय व राज्यस्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारांसाठी सर्व संबंधित विभागांनी उत्कृष्ट कामगिरी करावी, असेही त्यांनी सांगितले.

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्राप्त अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी विभागप्रमुखांनी नियमित आढावा घेऊन पाठपुरावा करावा. विहित कालावधीत सेवा न मिळाल्याने प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाखल झालेली प्रकरणे सुनावणी घेऊन वेळेत निकाली काढावीत. प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी अधिनस्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा वार्षिक आढावा घ्यावा. तसेच अपील दाखल करणाऱ्या अर्जदारांना अर्जातील किंवा कागदपत्रांतील त्रुटी समजावून सांगून योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देश डॉ. जाधव यांनी दिले.

ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांकरिता निश्चित कार्यपद्धती तयार करावी. त्यांच्याकडे प्राप्त अर्जांचा तातडीने निपटारा होण्यासाठी नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यात पारदर्शक व गतिमान सेवा देऊन राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. तसेच आपले सरकार सेवा केंद्रांची प्रक्रिया पूर्ण करून नवीन सेवा केंद्रांना ओळख क्रमांक उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. 

या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांचा आढावा सादर केला.

***







वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...