वृत्त क्रमांक
सेवासंकल्प अभियानांतर्गत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
• 15 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे आयोजन
• सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना संधी
• ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन
• दोन सत्रांत विविध चाचण्या व मार्गदर्शन
नांदेड (जिमाका), दि. 12 : सेवासंकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, अभिरुची, अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासह त्यांना शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील योग्य संधींची ओळख करून देण्यासाठी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन गुरुवार, दि. 15 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), नांदेड यांच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत बुध्यांक मापन, अभिवृत्ती चाचणी, व्यक्तिमत्त्व चाचणी, मानसशास्त्रीय समुपदेशन आणि डिजिटल साक्षरतेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेसाठी नांदेड तालुक्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधून इयत्ता दहावीतील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक शाळेतील प्रथम क्रमांकाचा एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आणि एकल पालक असलेला एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांचा समावेश असेल.
कार्यशाळेचे पहिले सत्र सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार असून, यामध्ये पूर्वपरीक्षा, बुध्यांक मापन, अभिवृत्ती चाचणी, व्यक्तिमत्त्व चाचणी आणि कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.
दुसरे सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत होईल. या सत्रात विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय समुपदेशन, शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन तसेच डिजिटल साक्षरतेविषयी माहिती देण्यात येणार आहे.
नांदेड तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी विहित मुदतीत पूर्ण करून घ्यावी. तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनीही दिलेल्या https://forms.gle/sQsUqUDm4nfErR2PA या ऑनलाइन लिंकद्वारे आवश्यक माहिती भरुन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
***
No comments:
Post a Comment