Monday, October 12, 2026

वृत्त क्रमांक

 मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत

दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ 

वाढीव कालावधीचा नव मतदारांनी तसेच गणना पत्रक भरून न दिलेल्या मतदारांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांचे मतदारांना आवाहन 

नांदेड, दि. 12 ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (Special Intensive Revision – SIR) दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यानुसार, दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत दिनांक 12 ऑक्टोबर 2026 वरून 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

दिनांक 01 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करून राबविण्यात येत असलेल्या सदर कार्यक्रमांतर्गत दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने नागरिकांना आपले नाव व इतर तपशील तपासून घेता यावेत तसेच आवश्यक असल्यास दावे व हरकती दाखल करता याव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव व संबंधित तपशील तपासून घ्यावेत. मतदार यादीमध्ये नाव नसल्याचे किंवा नोंदींमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह दावा किंवा हरकत दाखल करावी.

 सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे

दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी दिनांक 31 ऑगस्ट 2026 ते 26 ऑक्टोबर 2026,

दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी 31 ऑगस्ट 2026 ते 10 नोव्हेंबर 2026,

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे 16 नोव्हेंबर 2026. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी पुढे आवाहन केले आहे की, सर्व पात्र मतदारांनी या मुदतवाढीची नोंद घेऊन दिनांक 26 ऑक्टोबर 2026 पूर्वी मतदार यादीत नोंद करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. तसेच, आपल्या कुटुंबातील सदस्य, परिसरातील नागरिक आणि पात्र मतदारांनाही मतदार यादीतील नोंदी तपासण्याबाबत माहिती द्यावी, जेणेकरून कोणताही पात्र मतदार मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून  वंचित राहणार नाही तसेच कोणताही अपात्र मतदार मतदार यादीत समाविष्ट होणार नाही 

भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी दिनांक 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासून घ्यावेत आणि आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...