Thursday, July 16, 2026

वृत्त क्रमांक   

एसआयआर कार्यक्रमासाठी मुदतवाढ मिळाल्याचा संदेश चुकीचा 

29 जुलैपर्यंतच गणना पत्रक (EF) जमा करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 16 जुलै : महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी मुदतवाढ मिळाल्याचा चुकीचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमास अद्याप कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.

त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी 29 जुलै 2026 पर्यंत संबंधित बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडे गणना पत्रक (Enumeration Form - EF) भरून जमा करावे व निवडणूक विभागास सहकार्य करावे.

याची सर्व पात्र मतदार, बूथ लेव्हल एजंट (BLA), लोकप्रतिनिधी तसेच निवडणूक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी.

तसेच, एसआयआर कार्यक्रमाबाबत कोणतीही अप्रमाणित अथवा चुकीची माहिती, दिशाभूल करणारे संदेश, वृत्त किंवा बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित अथवा शेअर करू नयेत. अधिकृत माहितीलाच प्राधान्य देऊन अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

000000

बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार ! पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' राबविण्यात येत आहे. पात्र शेतकरी बांधवांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

 2019 च्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची 50 हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेची अट रद्द.

आता 50 हजारांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा.
#पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
#कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत महत्त्वाचा निर्णय



गणना अर्ज कसा भरायचा ?

आपले किंवा आई-वडिलांचे नाव मागील SIR मध्ये आढळून न आल्यास, फक्त सही करून भाग २ अ. आणि भाग २ ब. रकान्यातील माहिती न भरता फक्त भाग ३ भरून अर्ज बीएलओंना सादर करावा
काही शंका असल्यास मतदार मदत क्रमांक १९५० संपर्क करा किंवा जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयास भेट द्या












वृत्त क्रमांक   

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा  

नांदेड, दि. 16 जुलै : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा शुक्रवार 17 जुलै 2026 रोजी नांदेड जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शुक्रवार 17 जुलै 2026 रोजी सकाळी 11.20 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 11.30 जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन व नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 12 वा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सोईनुसार नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.  

00000

वृत्त क्रमांक   

मध केंद्र योजनेतील (मधमाशापालन) पात्र व्यक्ती, संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 16 जुलै :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) कार्यान्वित झालेली असून पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, औद्योगिक वसाहत उद्योग भवन, एमआयडीसी एरिया शिवाजीनगर नांदेड यांचा दुरध्वनी क्रमांक 02462-240674 व 9689200239 या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

या योजनेचे वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. मध्य उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संर्वधनाची जनजागृती करणे.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत . वैयक्तीक माधपाळ पात्रता अर्जदारसाक्षर असावा. स्वताची शेती असल्यास प्राधान्य  वय 18 वर्षापेक्षा जास्त, 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य. 

केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ-व्यक्ती पात्रता- अर्जदार दहावी उत्तीर्ण, वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 

केंद्र चालक संस्था पात्रता संस्था नोंदणीकृत असावी . संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. तसेच 1 एकर शेत जमिन स्वमालकीची किंवा भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. 

अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. लाभार्थी निवड प्रक्रीयेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी स्पष्ट केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक   

हवामान खात्याचा इशारा 17 व 18 जुलै रोजी यलो अलर्ट जारी 

नांदेड, दि. 16 जुलै :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी  17 व 18 जुलै 2026 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. 17 व 18 जुलै  रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

आकाशात विजा चमकत असल्यास

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका:

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक   

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेतकऱ्यांच्या समृद्धीची सुवर्णसंधी

कमी खर्चात आधुनिक शेती ! शासनाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटीवर आजच अर्ज करा

नांदेड, दि. १६ जुलै : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी नांदेड जिल्ह्यास रुपये २६८.३६ लाखांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत फळबाग लागवड, रोपवाटिका, हरीतगृह, शेडनेट, शेततळे, कांदाचाळ, अळिंबी उत्पादन, मधुमक्षिकापालन, कृषी यांत्रिकीकरण, शीतगृह, पॅक हाऊस आदी विविध घटकांवर आकर्षक अनुदान उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार राधाकृष्ण कळसाईत यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत आधुनिक आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी अनेक घटकांचा समावेश करण्यात आला आहे. खाजगी क्षेत्रात लहान व मोठ्या रोपवाटिकांसाठी, विविध फळपिकांच्या लागवडीसाठी, अळिंबी उत्पादन व बीज उत्पादन केंद्रासाठी, कंपोस्ट युनिट, सुगंधी व औषधी वनस्पती लागवड, फुलशेती, मसाला पिके, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक व वैयक्तिक शेततळे, हरीतगृह, शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, तण नियंत्रक अच्छादन, मधुमक्षिकापालन, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, विविध स्प्रेअर्स, फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र तसेच कमी खर्चाच्या कांदाचाळ/लसूण साठवणूक गृहासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. अर्जांची निवड “प्रथम अर्ज – प्रथम लाभ” या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी जातीचे प्रमाणपत्र आणि फार्मर आयडी आवश्यक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी (मोका तपासणी) झाल्यावर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच संबंधित घटकांसाठी अर्ज केले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

योजनेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार राधाकृष्ण कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक   

नासाडी थांबवा, नफा वाढवा  आजच महाडीबीटीवर अर्ज करा आणि हक्काची कांदाचाळ उभारा

नांदेड, दि. 16 जुलै : राज्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी शास्त्रशुद्ध साठवणुकीअभावी मोठ्या प्रमाणात कांदा सडून नुकसान होते. यावर उपाय म्हणून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात कमी खर्चाच्या कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार राधाकृष्ण कळसाईत यांनी केले आहे.

सध्या अनेक शेतकरी कांदा जमिनीवर पसरवून किंवा स्थानिक पातळीवर तयार केलेल्या चाळीत साठवतात. त्यामुळे कांदा सडणे, गुणवत्तेत घट होणे आणि टिकाऊपणा कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारल्यास कांद्याची गुणवत्ता टिकून राहते, साठवणुकीतील नुकसान कमी होते आणि बाजारभाव अनुकूल असताना विक्री करून अधिक नफा मिळविता येतो.

योजनेअंतर्गत ५ ते १००० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळ किंवा लसूण साठवणूक गृहासाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

अनुदानाचा तपशील

५ ते २५ मे.टन क्षमता : प्रकल्प खर्च रु. ८,००० प्रति मे.टन, अनुदान कमाल रु. ४,००० प्रति मे.टन.

२५ ते ५०० मे.टन क्षमता : प्रकल्प खर्च रु. ७,००० प्रति मे.टन, अनुदान कमाल रु. ३,५०० प्रति मे.टन.

५०० ते १००० मे.टन क्षमता : प्रकल्प खर्च रु. ६,००० प्रति मे.टन, अनुदान कमाल रु. ३,००० प्रति मे.टन.

प्रकल्प खर्च रु. ३० लाखांपेक्षा अधिक असल्यास बँक कर्ज घेणे अनिवार्य असून, अर्थसहाय्य क्रेडिट लिंक्ड बॅक-एंडेड सबसिडी स्वरूपात उपलब्ध होईल.

पात्रता

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे, ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे आणि प्रत्यक्ष कांदा पीक घेण्यात आलेले असणे आवश्यक आहे. तसेच वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी गट, महिला गट, स्वयं-सहायता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), नोंदणीकृत कृषी संस्था, सहकारी संस्था व सहकारी पणन संघ यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक   

'व्यसनमुक्त युवा -विकसित भारत' अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन

नांदेड दि. 16 जुलै :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत, जिल्हा युवा केंद्र, नांदेड यांच्या वतीने 'व्यसनमुक्त युवा – विकसित भारत' या राष्ट्रीय अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन शुक्रवार २४ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे.

युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धांचा उद्देश आहे.

स्पर्धांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत

रील / लघुपट स्पर्धा (Reel / Short Film) (one combined category), संगीत / रॅप स्पर्धा (Music / Rap), थीम आधारित नृत्य स्पर्धा (Thematic Dance), नुक्कड नाटक (पथनाट्य) स्पर्धा, स्लॅम पोएट्री स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य लेखन स्पर्धा, वक्तृत्व/वादविवाद स्पर्धा इ.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी MY Bharat पोर्टलवरील नोंदणी लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख २२ जुलै २०२६ असून, काही निवडक प्रकरणांमध्ये जागेवर (Spot Registration) नोंदणीची सुविधा उपलब्ध राहील.

जिल्हास्तरावरील विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, एनएसएस स्वयंसेवक, माय भारत स्वयंसेवक तसेच १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या अभियानाला यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

मोबाईल : 8856003405

ई-मेल : mybharatnanded@gmail.com

ऑनलाइन नोंदणी : "https://mybharat.gov.in/events/nasha_mukt_yuva" (https://mybharat.gov.in/events/nasha_mukt_yuva)

00000

अन्न असो किंवा औषध, फक्त बोला तक्रार आपोआप तयार होईल..

अधिक माहितीसाठी https://complaints.mahafda.in
या संकेतस्थळाला भेट द्या.
भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट, निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार नोंदवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला — तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल.
अन्न सुरक्षा असो वा औषध सुरक्षा — दोन्ही तक्रारींसाठी एकच व्यासपीठ.
तक्रार नोंदवण्यासाठी: https://complaints.mahafda.in
एका क्लिकवर तक्रार सबमिट करा आणि तिची स्थिती ट्रॅक करा. तुमची जागरूकता म्हणजेच सर्वांची सुरक्षा. आजच तक्रार नोंदवा.



  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी