Monday, June 22, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजुरकर विजयी

मतमोजणी शांततेत व सुरळीत संपन्न

नांदेड, दि. 22 जून :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर यांना विजयी घोषित करण्यात आले. विजयी उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी आज येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे पार पडली. मतमोजणीनंतर अमरनाथ राजूरकर यांनी 339 मताधिक्य मिळवत विजय संपादन केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जाहीर केले. यावेळी निवडणूक निरिक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे या उपस्थित होत्या.

नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर व अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील, प्रशांत इंगोले असे एकूण 3 उमेदवार होते. या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 452 पैकी 451 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मतमोजणी आज नियोजनच्या भवनच्या कॅबिनेट हॉल येथे कडेकोट बंदोबस्तात तसेच शांततेत व सुरळीत पार पडली.

मतमोजणीपुर्वी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांना निर्देश दिले. यावेळी उमेदवार तसेच मतमोजणी प्रतिनीधीही उपस्थित होते. तीन टेबलवर मतमोजणी अधिकारी, सहायक अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत 428 मते वैध ठरली. त्यापैकी अमरनाथ राजूरकर यांना 339 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील यांना 84 तर प्रशांत विराज इंगोले यांना 5 मते मिळाली. मतमोजणीत 23 मते अवैध ठरविण्यात आली.

मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना विजयी घोषित केले. यावेळी निवडणूक निरिक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्यासह मतमोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनुमंत कोळेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसिलदार संजय वारकड आदींसह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मतमोजणी प्रक्रिया तसेच स्थानिक प्राधिकारी निवडणुकीची सर्वच प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी तसेच विविध घटकांचे उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने यांनी आभार मानले.                                                                        

00000




Sunday, June 21, 2026

वृत्त क्रमांक 

उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदल - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

नांदेड दि. 21 जून :- यंदा जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला असून अद्याप आवश्यक तेवढा पाऊस पडला नाही तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्वच भागात उन्हाची  तीव्रता अधिक असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा कॉलेज सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत 22 जून सोमवार पासून भरविण्यात येणार आहेत असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.

त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या मराठी इंग्रजी उर्दू राज्य मंडळ सीबीएससी व इतर मंडळाच्या सर्व शाळा व्यवस्थापन यांनी याची नोंद घेऊन 22 जून 2026 सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळेचे वर्ग सकाळी आठ ते साडेबारा यावेळेत भरविण्यात यावेत असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

000000

वृत्त क्रमांक 

नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

•  अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

•  मतमोजणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक

नांदेड, दि. 21 जून : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सोमवार, दि. 22 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनच्या कॅबिनेट हॉल येथे होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात संपन्न झाले.

यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिकारी-कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना देवून, मतमोजणीपर्यंत सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमास सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनुमंत कोळेकर,  नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी भोकर प्रविण मेगशेट्टी, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसिलदार संजय वारकड आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी व नांदेड उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती दिली. मतमोजणी केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतपत्रिकांची तपासणी, मतांच्या वैधतेबाबतचे निकष, निकाल नोंदविण्याची पद्धत तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मतमोजणीदरम्यान घ्यावयाची काळजी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने राबविण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मतपत्रिकांची छाननी, मतमोजणी व नोंदणीची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन आणि अन्य आवश्यक बाबींची तयारी पूर्ण करण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

00000








 वृत्त क्रमांक

मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू 

नांदेड दि. 21 जून :- नांदेड जिल्ह्यात विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षीक निवडणूक-2026 मतमोजणीच्या दिवशी सोमवार 22 जून 2026 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमीत केला आहे. 

या आदेशानुसार या निवडणुकीच्या मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया ही ज्या मतमोजणी केंद्रावर होणार आहे त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यांच्या वापरास व मतमोजणी कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे.

हा आदेश मतमोजणीची कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोमवार 22 जून 2026 रोजी उक्तप्रमाणे मतमोजणी परिसरात, मतमोजणी सुरू झाल्यापासून मतमोजणीचा कार्यक्रम पूर्ण होईल तो पर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक

12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न 

“करो योग रहो निरोग” नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे - पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप

नांदेड  दि. 21 जून:- नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे. सर्वांनी या योग दिनाच्या औचीत्याने नियमीत योगा करुन आपले आरोग्य सुदृढ करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. 

यावेळी  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ‘करो योग रहो निरोग’ 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्य सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश होते.  मा.पंतप्रधान महोदयांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी  21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. योगा दिनाच्या निमीत्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती अंगीकारणे, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण, योगा हा आपल्या भारतीय संस्कृती वारसाचा अविभाज्य घटक आहे.

आयुष मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, युवा अधिकारी माय भारत, लोकत समुह सखी मंच, योग विदया धाम, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिवींग या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा योग संघटना, नांदेड, योग विद्येचा प्रसार करणाऱ्या स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी व विविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून, 2026 रोजी सकाळी 7 वा. पोलीस कवायत मैदान, वजिराबाद, नांदेड येथे या 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेवे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट डॉ. बी. सरवणन, पोलीस उपअधिक्षक श्रीमती अश्विनी जगताप, युवा अधिकारी, युवा भारत श्रीमती अस्नी कनकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, सहा. आयुक्त, समाजकल्याण शिवानंद मिनगीरे,  लोकमत वृत्त संपादक राजेश निस्ताने, लोकमत उप सरव्यवस्थापक रमेश तावडे,  जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे,  उपशिक्षणाधिकारी माध्य. रामचंद्र पाचंगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सर्व उपस्थित मान्यवरांचे शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.

याप्रसंगी पतंजली योग समिती, योग विदया धाम, व आर्ट ऑफ लिवींग यांचे मार्फत उपस्थितांना आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या प्रोटोकाल नुसार राम शिवपनोर (अध्यक्ष भारत स्वभीमान), सौ. महानंद माळगे (सोशल मिडीया), नागोराव पोलादवार (योगा प्राध्यापक), विठठल तुम्मोड (योग अध्यापक), श्रीमती सारिता जोशी (योग शिक्षक), शिवा बिरकले (आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक, श्रीश्री योगा क्षेत्रीय समन्वयक), डॉ. प्रियंका गंगातिरे आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसेवक आदीनी योगासनाचे धडे दिले. याप्रसंगी पंढरीनाथ कंठेवाड, महारुद्र माळगे, डॉ. सायन्ना मठठमवार, श्रीमती कविता आष्टुरकर, ॲड. मणिकुमारी बत्तूला (डांगे) व स्नेहल कोळणुरकर आदीनी योगसाधकाच्या कृतीमधील सुधारणा करण्याचे काम केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्रीमती सपना भागवत (लोकमत समुह) यांनी तर आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन बालाजी शिरसीकर यांनी केले.

या योग दिन कार्यक्रमासाठी जिल्हयातील ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कुल, नांदेड, ऑक्सफर्ड द इंग्लिश मेडीय स्कुल, गुरुकुल इंग्लिश मे.स्कुल, पिनॅकल इंटरनॅशनल स्कुल,नांदेड, नेहरु इंग्लिश स्कुल, नांदेड, केंब्रीज हायस्कुल, नांदेड, इंदिरा इंटरनॅशनल स्कुल, नांदेड व विविध शाळा/संस्थेतील विदयार्थी, जिल्हयातील एकविद्य क्रीडा संघटनेचे खेळाडू मुले-मुली व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र महिला पोलीस संघ, नांदेड जिल्हा स्काऊटस व गाईडस यांची विशेष उपस्थितीत होती तसेच  जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी/ कर्मचारी, नांदेड जिल्हा योग संघटना व योग विद्येचा प्रसार करणा-या स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी व योगप्रेमी आदीनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यासन प्रमुख राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, क्रीडा ‍अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपुल दापके, जिल्हा संघटक गाईड श्रीमती रुपाली मुधोळकर, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, कु. रोहीणी घंटेवाड, संजय चव्हाण, हनमंत नरवाडे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, यश कांबळे, आदिनी सहकार्य केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000











Friday, June 19, 2026

 वृत्त क्रमांक

एल निनोच्या पार्श्वभुमीवर पेरणी व पिक पध्दतीत बदल करावा - दत्तकुमार कळसाईत (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

सोयाबीन उत्पादन खर्चात बचतीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

नांदेड दि.१९ जून:- खरीप हंगामामध्ये सोयाबीन लागवडीचा उत्पादन खर्च कमी करून अधिक नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

हवामानातील अनिश्चितता व वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांनी मुलस्थानी जलसंधारण उपाययोजना राबवून पावसाचे पाणी शेतातच अडवावे व जमिनीत मुरवावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

तसेच कमी कालावधीच्या सुधारित सोयाबीन वाणांची निवड केल्यास पिकावरील जोखीम कमी होऊन उत्पादनात स्थिरता मिळू शकते. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध होतात व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करता येते.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार व पुरेशी ओल उपलब्ध झाल्यानंतरच पेरणी करावी. घाईघाईने केलेली पेरणी उगवण व उत्पादनावर विपरीत परिणाम करू शकते.

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक असून त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. तसेच शिफारशीनुसार प्रक्रिया केलेले घरचे बियाणे वापरल्यास बियाणे खरेदीवरील खर्चात मोठी बचत होऊ शकते.

खरीप हंगामावर एल निनोचे गंभीर सावट निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा लहरीपणा, खंड पडणे, सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी विभागाचा वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. 

पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पीक पेरणीचा काटेकोर नियोजन करावे. कमी कालावधीत येणाऱ्या पिकाची लागवड करावे.

यावर्षी खरीप हंगामात पेरणी करताना नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय खरीप पिकाची पेरणी करू नये असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. पाण्याची योग्य नियोजन करूनच पेरणीच्या कामाला प्राथमिकता घेणे गरजेचे आहे.

पीक विमा काढा

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून जसे अतिवृष्टी, कमी पाऊस, पावसाचा खंड व कमी उत्पादन यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पिकांचा विमा उतरवणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

शेतकऱ्यांनी नियोजन करूनच पेरणी करावी

एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा लहरीपणा, सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने यावेळी वर्तवली आहे. शेतकरी बांधवांची आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून काटेकोर नियोजन करूनच खरीप हंगामाला सुरुवात करणे सोयीचे राहणार आहे. शक्यतो शेतकऱ्यांनी घाई गडबड करू नये. मुख्य पिकांची पेरणी पुरेशा प्रमाणात (किमान ७५ ते १०० मिलिमीटर) पाऊस झाल्याशिवाय करू नये. पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने कमी कालावधीच्या पिकांची लागवड करणे सोयीचे होणार आहे.

आंतरपिक पद्धतीचा अवलंब करा

यावर्षीच्या खरीप हंगामात कमी दिवसात निघणारे आणि पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातीच्या बियाणांची निवड करणे फायदेशीर ठरणार आहे. जोखीम कमी करण्यासाठी वारंवार एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरणार आहे. नांदेड जिल्हयातील जलशिवाराच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. पाणी आडवा धोरण शेतकऱ्यांनी अंगी करावे. शेतामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनाचा शक्य तिथे वापर करणे हितावह ठरणार आहे.

पीक संरक्षण व खताचे व्यवस्थापन

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट राहणार आहे. संभाव्य नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी पीक संरक्षण व खत व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी खतांचा संतुलित वापर करावा. पावसाचा ताण असताना रासायनिक खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर करू नये. शक्यतो सेंद्रिय खते, कंपोस्ट आणि निंबोळी पेंडीच्या वापर करणे फायदेशीर ठरणार आहे.

खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने, हवामानाचा अंदाज व कृषी विषयक मार्गदर्शनासाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन शेतकरी बांधवांनी घ्यावे असे कृषी विभागाने कळविले आहे.

०००००

वृत्त क्रमांक

अन्न व औषध प्रशासनाची गुटखा-पानमसाला या प्रतिबंधित अन्नपदार्थांवर धडक कारवाई

नांदेड दि. 19 जून :- अन्न व औषध  प्रशासन, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशान्वये गुटखा-पानमसाला  या प्रतिबंधित खाद्य पदार्थाची नांदेड शहरात गुप्त माहितीच्या आधारे शोध घेवून गुरुवार 18 जून 2026 रोजी मे. गोल्डन जर्दा स्टोअर्स, पैलवान टी हाऊस जवळ, इतवारा नांदेड या पेढीवर धाड टाकण्यात आली.  सदर धाडीमध्ये एकूण 34 प्रकारच्या प्रतिबंधित खाद्यपदार्थाचा साठा ज्यामध्ये रजनीगंधा पानमसाला, विमल पानमसाला, राजनिवास सुगंधीत पानमसाला, सागर पानमसाला, मुसाफीस पानमसाला, गोवा 1000, आरएमडी पानमसाला, व्हीवन चेविंग टोबॅको, मिराज जाफरानी जर्दा, वजीर गुटखा, एम सेटेंड टोबॅको,सिंगनिचर पानमसाला इत्यादि 9 लाख 86 हजार 017 रूपये एवढया किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. 

विक्रेता व पुरवठादार अशा एकूण 02 व्यक्तींविरूध्द इतवारा पोलीस स्टेशन, नांदेड येथे प्रथम खबरी अहवाल क्रमांक  0209/2026 दि. 19 जून 2026 नोंदविण्यात आला असून सदरील पेढी सिल करण्यात आलेली असून पुढील तपास इतवारा पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.   

सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अमृता दुधाटे, अरूण तम्मडवार, अ. नं. ‍गिरी, श्रीमती  शिल्पा श्रीरामे, तुषार घोपे, कृष्णा मुळे व वैभव ढोंबरे यांच्या पथकाने सहायक आयुक्त  रा. मा.भरकड व अनंत चौधरी यांचे व छत्रपती संभाजीनगर  विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांचे मार्गदर्शखाली पार पाडण्यात आली. 

00000




 वृत्त क्रमांक

23 जुन रोजी “जागतिक ऑलिम्पिक डे” रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन  

नांदेड दि. 19 जून :- जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलिम्पिकची स्थापना ग्रीस येथे बॅरन पियरे डी कौबर्टिन यांनी केली. “आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) स्थापना 23 जून, 1894 साली झाली. पहिल्या आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात 06 एप्रिल, 1896 रोजी झाली. जगातील सुमारे 200 पेक्षा अधिक देशाचे ऑलिम्पिक संघ हे जागतिक ऑलिम्पिक समिती स्थापनेचा दिवस म्हणुन 23 जून रोजी ऑलिम्पिक डे साजरा करतात. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे “भारतीय ऑलिम्पिक संघ” व राज्याचे “महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन” हे सन 1952 सालापासून “ऑलिम्पिक डे” व ऑलिम्पिक सप्ताह साजरा करीत आहे.

त्यानुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, ऑलिम्पिक असोसिएशन, नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना (सर्व) यांच्या संयुक्त विदयमाने नांदेड जिल्हयात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन पुढीलप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे.

जागतीक " ऑलिम्पिक डे रॅली" आयोजन 23 जुन, 2026 सकाळी 7 वा. उपस्थिती स.6.30 वा. (आयटीआय चौक,नांदेड) रॅली मार्ग - महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आयटीआय चौक येथून सुरुवात – शिवाजी नगर मार्गे- बसस्टँड- कला मंदीर- वजिराबाद चौक- छ. शिवाजी महाराज पुतळा – जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे समारोप होणार आहे. जागतीक ऑल्मिपिक डे रॅलीस मान्यवरांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात येणार आहे.

याकरीता नांदेड जिल्हयातील सर्व शाळेतील  खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, विविध कार्यालयातील शासकीय अधिकारी/ कर्मचारी तसेच सर्व नागरीकांना या रॅलीमध्ये उत्सफुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

तसेच नांदेड जिल्हयातील सर्व शाळा/ क.महाविदयालयामध्ये 23 जुन,2026 रोजी आंतरराष्ट्रीय ऑल्मिपिक दिन निमीत्त चर्चा सत्र, परिसंवाद, कार्यशाळा तसेच विविध गुणवंत खेळाडूंचा सत्कार व शाळास्तरावर विविध खेळाचे आयोजन करुन साजरा करावा असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक

केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने 'आंतरराष्ट्रीय योग दिन' विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि. 19 जून:- केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, नांदेड  आणि योग विद्याधाम  नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी, शारिरीक आरोग्य असो की मानसिक आरोग्य तसेच तनावपूर्ण जीवनात आनंद मिळवण्यासाठी निरंतर योग अभ्यास करणे, तसेच  संपूर्ण जगाला योगाचे महत्व पटवून  देण्यासाठी 21 जून हा दिन जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  आंतराष्ट्रीय योग दिन 2026 चे ब्रि‍दवाक्य  "Yoga for Healthy Ageing."  हे असून या दिनाचे महत्व लक्षात घेऊन योग अभ्यास व विविध कार्यक्रमांनी हा साजरा करण्यात येणार आहे. 

शहरातील विमानतळरोडवरील शिव मंदिर येथील सभागृहात 21 जून रोजी सकाळी ठीक 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमात योग साधकांना आणि नागरिकांना योगाचे धडे गिरवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या विशेष कार्यक्रमात योग विद्याधामचे प्रसिद्ध योगाध्यापक त्र्यंबक गायकवाड आणि सहशिक्षक प्रभाकर रेनगुंटवार उपस्थितांना योगासनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर  सामाजिक कार्यकर्ते आनंद कल्याणकर यांचे ‘आरोग्य आणि जीवनशैली’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला विश्वनाथ रेनेवाड, श्रीमती शंकुतला कलंबरकर, श्रीमती मंगला जोंधळे श्रीमती कविता आष्टुरकर आदी  योग अभ्याणसकांची प्रमुख उपस्थीती असणार आहे. 

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी परिसरातील नागरिक, तसेच युवकांनी  या योग शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूतरोचे प्रसिध्दी प्रमुख  सुमीत दोडल तर योग विदयाधामचे प्रमुख नागोराव पोलादवार यांनी केले आहे.

00000




 वृत्त क्रमांक

औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरु

दिनांक दि. 19 जून :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट-2026 सत्रासाठीची प्रवेश प्रक्रीया 21 मे 2026 पासुन  आयटीआय Admission Portal: https://admission.dvet.gov.in या  संकेतस्थळावर सुरु करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्हयातील युवक व युवती ( उमेदवारांनी ) यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज व निश्चितीकरण करण्याचे आवाहन श्री. गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे. यासाठी दहावी उत्तीर्ण अथवा अनुर्तीर्ण इच्छुक विद्यार्थी अर्ज करु शकतात असेही कळविले आहे. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दती व माहीती पुस्तीका ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर Download Section मध्ये पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रकियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एकुण 83  प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात असुन त्यांची एकुण वार्षिक प्रवेश क्षमता जवळपास एक लक्ष ऐवढी आहे. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणीचे तसेच आधिकचे तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासाच्या तुकडया समाविष्ठ करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था अधुनिकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्या वेतनात वाढ करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गात उमेदवारासाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्वी योजनाही लागु करण्यात आलेली आहे. दहावी अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता  करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. 

दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आयटीआय मधुन व्यवसायिक शिक्षण पुर्ण करुण त्वरित रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे.

श्री. गुरु गोबिंदसिघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड, येथे प्रवेश सत्र ऑगस्ट - 2026 करीता एकुण - 23 व्यवसायाच्या 38 तुकडया अंतर्गत 816 जागा करीता प्रवेश उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 8 व्यवसाय 10 वी उत्तीर्ण / अनुउत्तीर्ण पात्रतेवर तर 15 व्यवसाय 10 उत्तीर्ण पात्रतेवर प्रवेशासाठी उपलब्ध आहे. प्रवेच्छुक उमेदवारांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पदधतीने अर्ज व प्रवेश शुल्क भरावे व नंतर नजीकच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन अर्ज निश्चीत करणे आवश्यक आहे. अर्ज निश्चीतीकरण केल्यानंतरच उमेदवारांना व्यवसायाची निवड करता येणार आहे.

00000

 वृत्त क्रमांक

नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम;

स्थलांतरित मजुरांसाठी 'आरोग्य साथी' प्रशिक्षण संपन्न

नांदेड नांदेड दि. 19 जून : नांदेड जिल्ह्यातील हजारो मजूर दरवर्षी आपल्या कुटुंबासह ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. या स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना फडावरच तातडीने प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'आरोग्य साथी' हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

नुकतेच नांदेड येथे 'आरोग्य साथी प्रशिक्षण पुस्तिका' आणि नियोजित आराखड्यानुसार 'आरोग्य साथी' प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.

या विशेष आरोग्य शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी उपस्थित होत्या. प्रशिक्षण सत्रादरम्यान डॉ. सलमा हिराणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना 'आरोग्य साथी' उपक्रमाची गरज आणि मजुरांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती दिली. स्थलांतरादरम्यान मजुरांना भेडसावणारे विविध आजार, लहान मुलांचे व महिलांचे आरोग्य, कुपोषण, तसेच फडावरच द्यावयाचे प्राथमिक उपचार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाला श्रीमती बेरलीकर (PHN - पब्लिक हेल्थ नर्स) व रफिक शेख (HA - हेल्थ असिस्टंट) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आरोग्य साथींना तांत्रिक व व्यावहारिक कामांविषयी मोलाचे धडे दिले.

या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील हदगाव, मुखेड आणि तुपा या भागांतून मोठ्या संख्येने 'आरोग्य साथी' (आरोग्य स्वयंसेवक) उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान 7 सर्व आरोग्य साथींना आरोग्याची काळजी घेणे, प्रथमोपचार किटचा वापर करणे आणि गंभीर परिस्थितीत रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात रेफरल सेवा कशी उपलब्ध करून द्यायची, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हा परिषद नांदेडच्या आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या विशेष उपक्रमामुळे स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या आरोग्य सुविधेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

00000



वृत्त क्रमांक

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासा

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन 

नांदेड दि. 19 जून:-  खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घरचे अथवा बाजारातून खरेदी केलेल्या बियाण्यांची पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

यंदा अलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने उपलब्ध बियाण्यांची गुणवत्ता व उगवण क्षमता तपासणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

उगवण क्षमता चाचणीमुळे बियाण्याच्या दर्जाबाबत खात्री मिळते. तसेच संबंधित बियाणे पेरणीयोग्य आहे की नाही, हेही समजते. त्यामुळे आवश्यक बियाण्याचे प्रमाण निश्चित करता येते आणि प्रती एकर आवश्यक रोपसंख्या राखणे शक्य होते, असे जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सांगितले. उगवण क्षमता आधीच तपासल्यामुळे निकृष्ट अथवा कमी उगवण असलेले बियाणे ओळखता येते. त्यामुळे नवीन बियाण्याची वेळेत व्यवस्था करून संभाव्य नुकसान टाळता येते. तसेच बियाण्यावर होणारा अनावश्यक खर्च वाचतो आणि दुबार पेरणीची वेळ येत नाही. चांगली उगवण झाल्यास शेतातील सर्व रोपे जवळपास एकाच वेळी उगवतात. परिणामी पिकाची वाढ, फुलोरा व परिपक्वता एकसमान होऊन पिकाची जोमदार वाढ होते.

अशी करा गोणपाट पद्धतीने उगवण क्षमता चाचणी

बियाण्यातून १०० दाण्यांचा नमुना निवडा. हे दाणे ओल्या गोणपाटामध्ये व्यवस्थित गुंडाळा. गोणपाट सावलीत किंवा उबदार ठिकाणी ठेवा. 4.6 ते 7 दिवस गोणपाट ओलसर राहील याची काळजी घ्या व अधूनमधून पाणी शिंपडा. निर्धारित कालावधीनंतर रुजलेल्या बियांची संख्या मोजा. ७० किंवा त्यापेक्षा अधिक बिया उगवल्यास संबंधित बियाणे पेरणीसाठी योग्य व दर्जेदार समजले जाते.

उगवण क्षमता तपासणीचे फायदे

निकृष्ट व कमी उगवणक्षम बियाणे ओळखता येते. पर्यायी बियाण्याची वेळेत व्यवस्था करता येते. दुबार पेरणी व आर्थिक नुकसान टाळता येते. आवश्यक रोप संख्या राखणे शक्य होते.

पिकाची वाढ, फुलोरा व परिपक्वता एकसमान होते. उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. बियाण्यावरील अनावश्यक खर्च टाळता येतो.

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह बियाणे खरेदी करून पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी करावी” असे आवाहन दतकुमार कळसाईत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी

आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा

नांदेड दि. 19 जून:- महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ चा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था शाहुराज हिरे यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने ही कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार आहे.

योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे. तसेच सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करुन नियमानुसार विहित वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनी ‘एक रक्कमी समझोता’ योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यास ते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे थकीत पीक कर्ज असल्यास, शासनाच्या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

माहिती अपूर्ण असल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि जमीन नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. तसेच मयत खातेदारांच्या वारसांची नोंद पूर्ण करावी. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

Thursday, June 18, 2026

 वृत्त क्रमांक

नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

नांदेड दि. 18 जून :- नीट (युजी)-2026 प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधित वस्तूच्या वापरांवर प्रशासनाचे कडक लक्ष असून, इलेक्ट्रॉनिक, ब्लूटूथ वापर बंदी करण्यासाठी परीक्षार्थींची वैद्यकीय तपासणी होणार आहे. जर परीक्षा केंद्रावर प्रतिबंधीत करण्यात आलेल्या वस्तू परीक्षार्थीकडे आढळून आल्यास तो अनुचित साधनांचा वापर मानला जाईल. नियमानुसार व कायद्यानुसार संबंधित उमेदवाराविरुध्द कारवाई करण्यात येईल. याची नोंद सर्व परीक्षार्थीनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली मार्फत आयोजित नीट (युजी)-2026 फेर प्रवेश परीक्षा नांदेड जिल्ह्यात 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 5.15 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. सदरील परीक्षेकरिता नांदेड जिल्ह्यात एकूण 42 केंद्र असून त्यापैकी नांदेड शहरात 25 परीक्षा केंद्रे तसेच ग्रामीण भागात 17 परीक्षा केंद्र अशी एकूण 42 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. NEET UG-2026  प्रवेश परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी 21 जून 2026 रोजी परीक्षा केंद्रावर सकाळी ठीक 11 वाजता रिपोर्टींग करावे. स.11 ते 1.30 ही वेळ परिक्षार्थीची तपासणीची वेळ राहील. 

परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीत परीक्षार्थी मार्फत कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब होऊ नये. जसे की, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा, ब्लूटूथचा वापर तसेच मनगटी डिजिटल घडयाळीचा वापर करण्याचे परीक्षार्थी यांनी कटाक्षाने टाळावे तसेच वरील बाबींना आळा घालण्यासाठी परीक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत ELECTRONIC DIVICE, EAR BUD व तत्‍सम बाबीची तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्‍यामार्फत पडताळणी केली जाणार आहे याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद  घ्यावी.

उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत नीट (युजी)-2026 फेर प्रवेश परीक्षा केंद्रामध्ये खालील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी असणार नाही. 

उदा. मजकूर साहित्य, मुद्रित किंवा लिखित कागदाचे तुकडे, भूमिती पेन्सिल, बॉक्स, प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल, लेखन पॅड, पेन ड्राईव्ह, कॅल्क्युलेटर लॉंग टेबल,  इलेक्ट्रॉनिक पेन स्कॅनर इत्यादी कोणतीही स्टेशनरी वस्तू उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर आणू नये. 

NEET (UG)-2026 फेरप्रवेश परीक्षा केंद्रावर ड्रेस कोड संदर्भाने आयोगाने दिलेल्‍या निर्देशाचे तंतोतंत पालन परीक्षार्थी यांनी करावे. जसे की, वजनाने भारी असलेला पोशाख फुलबाहीचा शर्ट प्रतिबंधित असून सांस्कृतिक व पारंपारिक पोशाखास तपासणी संदर्भाने परीक्षेच्या दिवशी सकाळी 11.30 वा. च्‍या अगोदर परीक्षा केंद्रावरील यंत्रणेकडून तपासणी करून घ्यावी. तसेच परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना परीक्षार्थी यांनी ओळख पटविण्यासाठी आपला पूर्ण चेहरा दोन्ही कानांसह दिसेल याची योग्‍य ती काळजी घ्यावी.

परीक्षार्थी यांनी परीक्षा केंद्रावर इतर वस्तू जसे की वॉलेट, गॉगल, हॅन्डबॅग, मायक्रो कॅमेरा, असलेली कोणतीही वस्तु बेल्ट, कॅप, कोणतेही मनगटी घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा, कोणतेही दागिने, कोणतेही  खादयपदार्थ खुल्‍या स्‍वरुपातील किंवा पॅकेजडं, पाणी बॉटल (पारदर्शक पाणी बॉटल वगळून) इ. 

कोणत्याही लपवून आणण्याजोग्या वस्‍तू मायक्रोचीप, कॅमेरा, ब्लूटूथ, इ. उपकरण संप्रेषण साधने इतर कोणतीही वस्तू जी अनुचित साधनांसाठी वापरली जाऊ शकते त्या सर्व वस्तू प्रतिबंधित करण्यात आलेल्‍या आहेत त्याची परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026

99.78 टक्के मतदान, आठ पैकी सात केंद्रावर शंभर टक्के मतदान

नांदेड, दि. 18 जून  :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज 18 जून रोजी शांततेत व सुरळीत पार पडले. या निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 452 पैकी 451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकुण मतदानाची टक्केवारी 99.78 टक्के नोंदवण्यात आली. किनवट, हदगाव, नांदेड, कंधार, धर्माबाद, बिलोली, देगलूर या सात ठिकाणी 100 टक्के मतदान तर भोकर मतदान केंद्रावर 97.92 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार 22 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता कॅबिनेट हॉल, नियोजन भवन तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे होणार आहे.  

नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार आहेत. निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत पार पडली. त्यासाठी निवडणूक कार्यालयाने काटेकोर नियोजन केले होते. निवडणूक प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी पुरेशा पोलीस बंदोबस्तासह, मतदान  प्रक्रियेवर वेब कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवण्यात आली होती. मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून आठही उपविभागीय कार्यालयस्तरावर तहसील कार्यालयांची निश्चिती करण्यात आली होती. निवडणूक निरिक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी नांदेड, बिलोली, हदगाव, भोकर, धर्माबाद या मतदान केंद्रास भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनीही नांदेड मतदान केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली.

सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी 10 वाजेपर्यत 4.87 तर दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात 56.86 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत 88.94 टक्के मतदान झाले. अंतिमतः दुपारी 4 वा. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 452 पैकी 451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या 452 मतदारांमध्ये 228 मतदार पुरूष तर 224 मतदार स्त्रिया होत्या. त्यातील 228 पुरूष मतदारांनी तर 223 स्त्री मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे जमा करून, त्या कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. या स्ट्राँगरूमवरही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने सांगितले. 

0000

वृत्त क्रमांक

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे-६७

नांदेड दि. 17 जून:- जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या 'एल निनो'च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन मा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालक व शेतकरी यांना पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाई व म्हशींच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात घट होऊ नये म्हणून पशुपालकांनी पोषक असणाऱ्या चारा पिकांची लागवड करावी. अशी पिके निवडावीत ज्यातून मुख्य शेतमाल (धान्य/उत्पादन) तर मिळेलच, सोबतीला जनावरांच्या पोषणासाठी दर्जेदार चाराही उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर अथवा पडीक जमिनीवर येणारे नैसर्गिक गवत वाया न घालवता त्याचे योग्य जतन करावे. पावसाची ओढ किंवा टंचाईच्या संकट काळात हेच गवत जनावरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आधार ठरणार आहे. भविष्यातील संभाव्य टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादनावर भर द्यावा. उत्पादित केलेला अतिरिक्त चारा 'मुरघास' किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवावा, जेणेकरून जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. 

पशुसंवर्धन विभागामार्फत 'एल निनो'च्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पशुपालक-शेतकरी बांधवांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. या संभाव्य संकटकाळात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्षम असून, कोणत्याही शंका तसेच अडचणी संदर्भात पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर नंबरवरुन माहिती व पशुवैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्याव्यात, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अशी पिके घ्यावीत जी तीव्र टंचाईच्या काळात पशुखाद्य (चारा) म्हणूनही उपयुक्त ठरतील; तसेच चाऱ्याची नासाडी न करता त्याचा प्रभावी वापर व व्यवस्थापन करावे. त्याचबरोबर, खरीप आणि रब्बी हंगामातील चारा पिके साठवून ठेवण्यासाठी 'सायलेज' (silage) तंत्रज्ञानाचा वापर करावा; जेणेकरून फेब्रुवारी ते जून २०२७ या टंचाईच्या काळात त्याचा वापर करता येईल. एल निनोच्या सावटामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य टंचाईचा फटका आपल्या पशुधनाला बसू नये, ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड व उपलब्ध चाऱ्याची साठवणूक करून आपण पशुधनाचे पोषण आणि आपले आर्थिक उत्पन्न दोन्ही सुरक्षित ठेवू शकतो. सर्व पशुपालकांनी या आवाहनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, ही विनंती.

00000

Wednesday, June 17, 2026

वृत्त क्रमांक

विधानपरिषद निवडणूक मतदान केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

नांदेड दि. 17 जून :- महाराष्‍ट्र विधान परिषद नांदेड स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्‍या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्या दृष्‍टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहावी यादृष्‍टीने गुरुवार 18 जून 2026  रोजी मतदान केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयानी कळविले आहे. 

नांदेड जिल्‍हयातील तहसिल कार्यालय नांदेड, किनवट, हदगाव, भोकर, कंधार, धर्माबाद, बिलोली, देगलूर या मतदान केंद्र परिसरात गुरुवार 18 जून 2026 रोजी मतदान केंद्राच्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त इतर खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्यक्तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

हा आदेश, नांदेड विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या अनुषंगाने नांदेड जिल्हा हद्दी पावेतो मतदानाच्या दिवशी गुरुवार 18 जून 2026 मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यत मतदान केंद्र परिसरासाठी अंमलात राहील असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत. 

00000

वृत्त क्रमांक

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे-६७

नांदेड दि. 17 जून:- जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या 'एल निनो'च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन मा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालक व शेतकरी यांना पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाई व म्हशींच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात घट होऊ नये म्हणून पशुपालकांनी पोषक असणाऱ्या चारा पिकांची लागवड करावी. अशी पिके निवडावीत ज्यातून मुख्य शेतमाल (धान्य/उत्पादन) तर मिळेलच, सोबतीला जनावरांच्या पोषणासाठी दर्जेदार चाराही उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर अथवा पडीक जमिनीवर येणारे नैसर्गिक गवत वाया न घालवता त्याचे योग्य जतन करावे. पावसाची ओढ किंवा टंचाईच्या संकट काळात हेच गवत जनावरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आधार ठरणार आहे. भविष्यातील संभाव्य टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादनावर भर द्यावा. उत्पादित केलेला अतिरिक्त चारा 'मुरघास' किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवावा, जेणेकरून जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. 

पशुसंवर्धन विभागामार्फत 'एल निनो'च्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पशुपालक-शेतकरी बांधवांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. या संभाव्य संकटकाळात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्षम असून, कोणत्याही शंका तसेच अडचणी संदर्भात पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर नंबरवरुन माहिती व पशुवैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्याव्यात, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अशी पिके घ्यावीत जी तीव्र टंचाईच्या काळात पशुखाद्य (चारा) म्हणूनही उपयुक्त ठरतील; तसेच चाऱ्याची नासाडी न करता त्याचा प्रभावी वापर व व्यवस्थापन करावे. त्याचबरोबर, खरीप आणि रब्बी हंगामातील चारा पिके साठवून ठेवण्यासाठी 'सायलेज' (silage) तंत्रज्ञानाचा वापर करावा; जेणेकरून फेब्रुवारी ते जून २०२७ या टंचाईच्या काळात त्याचा वापर करता येईल. एल निनोच्या सावटामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य टंचाईचा फटका आपल्या पशुधनाला बसू नये, ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड व उपलब्ध चाऱ्याची साठवणूक करून आपण पशुधनाचे पोषण आणि आपले आर्थिक उत्पन्न दोन्ही सुरक्षित ठेवू शकतो. सर्व पशुपालकांनी या आवाहनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, ही विनंती.

00000

वृत्त क्रमांक

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरीकांच्‍या मदतीसाठी हेल्‍पलाईन

नांदेड दि. 17 जून:- कुणबी नोंदी शोधणे, जात प्रमाणपत्र मिळविणे तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी याबाबत नागरीकांना सहाय्य करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात हेल्‍पलाईन क्रमांक सुरु करण्‍यात आला आहे. सदर विषय हाताळण्‍यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली आहे. तरी नांदेड जिल्‍हयातील नागरीकांनी कुणबी जात प्रमाणपत्र अथवा जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवताना काही अडचण, समस्‍या आल्‍यास ०२४६२-२९५३३० या हेल्‍पलाईन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.

मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली गठीत  करण्‍यात आली आहे. तसेच सामाजिक न्‍याय व विशेष सहाय विभाग, शासन निर्णय ०२ सप्टेंबर २०२५ अन्‍वये मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, याकरिता  हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करुन सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी  व सहायक कृषी अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली  आहे.

तसेच मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करतील. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील / कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील/कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी केली जाते. या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतात.

0000


 

वृत्त क्रमांक

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत 

आरसेटी नांदेडमध्ये प्रेरणादायी दिवस

नांदेड दि. 17 जून:- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी "ज्युनिअर ब्युटी प्रॅक्टिशनर" प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची जाणून घेतली तसेच त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

भेटीदरम्यान त्यांनी भारतीय स्टेट बँक आरसेटी परिसराची पाहणी करून संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती घेतली. प्रशिक्षणार्थींना उद्देशून बोलताना त्यांनी कौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यशस्वी उद्योजक बनण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेडच्या कार्याचे विशेष कौतुक करत ग्रामीण बेरोजगार युवक-युवतींच्या जीवनात सकारात्मक व समर्थक बदल घडवून आणण्यासाठी तसेच त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने भविष्यातही अधिक जोमाने कार्य करत राहावे, अशा शुभेच्छा दिल्या.

याच दिवशी "ज्युनिअर ब्युटी प्रॅक्टिशनर" प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बॅच क्र. 396 व 397 चा उद्घाटन सोहळाही उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रादेशिक व्यवसाय कार्यालय, भारतीय स्टेट बँक, नांदेडचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत पागल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यांच्या हस्ते तसेच बाबुराव सोनकांबळे (जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, नांदेड), राजीव राऊत (मुख्य व्यवस्थापक, क्षेत्रीय कार्यालय, स्टेट बँक, नांदेड, दिनेश खडसे प्रादेशिक व्यवस्थापक, BRLF आणि कैलास जयभाये (संचालक, भारतीय स्टेट बँक आरसेटी,नांदेड), आशिष राऊत व निकिता तांबुळे, प्रशिक्षक, भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेड यांच्या उपस्थितीत 70 प्रशिक्षणार्थींच्या बॅचचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सर्व मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित केले. स्वतःच्या पायावर उभे राहून यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आत्मविश्वास, सातत्य आणि कठोर परिश्रम यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रशिक्षणार्थींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

या कार्यक्रमास भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेडचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन व शुभेच्छा प्रशिक्षणार्थींसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरल्या असून त्यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासासाठी प्रेरणास्रोत ठरतील.

00000







वृत्त क्रमांक

राष्ट्रीय खाद्यतेल आणि कडधान्य आत्मनिर्भयता अभियाना अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 17 जून:- जिल्ह्यातील सोयाबीन, भुईमूग, तीळ व इतर तेलबिया तसेच तूर, हरभरा व इतर कडधान्य पिकांचे काढणीपश्चात होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर मूल्यवर्धनाला (Value Addition) चालना देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया (NMEO-OS)' आणि 'कडधान्य आत्मनिर्भयता अभियान २०२६-२७ च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात काढणी पश्चात पायाभूत सुविधा (Post-Harvest Infrastructure) घटकांतर्गत प्रक्रिया युनिट्स आणि गोदाम बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

गोदाम बांधकाम योजना (२५० मे. टन क्षमता)

तेलबियांच्या उत्पादनानंतर सुरक्षित साठवणूक व्हावी आणि मूल्यवृद्धी व्हावी या उद्देशाने २५० मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी खालील निकषांनुसार अर्थसाहाय्य दिले जातेः

अंदाजित खर्च व अनुदानाची मर्यादाः मार्गदर्शक सूचनांनुसार रुपये ११ हजार ५२१/- प्रति मे. टन याप्रमाणे २५० मे. टन क्षमतेच्या गोदामासाठी एकूण अंदाजित खर्च २८ लाख ८० हजार २५० रुपये निक्षित करण्यात आला आहे. यावर पात्र लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या ५०% किंवा कमाल १४.४० लाख रुपये (यापैकी जे कमी असेल ते) अनुदान दिले जाईल.

पात्र लाभार्थी व प्राधान्यक्रमः शेतकरी उत्पादक संस्था/कंपन्या (FPO/FPC), सहकारी संस्था, सरकारी किंवा खाजगी उद्योग आणि समूह आधारित व्यवसाय संस्था (CBBOs) पात्र आहेत. यामध्ये मूल्य साखळी भागीदार (Value Chain Partners VCP) गटांना निवडीत विशेष प्राधान्य दिले जाईल. 

निवड पद्धतः लाभार्थ्यांची निवड "प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS)" या तत्त्वावर केली जाईल.

तांत्रिक निकषः गोदामाचे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) किंवा केंद्रीय वखार महामंडळाच्या (CWC) निकषांनुसार असणे बंधनकारक आहे.

तेल काढणी व प्रक्रिया युनिट्स

तेलबियांच्या प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या खरेदीसाठी दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आर्थिक साहाय्य दिले जातेःतेल काढणी युनिट (१० टन प्रतिदिन क्षमता): मोठ्या स्तरावरील प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३% किंवा कमाल ९.९० लाख रुपये अनुदान दिले जाईल.

मिनी ऑईल मिल / एक्सपेलर (लहान युनिट्स): फिल्टर प्रेससह मिनी ऑईल मिलः युनिटच्या किमतीच्या ४० टक्के ते ५०  टक्के किंवा कमाल ४ लाख रुपये.

फिल्टर प्रेसशिवाय मिनी ऑईल मिलः युनिटच्या किमतीच्या ४० टक्के ते ५० टक्के किंवा कमाल ३ लाख रुपये,

पात्र लाभार्थीः वैयक्तिक शेतकरी, FPOs/FPCs, सहकारी संस्था, सार्वजनिक/खाजगी उद्योग, नोंदणीकृत नवीन तेल प्रक्रिया कंपन्या आणि मूल्य साखळी भागीदार (VCPs).

खर्चाची व्याप्ती व गुणवत्ताः अनुदानाची गणना केवळ यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या खर्चावर केली जाईल. यामध्ये जमीन खरेदी किंवा इमारत/शेड बांधकामाचा खर्च समाविष्ट करता येणार नाही. सर्व यंत्रसामग्री भारतीय मानक ब्युरो (BIS) किंवा समतुल्य गुणवत्ता मानकांची असणे अनिवार्य आहे.

कडधान्य प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिट

तूर, हरभरा व इतर कडधान्यांवर स्थानिक पातळीवरच प्रक्रिया होऊन ब्रेडिंग व्हावे, याकरिता प्रक्रिया व साठवणूक सुविधा उभारण्यासाठी खालील निकषांनुसार अर्थसहाय्य दिले जातेः

अनुदान मर्यादाः कडधान्य प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिट्स स्थापन करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ लाख रुपये (यापैकी जे कमी असेल ते) आर्थिक साहाय्य प्रदान केले जाईल. साठवणूक व इमारत बांधकामाची मर्यादाः या अभियानात प्रक्रिया युनिटसोबत साठवणूक सुविधेसाठी देखील अनुदान समाविष्ट आहे. मात्र, इमारत किंवा गोदाम बांधकामासाठीचे अनुदान हे एकूण पात्र अनुदानाच्या ३०% पेक्षा जास्त नसावे, अशी स्पष्ट अट मार्गदर्शक सूचनेत आहे.

पात्रता व क्षमताः FPOS, क्लस्टर स्तरावरील महासंघ (CLFs), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) आणि वैयक्तिक उद्योजक (वय २१ वर्षे पूर्ण), युनिटची किमान क्षमता ३०० किलो प्रति तास असणे आवश्यक असून FSSAI नोंदणी व पर्यावरणीय नियमांचे पालन बंधनकारक आहे.

अटी व शर्ती: 

दोन्ही अभियानांच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार लाभार्थ्यांसाठी खालील अटींचे पालन करणे अनिवार्य आहे. बँक कर्ज (Credit-Linked Subsidy): हे अनुदान 'क्रेडिट लिंक बँकेंडेड सबसिडी स्वरूपात असल्याने लाभार्थ्याने बँक कर्ज घेणे अनिवार्य आहे.

स्वतःचे भांडवलः लाभार्थ्याने एकूण प्रकल्प खर्चाच्या किमान १५% भांडवल स्वतः उभारणे आवश्यक जिओ-टॅगिंग (Krishi Mapper) व देखभालः प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर 'कृषी मॅपर (Krishi Mapper) अॅपद्वारे जिओ-टॅगिंग करणे बंधनकारक आहे. तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी योजनेचा माहिती फलक लावणे आवश्यक असून, तेलबिया युनिट/गोदामाची किमान ५ वर्षे आणि कडधान्य युनिटची किमान ३ वर्षे विक्री न करता योग्य देखभाल करावी लागेल.

दुहेरी लाभ टाळणेः एकाच बाबीसाठी दोन वेगवेगळ्या सरकारी योजनांतून अनुदान घेता येणार नाही.

अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे

ऑफलाइन अर्ज सादर करणेः इच्छुक पात्र वैयक्तिक शेतकरी, FPOS, सहकारी संस्था आणि उद्योजकांनी विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज थेट आपल्या संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मुदतीत सादर करावा.

अधिकृत दरपत्रक (Quotations) अनिवार्यः ऑफलाइन अर्जासोबत सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रांसह, आपण खरेदी करणार असलेल्या यंत्रसामग्रीसाठीचे जीएसटी-नोंदणीकृत (GST-Registered) पुरवठादारांचे अधिकृत दरपत्रक (Quotations) जोडणे अत्यंत बंधनकारक आहे.

तांत्रिक मूल्यांकनः प्राप्त ऑफलाइन अर्जाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता जिल्हा तेलबिया अभियान समिती (DOSM) किंवा जिल्हा कार्यकारी समिती (DEC) मार्फत तपासूनच अंतिम निवड निश्चित केली जाईल.

जिल्हा कृषी प्रशासनाचे आवाहन

"या योजनांमुळे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन, भुईमुग, तीळ व इतर तेलबिया उत्पादक तसेच तूर, हरभरा व इतर कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांचे पिक काढणीनंतर होणारे नुकसान टळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त FPOs, सहकारी संस्था आणि पात्र तरुण उद्योजकांनी सर्व कागदपत्रांसह आपले ऑफलाइन अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात त्वरित सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

वृत्त क्रमांक  नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजुरकर विजयी मतमोजणी शांततेत व सुरळीत संपन्न नांदेड, दि. 2...