Thursday, April 2, 2026

वृत्त क्रमांक  

बांधकाम कामगारांसाठी विविध योजना; सर्व सेवा पूर्णपणे मोफत

अनधिकृत एजंटांकडून फसवणुकीपासून सावध राहा – प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि. २ एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंदणी, नोंदणीचे नूतनीकरण तसेच विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया MAHABOCW.IN या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यात येते. या संकेतस्थळावरील सर्व सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहेत.

दरम्यान, काही मध्यस्थ, एजंट किंवा दलाल कामगारांकडून अर्ज भरून देण्याच्या नावाखाली अनधिकृत शुल्क आकारत असल्याचे तसेच लाभाच्या रकमेपैकी टक्केवारी घेत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ही बाब कामगारांची फसवणूक व आर्थिक शोषण करणारी असून गंभीर स्वरूपाची आहे.

कामगारांसाठी महत्त्वाच्या सूचना

MAHABOCW पोर्टलवरील सर्व सेवा पूर्णपणे मोफत आहेत.

कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाला पैसे देऊ नयेत.

अर्ज स्वतः किंवा अधिकृत सेवा केंद्र (CSC / सेतू केंद्र) मार्फतच करावा.

लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये.

अशा व्यक्तींची माहिती तात्काळ कामगार विभागाकडे द्यावी.

आधार क्रमांक, बँक तपशील, OTP यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.

एजंट / मध्यस्थांसाठी इशारा

शासनाच्या योजनांबाबत चुकीची माहिती देऊन कामगारांची दिशाभूल करू नये. कामगारांची फसवणूक, आर्थिक शोषण किंवा बनावट अर्ज केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तक्रार आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाहीही केली जाईल.

कामगारांना नोंदणी, नूतनीकरण व अर्ज प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगणारी माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली असून, कामगारांनी ती पाहूनच अर्ज करावा व दलालांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त  आशिष ढवळे यांनी केले आहे.

०००००



वृत्त क्रमांक  

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

नांदेड दि. 2 एप्रिल :- सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपूरी नांदेड येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पध्दतीने माजी सैनिक/माजी सैनिक अवलंबित मधून 1 माळी पद भरावयाचे आहे. माजी सैनिक व माजी सैनिक अवलंबित उपलब्ध नसल्यास नागरी सिवीलीन संवर्गातून पद भरण्यात येतील. 

पदाचा तपीशील वयोमर्यादा 21 ते 50 वर्ष, कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी सैनिकी मुलांचे वसतीगृह नांदेड येथे 5 एप्रिल 2026 पर्यत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधीक्षक 8380873985 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

0000

वृत्त क्रमांक  

2 ते 8 एप्रिल या कालावधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘महा-साधना सप्ताह’

नांदेड दि. 2 एप्रिल :- भारत सरकार, क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 8 एप्रिल या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सर्व शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय दैनंदिन कामकाजात करुन सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

राज्यात महा-साधना सप्ताह या टेक लर्निंग वीक अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी 7 दिवसांत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करावयाचे आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचारी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर वेगवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध असून ते अभ्यासक्रम शिकतील. यामध्ये विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महासाधना सप्ताहात सहभाग नोंदविणे गरजेचे राहील.

या सप्ताहाच्या अनुषंगाने विविध शासकीय कार्यालये, यामध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन त्यांना नेमून दिलेले अभ्यासक्रम या काळात पूर्ण करणे गरजेचे राहील. पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी किमान 4 तास असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (iGOT) पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे विभागांना महाराष्ट्रात मे महिन्यात होणाऱ्या ‘TECH-वारी 2.0’ मध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

साधना सप्ताह हा iGOT कर्मयोगी भारत अंतर्गत राबविला जाणारा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या स्वत:च्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पध्दती शिकतात. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे, डिजिटल गव्हर्नन्स आणि नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, सतत शिक्षण घेत राहणे, वेळ व्यवस्थापन ही सप्ताह आयोजित करण्यामागची मुख्य उद्दिष्टे असल्याने या सप्ताहात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक   बांधकाम कामगारांसाठी विविध योजना; सर्व सेवा पूर्णपणे मोफत अनधिकृत एजंटांकडून फसवणुकीपासून सावध राहा – प्रशासनाचे आवाहन नांदे...