वृत्त क्रमांक
2 ते 8 एप्रिल या कालावधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘महा-साधना सप्ताह’
नांदेड दि. 2 एप्रिल :- भारत सरकार, क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 8 एप्रिल या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सर्व शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय दैनंदिन कामकाजात करुन सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.
राज्यात महा-साधना सप्ताह या टेक लर्निंग वीक अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी 7 दिवसांत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करावयाचे आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचारी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर वेगवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध असून ते अभ्यासक्रम शिकतील. यामध्ये विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महासाधना सप्ताहात सहभाग नोंदविणे गरजेचे राहील.
या सप्ताहाच्या अनुषंगाने विविध शासकीय कार्यालये, यामध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन त्यांना नेमून दिलेले अभ्यासक्रम या काळात पूर्ण करणे गरजेचे राहील. पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी किमान 4 तास असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (iGOT) पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे विभागांना महाराष्ट्रात मे महिन्यात होणाऱ्या ‘TECH-वारी 2.0’ मध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
साधना सप्ताह हा iGOT कर्मयोगी भारत अंतर्गत राबविला जाणारा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या स्वत:च्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पध्दती शिकतात. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे, डिजिटल गव्हर्नन्स आणि नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, सतत शिक्षण घेत राहणे, वेळ व्यवस्थापन ही सप्ताह आयोजित करण्यामागची मुख्य उद्दिष्टे असल्याने या सप्ताहात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment