Wednesday, November 4, 2026

 उद्योगांच्या सामाजिक उपक्रमांचे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• कृषी, आरोग्य, महिला सक्षमीकरण क्षेत्रात गोदरेज इंडस्ट्रीज करणार २५ कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक

मुंबई, दि. ४ : महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, उद्योग क्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांमुळे या प्रयत्नांना बळ मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या 'गुड अँड ग्रीन' उपक्रमांतर्गत राज्यात सार्वजनिक आरोग्य, महिला सक्षमीकरण, बांधकाम कामगार कल्याण, कृषी विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढील तीन वर्षांत २५ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,गोदरेज समूहाचा महाराष्ट्राशी १२० वर्षांहून अधिक काळाचा संबंध असून, राज्यातील विविध सामाजिक विकास उपक्रमांमध्ये समूह योगदान देत आहे.राज्यात मलेरिया निर्मूलन आणि डेंग्यू नियंत्रणासाठी आतापर्यंत १६ हजार गावे आणि ९ हजार झोपडपट्ट्यांमध्ये उपक्रम राबविण्यात आले आहेत. २०३० पर्यंत महाराष्ट्र मलेरियामुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. बांधकाम कामगारांसाठी राबविलेल्या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ९० हजार कामगारांची नोंदणी झाली असून, १८० कोटी रुपयांहून अधिक शासकीय निधीचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

महिला सक्षमीकरण आणि शेतकरी समृद्धी

महिलांना घरमालकीचा हक्क मिळवून देण्यासाठी तसेच पदवीधर महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुढील तीन वर्षांत ८०० हून अधिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. कृषी क्षेत्रात १०० हून अधिक शेतकरी समूह सक्षम करून ५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडविण्याचे नियोजन आहे. दुग्धव्यवसायातील ७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञान आणि पशुवैद्यकीय सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.

जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन

नाशिक आणि बीड जिल्ह्यांत जलसंधारण, मृदसंधारण आणि भूजल पुनर्भरणाचे उपक्रम राबविण्यात आले असून, आतापर्यंत ३ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. नागपूर येथे एकात्मिक कचरा व्यवस्थापन उपक्रमांतर्गत २०२५-२६ मध्ये ३५ हजार ३०२ मेट्रिक टनांहून अधिक कचरा पुनर्वापरासाठी वळविण्यात आला आहे. हरित बांधकाम साहित्य आणि प्लास्टिकला पर्यायी साहित्य विकसित करण्यासाठीही संशोधन व नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

शासन आणि उद्योग क्षेत्राच्या समन्वयातून सामाजिक विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारे हे उपक्रम महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या दिशेने महत्वपूर्ण योगदान देणारे ठरणार आहेत.

0000

वृत्त क्रमांक

पैनगंगा प्रकल्पातील पाणी उपशावर प्रशासनाचे कडक नियंत्रण

अवैध मोटार पंप व विद्युत जोडण्या जप्त करण्याचे नांदेड-यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नांदेड, दि. ४ : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पैनगंगा प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. नदीपात्रातून होणारा अनधिकृत पाणी उपसा तातडीने रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. यासंदर्भात नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली.

पाटबंधारे व महावितरण विभागाने नदीपात्रातील पाणी उपशाची दररोज पाहणी करून अनधिकृत मोटार पंप व विद्युत जोडण्या जप्त कराव्यात. गरजेनुसार संबंधित भागातील विद्युत डी.पी. बंद करण्याची कार्यवाही करावी. तसेच नदीकाठच्या गावांतील पोलीस पाटील, तलाठी व ग्रामसेवक यांनी नियमित पाहणी करून अनधिकृत पाणी उपशाची माहिती संबंधित विभागांना द्यावी, असे निर्देश देण्यात आले.

यंदा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्याने त्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करावी आणि ऊसासारखी अधिक पाणी लागणारी पिके टाळावीत, यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षण व चार पाणीपाळ्यांना परवानगी असली तरी पाण्याचा अनधिकृत उपसा अथवा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीस दोन्ही जिल्ह्यांचे पाटबंधारे व महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रभावी नियोजन व काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

********





वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक कोटींचा मदतनिधी

• चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

नांदेड, दि. 04 : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आपल्या चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्री सावे यांचे आभार मानले.

मंत्री अतुल सावे यांचे धाकटे चिरंजीव तथा उद्योजक अनुराग सावे यांचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक अजित मुळे यांची कन्या ईशा यांच्याशी दि. 25 नोव्हेंबर रोजी नियोजित आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी शेतीच्या नुकसानीमुळे कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळा साजरा करणे उचित नसल्याची भूमिका दोन्ही परिवारांनी घेतली. विवाह सोहळ्यासाठी नियोजित असलेला खर्च टाळून ही रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा संवेदनशील निर्णय त्यांनी घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ही एक कोटी रुपयांची देणगी समर्पित करण्यात आली आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

***




स्त्रीशिक्षणाचा पाया रचत फुले दांपत्याने दिला समतेचा विचार..!
#MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष


 

वृत्त क्रमांक

नांदेडमध्ये उद्या ‘विकसित भारत युवा संवाद 2026’चे आयोजन

• ‘आपला मताधिकार जाणून घ्या’ उपक्रमातून युवकांमध्ये लोकशाहीविषयक जागृती

• विद्यार्थी-लोकप्रतिनिधींमध्ये होणार थेट संवाद

नांदेड, दि. 04 : युवकांमध्ये लोकशाहीविषयक जागरूकता निर्माण करणे आणि मतदान प्रक्रियेत त्यांचा सजग सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मेरा युवा भारत (MY Bharat), नांदेड यांच्या वतीने ‘विकसित भारत युवा संवाद 2026-आपला मताधिकार जाणून घ्या’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. 5 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री गुरू गोबिंद सिंहजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (SGGSIET), नांदेड येथे करण्यात आले आहे.

युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत दि. 26 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशभरातील 500 विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. लोकशाही व्यवस्थेची माहिती युवकांपर्यंत पोहोचविणे, मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच राष्ट्रनिर्मितीतील युवकांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमाला लोकसभा व राज्यसभेतील लोकप्रतिनिधींसह खासदार आणि आमदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. एसजीजीएसआयईटीच्या प्राध्यापक प्रा. देवयानी देशमुख या युवा आयकॉन म्हणून सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमात विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्था, मतदानाचे महत्त्व, नागरिकांची कर्तव्ये आणि लोकशाही प्रक्रियेतील युवकांचा सहभाग याबाबत प्रश्न विचारण्याची तसेच आपली मते मांडण्याची संधी मिळणार आहे. यावेळी लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी व्यक्त करण्यासाठी लोकशाही प्रतिज्ञाही घेण्यात येणार आहे.

‘विकसित भारत 2047’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. युवकांना लोकशाही संस्थांशी जोडणे आणि देशाच्या विकासप्रक्रियेत त्यांचे योगदान वाढविणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू आहे.

**

 वृत्त क्रमांक

महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ

• दिवाळी प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

• जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानांतर्गत भव्य विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन; आज आणि उद्याही प्रदर्शन खुले

• पारंपरिक फराळ, हस्तकला व ग्रामीण उत्पादनांचे स्टॉल; नागरिकांनी खरेदी करून महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे-मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

नांदेड, दि. 4 : ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी मेहनतीने तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या परिसरात आयोजित तीन दिवसीय दिवाळी विक्री प्रदर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गटांच्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ मिळण्यासोबतच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिला बचत गटांकडून खरेदी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक परीक्षित यादव यांचीही यावेळी उपस्थिती होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांनी जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. महिला बचत गटांना स्टॉलच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. 

महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू आणि विविध उत्पादनांना शहरात बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने त्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

पारंपरिक दिवाळी फराळाची मेजवानी

या प्रदर्शनात महिला बचत गटांनी घरगुती पद्धतीने तयार केलेले पारंपरिक दिवाळी फराळाचे विविध पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये चिवडा, चकल्या, बेसन लाडू, नाचणी लाडू, शेंगदाणा लाडू, शेव, शेवपापडी, भाकरवडी, पेढे आणि चिप्स यांचा समावेश आहे. भेसळमुक्त आणि दर्जेदार खाद्यपदार्थांना प्राधान्य देणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरत आहे.

ग्रामीण उत्पादनांसह हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल

खाद्यपदार्थांसोबतच गावरान डाळी, ज्वारी, तीळ, लोणची, हळद, मिरची पावडर, सोयाबीन पनीर, तूप, शेवया आणि विविध मसाल्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच आकाशकंदील, पणत्या, हस्तकला साहित्य, सौंदर्यप्रसाधने, पूजेचे साहित्य, धूप-अगरबत्ती आणि घोंगडी अशा विविध वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष आकर्षण म्हणून मोरिंगा पावडर आणि मोरिंगापासून तयार केलेले विविध पदार्थ प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, मनरेगाचे अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक बालाप्रसाद जंगीलवाड आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या परिसरात आयोजित हे प्रदर्शन आज आणि उद्याही नागरिकांसाठी खुले राहणार आहे. नांदेड जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची खरेदी करावी. महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे. 

**






 मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला मुदतवाढ !

दुष्काळी भागांमध्ये जलसंधारणाला बळ




 जून ते ऑगस्ट २०२६ मधील अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१.९१ कोटींची मदत मंजूर

 वृत्त क्रमांक

जिल्ह्यातील 54,910 शेतकऱ्यांच्या खात्यात 554.84 कोटी रुपये जमा

• आतापर्यंत नांदेडच्या 1.57 लाख शेतकऱ्यांना 1,416 कोटींची कर्जमुक्ती

• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला गती

• पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 04 : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 54 हजार 910 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर आज 554 कोटी 84 लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यापूर्वीच्या लाभार्थ्यांसह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 57 हजार 128 पात्र शेतकऱ्यांना 1 हजार 416 कोटी 40 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.

या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेले आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले तसेच 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.

योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने विकसित केलेल्या योजना प्रणालीवर नांदेड जिल्ह्यातील बँकांनी एकूण 2 लाख 24 हजार 847 थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर 24 जुलै, 11 सप्टेंबर, 12 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या चार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 2 हजार 73 शेतकऱ्यांची नावे आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यापैकी 1 लाख 64 हजार 806 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. यापूर्वी 1 लाख 2 हजार 218 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर 861 कोटी 56 लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर आज 4 नोव्हेंबर रोजी आणखी 54 हजार 910 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर 554 कोटी 84 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांपैकी एकूण 1 लाख 57 हजार 128 लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.

जिल्ह्यातील ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी तपासून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

तसेच या योजनेचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना बँकांनी नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळत असून, त्यांना आगामी हंगामासाठी आर्थिक आधार मिळणार आहे.

**

 वृत्त क्रमांक

रेशीम शेतीतून शाश्वत उत्पन्नाची संधी साधा; अभ्यास दौऱ्यातील ज्ञान प्रत्यक्ष शेतीत उतरवा-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

• नांदेडच्या 44 शेतकऱ्यांचा बीड, राहुरी व जालना येथे तीन दिवसीय अभ्यास दौरा

• आधुनिक तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगाची घेणार माहिती

नांदेड, दि. 04 : रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी शाश्वत व पूरक उत्पन्नाचा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यास दौऱ्यात केवळ पाहणी न करता आधुनिक रेशीम शेतीचे तंत्रज्ञान, तुती लागवड व्यवस्थापन आणि रेशीम अळी संगोपनाच्या पद्धतींचा बारकाईने अभ्यास करावा. या दौऱ्यात मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष शेतीत उपयोगात आणून रेशीम शेतीतून आर्थिक समृद्धी साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आयोजित रेशीम शेतकऱ्यांच्या तीन दिवसीय अभ्यास दौऱ्याला आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांच्यासह रेशीम कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात यावर्षी नव्याने तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक रेशीम शेतीची माहिती मिळावी आणि प्रत्यक्ष अनुभवातून त्यांचे तांत्रिक ज्ञान समृद्ध व्हावे, या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील 44 शेतकरी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले असून, विशेष बसने ते रवाना झाले. ‘रेशीम उद्योगातून समृद्धी, लक्ष्मी येईल घरा’ हा संदेश देणारा फलकही बसवर लावण्यात आला आहे.

या तीन दिवसीय दौऱ्यात पहिल्या दिवशी शेतकरी बीड येथील ग्लोबल विकास ट्रस्टला भेट देऊन आधुनिक रेशीम शेती तंत्रज्ञान, तुती लागवड व्यवस्थापन आणि रेशीम अळी संगोपनाची माहिती घेणार आहेत. यासोबतच यशस्वी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधणार असून, रेशीम कोष बाजारपेठेचीही पाहणी करणार आहेत.

दुसऱ्या दिवशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील रेशीम संशोधन केंद्राला भेट देण्यात येणार आहे. येथे सुधारित तुती जाती, रोग नियंत्रण आणि आधुनिक संगोपनगृह व्यवस्थापनाबाबत शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. तर तिसऱ्या दिवशी जालना येथील स्वयंचलित रेशीम धागा निर्मिती यंत्रणा प्रकल्पाला भेट देऊन कोषापासून धागा निर्मिती, प्रक्रिया उद्योग आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या उत्पन्नाच्या संधींची माहिती शेतकरी घेणार आहेत.

जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी नव्याने रेशीम शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांना सुरुवातीपासून योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, या हेतूने दौऱ्याचे आयोजन केल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून अधिकाधिक शेतकरी रेशीम शेतीकडे वळतील. परिणामी नांदेड जिल्ह्याच्या रेशीम उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक कांचन जाधव, क्षेत्र सहाय्यक अमर सूर्यवंशी, गजानन काजगुंडे, नरोजी कोरके, अभय कुलकर्णी, संतोष कोल्हे, आनंद कोल्हे, दत्ता भुसकटे यांच्यासह रेशीम कार्यालयातील कर्मचारी व जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, शास्त्रीय मार्गदर्शन आणि प्रक्रिया उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यातील रेशीम उद्योगाला निश्चितच चालना मिळणार आहे.

****




 वृत्त क्रमांक

आरोग्य सेवेत हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई-डॉ. विजय कंदेवाड 

  • बायोमेट्रिक हजेरी, औषधसाठा व रुग्णसेवेतील त्रुटी दूर करण्याचे सक्त निर्देश 

नांदेड, दि. 04 : सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावून नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आरोग्य सेवेत हलगर्जीपणा, अनियमितता अथवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे सक्त निर्देश आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिले.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या 01 नोव्हेंबर रोजी झालेल्या 'आरोग्य संवाद यात्रा' दौऱ्यादरम्यान दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने 3 नोव्हेंबर रोजी डॉ. कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. आरोग्य संवाद यात्रेदरम्यान काही ठिकाणी कामकाजात आढळलेल्या त्रुटी व अनियमिततांची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी, दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि आवश्यकतेनुसार बदलीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील प्रत्येक अधिकाऱ्याची कामानुसार जबाबदारी निश्चित करून कामकाजाचे नियमित मूल्यमापन करण्यावरही त्यांनी भर दिला.

सर्व आरोग्य संस्थांमध्ये 24 तास अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध ठेवाव्यात. रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगू नये. जीवनावश्यक व जीवनरक्षक औषधांचा पुरेसा साठा, 102 व 108 रुग्णवाहिका सेवा, प्रयोगशाळा तपासण्या आणि एक्स-रे सुविधा नियमित उपलब्ध ठेवाव्यात. वैद्यकीय उपकरणे कार्यान्वित ठेवून त्यांची नियमित देखभाल करावी. रुग्णालयातील स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, रुग्णांना दिला जाणारा आहार आणि कंत्राटी सेवांचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सौजन्यपूर्ण व संवेदनशीलतेने वागावे, असेही स्पष्ट केले.

सर्व नियमित व कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पोर्टलवरील नोंदणी 4 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. फेस रीडिंग व बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविणे बंधनकारक असून, उपस्थितीच्या आधारेच वेतन अदा करावे. यामध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात येईल. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्य करून रुग्णसेवा द्यावी. तसेच वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ व इतर कर्मचाऱ्यांच्या सेवांचे योग्य नियोजन करून त्यांच्या कामकाजाचे नियमित मूल्यमापन करावे, असे निर्देश देण्यात आले.

महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र रुग्णांची नोंदणी वाढवावी. रुग्णकल्याण समितीचा निधी नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने वापरावा. जन्म नोंदणी 21 दिवसांच्या आत पूर्ण करून प्रमाणपत्र वितरित करावे. जन आरोग्य समिती व रुग्णालयीन समित्यांच्या बैठका नियमित घेऊन त्यातील निर्णयांची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वरिष्ठ जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी महिन्यातून किमान पाच आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन रुग्णसेवा, प्रशासकीय कामकाज व उपलब्ध सुविधांचा आढावा घ्यावा. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना नियमित भेटी देऊन कामकाजाचे पर्यवेक्षण करावे. बैठकीतील सर्व निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

आरोग्य सेवा, कर्मचारी उपस्थिती, औषधसाठा, वैद्यकीय सुविधा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा डॉ. कंदेवाड यांनी दिला. नागरिकांना दर्जेदार, तत्पर, पारदर्शक व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हेच आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

****** 






 वृत्त क्रमांक

मेस्कोमध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी माजी सैनिकांना संधी

इच्छुकांनी 10 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नावे नोंदवावीत

 

नांदेड, दि. 4 : मेस्को (माजी सैनिक महामंडळ) क्षेत्रीय कार्यालय, लातूर अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. या पदांसाठी माजी सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य तसेच माजी सैनिकांच्या पत्नी व विधवा यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी आपली नावे दिनांक 10 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे सादर करावीत.

या भरती प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी पात्र माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी निर्धारित मुदतीत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

*******

 वृत्त क्रमांक

दुष्काळात पशुधन संगोपनासाठी सगरोळीत विशेष कार्यशाळा


  • चारा, पाणी व आरोग्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन
  • सगरोळी येथे पशुकल्याणासाठी पशुसंवर्धन विभाग व धर्मा डाँकी सँच्युअरीचा पुढाकार 

नांदेड, दि. 4 : जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गाढवांसह इतर पशुधनाचे संरक्षण, आरोग्य व योग्य संगोपनाबाबत जनजागृती करण्यासाठी 3 नोव्हेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. धर्मा डाँकी सँच्युअरी, सगरोळी यांच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत चारा व पाणी व्यवस्थापन, संतुलित आहार, उष्णतेपासून संरक्षण आणि पशुकल्याण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेचे उद्घाटन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, धर्मा डाँकी सँच्युअरीचे विश्वस्त डॉ. संजीव सगरोळीकर, डॉ. जयंत जकाते, अभिजित महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ पवार, डॉ. विकास गड्डेवाड तसेच कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. निहाल मुल्ला व भास्कर बुच्छलवार उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, पीक अवशेष आणि पूरक पशुआहाराचा शास्त्रीय पद्धतीने वापर करण्यासोबतच पशुधनाला पुरेसे स्वच्छ पाणी व आवश्यक खनिजे देण्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले. गाढवांच्या पचनसंस्थेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन संतुलित आहार देणे, क्षमतेपेक्षा अधिक कामाचा भार न देणे, योग्य विश्रांती, खुरांची निगा आणि पाठीवरील जखमांची काळजी घेण्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच पशुधनासाठी सावली व हवेशीर निवारा, उष्माघातापासून संरक्षण, नियमित पशुवैद्यकीय तपासणी, जंतनियंत्रण, आवश्यक लसीकरण आणि आजारी पशुधनावर वेळेत उपचार करण्याचे आवाहन करण्यात आले. पशुधनाला उपासमार, तहान, अतिश्रम व दुर्लक्षापासून संरक्षण देणे ही पशुपालकांची जबाबदारी असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

या कार्यशाळेत गाढवपालक, पशुपालक व शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य व कल्याण जपण्यासाठी चारा-पाणी व्यवस्थापन आणि संवेदनशील पशुपालनाला प्राधान्य देण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.

******* 





 वृत्त क्रमांक

दुष्काळात चारा संवर्धनासाठी प्रशासनाचे प्रयत्न

 

  • चारा वाहतुकीची तपासणी आणि शुगर ग्रेज बियाण्याचे वाटप
  • स्थानिक पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर
  • शेतकऱ्यांना हिरवा चारा उत्पादनाचे आवाहन 

नांदेड, दि. 04 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने 3 नोव्हेंबर रोजी उमरी तालुक्यातील शेलगाव येथे उसाचा चोथा वाहतूक करणाऱ्या वाहनाची क्षेत्रीय तपासणी करण्यात आली. चारा व पीक अवशेषांच्या विक्री आणि वाहतुकीवरील निर्बंधांच्या अनुषंगाने वाहनाची चौकशी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून हिरवा व सुका चारा, सोयाबीनचे कुटार, उसाचे वाढे आणि इतर पीक अवशेषांची उपलब्धता व साठवणुकीचा आढावा घेण्यात आला.

या पाहणीमध्ये जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ पवार उपस्थित होते. स्थानिक पशुधनासाठी उपलब्ध चाऱ्याचे संवर्धन, योग्य साठवणूक आणि काटकसरीने वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या दरम्यान जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 अंतर्गत मंजूर अतिरिक्त निधीतून प्राप्त शुगर ग्रेज (Sugar Graze) चारा बियाण्याचे जिल्ह्यात वाटप करण्यात येत आहे. उपलब्ध सिंचन सुविधांचा उपयोग करून या बियाण्याची लागवड करावी आणि हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. चारा संवर्धन, स्थानिक पातळीवर चाऱ्याची उपलब्धता आणि शास्त्रीय व्यवस्थापनाच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करण्यावर विभागाचा भर आहे.

********* 




  नांदेड जिल्ह्यातील 5 लाख 68 हजार शेतकऱ्यांना दुष्काळी अग्रीम अनुदान वितरित 8 लाख 73 हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर ; उ...