Wednesday, November 4, 2026

 वृत्त क्रमांक

दुष्काळात चारा संवर्धनासाठी प्रशासनाचे प्रयत्न

 

  • चारा वाहतुकीची तपासणी आणि शुगर ग्रेज बियाण्याचे वाटप
  • स्थानिक पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर
  • शेतकऱ्यांना हिरवा चारा उत्पादनाचे आवाहन 

नांदेड, दि. 04 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने 3 नोव्हेंबर रोजी उमरी तालुक्यातील शेलगाव येथे उसाचा चोथा वाहतूक करणाऱ्या वाहनाची क्षेत्रीय तपासणी करण्यात आली. चारा व पीक अवशेषांच्या विक्री आणि वाहतुकीवरील निर्बंधांच्या अनुषंगाने वाहनाची चौकशी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून हिरवा व सुका चारा, सोयाबीनचे कुटार, उसाचे वाढे आणि इतर पीक अवशेषांची उपलब्धता व साठवणुकीचा आढावा घेण्यात आला.

या पाहणीमध्ये जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ पवार उपस्थित होते. स्थानिक पशुधनासाठी उपलब्ध चाऱ्याचे संवर्धन, योग्य साठवणूक आणि काटकसरीने वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या दरम्यान जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 अंतर्गत मंजूर अतिरिक्त निधीतून प्राप्त शुगर ग्रेज (Sugar Graze) चारा बियाण्याचे जिल्ह्यात वाटप करण्यात येत आहे. उपलब्ध सिंचन सुविधांचा उपयोग करून या बियाण्याची लागवड करावी आणि हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. चारा संवर्धन, स्थानिक पातळीवर चाऱ्याची उपलब्धता आणि शास्त्रीय व्यवस्थापनाच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करण्यावर विभागाचा भर आहे.

********* 




No comments:

Post a Comment

 पैनगंगा प्रकल्पातील पाणी उपशावर प्रशासनाचे कडक नियंत्रण अवैध मोटार पंप व विद्युत जोडण्या जप्त करण्याचे नांदेड-यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचे निर्...