वृत्त क्रमांक
नांदेडमध्ये उद्या ‘विकसित भारत युवा संवाद 2026’चे आयोजन
• ‘आपला मताधिकार जाणून घ्या’ उपक्रमातून युवकांमध्ये लोकशाहीविषयक जागृती
• विद्यार्थी-लोकप्रतिनिधींमध्ये होणार थेट संवाद
नांदेड, दि. 04 : युवकांमध्ये लोकशाहीविषयक जागरूकता निर्माण करणे आणि मतदान प्रक्रियेत त्यांचा सजग सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मेरा युवा भारत (MY Bharat), नांदेड यांच्या वतीने ‘विकसित भारत युवा संवाद 2026-आपला मताधिकार जाणून घ्या’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. 5 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री गुरू गोबिंद सिंहजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (SGGSIET), नांदेड येथे करण्यात आले आहे.
युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत दि. 26 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशभरातील 500 विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. लोकशाही व्यवस्थेची माहिती युवकांपर्यंत पोहोचविणे, मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच राष्ट्रनिर्मितीतील युवकांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमाला लोकसभा व राज्यसभेतील लोकप्रतिनिधींसह खासदार आणि आमदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. एसजीजीएसआयईटीच्या प्राध्यापक प्रा. देवयानी देशमुख या युवा आयकॉन म्हणून सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमात विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्था, मतदानाचे महत्त्व, नागरिकांची कर्तव्ये आणि लोकशाही प्रक्रियेतील युवकांचा सहभाग याबाबत प्रश्न विचारण्याची तसेच आपली मते मांडण्याची संधी मिळणार आहे. यावेळी लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी व्यक्त करण्यासाठी लोकशाही प्रतिज्ञाही घेण्यात येणार आहे.
‘विकसित भारत 2047’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. युवकांना लोकशाही संस्थांशी जोडणे आणि देशाच्या विकासप्रक्रियेत त्यांचे योगदान वाढविणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू आहे.
**
No comments:
Post a Comment