वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यातील चार गोशाळांची क्षेत्रीय पाहणी
- दुष्काळी परिस्थितीत पशुधन संरक्षणासाठी चारा व्यवस्थापनावर भर
- मुरघास निर्मिती, चारा
साठवणूक व पशुधन संगोपनाचा घेतला आढावा
- गोशाळांना शास्त्रीय व्यवस्थापनाबाबत केले
मार्गदर्शन
नांदेड, दि. 04 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची
उपलब्धता, साठवणूक आणि शास्त्रीय संगोपन व्यवस्थेचा आढावा
घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 3 नोव्हेंबर रोजी
जिल्ह्यातील चार गोशाळांना क्षेत्रीय भेट देऊन पाहणी करण्यात आली.
जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने
मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथील श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्प, धर्माबाद येथील श्री पंच कमेटी गोरक्षण संस्था व श्री सिद्धेश्वर गोवत्स
गोशाळा तसेच हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान
केंद्राची पाहणी केली. यावेळी पशुधनाचे आरोग्य, संगोपन,
हिरवा व वाळलेला चारा, पिण्याच्या पाण्याची
उपलब्धता आणि चारा साठवणूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
पाहणीदरम्यान धर्माबाद येथील श्री पंच
कमेटी गोरक्षण संस्थेकडे पुढील सुमारे आठ महिने पुरेल इतका वाळलेला चारा उपलब्ध
असल्याचे आढळले. श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळेत कडबा व भाताच्या तणसाचा साठा तसेच
गोमयापासून गोकाष्ठ निर्मितीचा उपक्रम सुरू असल्याचे निदर्शनास आले. पवना येथील
देवकृपा गोशाळेत हिरव्या मक्यापासून 50 टन आणि ऊसापासून 10 टन, असा एकूण 60 टन मुरघास तयार करून साठविण्यात आला आहे. हा उपक्रम दुष्काळी
परिस्थितीतील चारा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनुकरणीय असल्याचे दिसून आले.
यावेळी उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व
शास्त्रीय पद्धतीने वापर, संतुलित पशुआहार, खनिज
मिश्रण, स्वच्छ पाणी आणि नियमित पशुवैद्यकीय सेवा याबाबत
गोशाळा व्यवस्थापनाला मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे
नोंदणी, गोशाळा परिपोषण योजनेचा लाभ आणि गोमयाच्या
मूल्यवर्धनाबाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या. या पाहणीमध्ये सहाय्यक आयुक्त डॉ.प्रविणकुमार
घुले, डॉ. ईश्वर हंगरगे तसेच संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी व
कर्मचारी सहभागी झाले होते.
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण व
संवर्धन करण्यासाठी चारा साठवणूक, मुरघास निर्मिती आणि
शास्त्रीय पशुधन व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले
आहे.
**********
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment