Monday, October 5, 2026

वृत्त क्रमांक

अनधिकृत पाणी उपशाविरोधात प्रशासनाची धडक कारवाई

५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित; २१५ अनधिकृत मोटारींचे कनेक्शन तोडले

महसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई

अनधिकृत पाणी उपशावर कारवाई सुरूच राहणार

नांदेड (जिमाका), दि. ५ : नांदेड शहरासह गोदावरी नदीकाठावरील गावांना भविष्यात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित राहावा, यासाठी प्रशासनाने अनधिकृत पाणी उपशाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार आणि तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याचा अनधिकृत वापर व अपव्यय रोखण्यासाठी महसूल, पोलीस व संबंधित विभागांच्या संयुक्त पथकांमार्फत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान रहाटी, जैतापूर, सोमेश्वर, पिंपळगाव को., बोरगाव ते., थुगाव, मार्कड, पिंपळगाव निमजी, कल्लाळ, विष्णुपुरी आणि कोटीतीर्थ येथील एकूण ५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले.

तसेच विविध ठिकाणी पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या २१५ अनधिकृत मोटारींचे कनेक्शनही तोडण्यात आले. या कारवाईमुळे जलाशयातील अनधिकृत पाणी उपसा रोखण्यास मदत होणार असून, उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित ठेवण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.

ही कारवाई महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत करण्यात आली. ए. बी. सिंगणवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमटे, एएसआय रामराव ढोले, मंडळ अधिकारी सय्यद मोहसिन, पोलीस उपनिरीक्षक रामराव केंद्रे तसेच एम. एफ. बागवान यांच्या पथकाने कारवाई केली.

तसेच मंडळ अधिकारी मधुकर फुलवले, पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला.

नांदेड शहर तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर व्हावा, यासाठी अनधिकृत पाणी उपशाविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

****





वृत्त क्रमांक

मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व इ. ८ वी परीक्षेसाठी ऑनलाइन नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

२१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार ; 

२२ ते ३० ऑक्टोबरदरम्यान कागदपत्रे व शुल्क जमा करण्याचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. ५ : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये प्राथमिक स्तर (इ. ५ वी) व उच्च प्राथमिक स्तर (इ. ८ वी) परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी दि. ५ ऑक्टोबर २०२६ ते २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या वतीने इ. ५ वी व इ. ८ वी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत ऑनलाइन अर्ज भरून नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

कागदपत्रे व शुल्क जमा करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत

ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी दि. २२ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अर्जात नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये मूळ अर्ज, विहित शुल्क तसेच आवश्यक मूळ कागदपत्रे जमा करावीत.

त्यानंतर संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व विद्यार्थ्यांची यादी दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करावी, असे सूचित करण्यात आले आहे.

अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज भरण्याचे आवाहन

मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व इ. ८ वी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in⁠ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरावा. अर्ज भरताना संकेतस्थळावर उपलब्ध आवश्यक सूचना व मार्गदर्शक माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असे मंडळाने कळविले आहे.

विद्यार्थी व संबंधित शाळांनी निर्धारित वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करून नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

**

वृत्त क्रमांक अनधिकृत पाणी उपशाविरोधात प्रशासनाची धडक कारवाई ५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित; २१५ अनधिकृत मोटारींचे कनेक्शन तोडले महसूल व पोलीस ...