वृत्त क्रमांक
मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व इ. ८ वी परीक्षेसाठी ऑनलाइन नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
२१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार ;
२२ ते ३० ऑक्टोबरदरम्यान कागदपत्रे व शुल्क जमा करण्याचे आवाहन
नांदेड(जिमाका), दि. ५ : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये प्राथमिक स्तर (इ. ५ वी) व उच्च प्राथमिक स्तर (इ. ८ वी) परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी दि. ५ ऑक्टोबर २०२६ ते २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या वतीने इ. ५ वी व इ. ८ वी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत ऑनलाइन अर्ज भरून नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
कागदपत्रे व शुल्क जमा करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत
ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी दि. २२ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अर्जात नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये मूळ अर्ज, विहित शुल्क तसेच आवश्यक मूळ कागदपत्रे जमा करावीत.
त्यानंतर संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व विद्यार्थ्यांची यादी दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करावी, असे सूचित करण्यात आले आहे.
अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज भरण्याचे आवाहन
मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व इ. ८ वी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरावा. अर्ज भरताना संकेतस्थळावर उपलब्ध आवश्यक सूचना व मार्गदर्शक माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असे मंडळाने कळविले आहे.
विद्यार्थी व संबंधित शाळांनी निर्धारित वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करून नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
**
No comments:
Post a Comment