Friday, August 14, 2026

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

पूर्वीची कर्जमुक्ती मर्यादा ₹५०,०००/-
आता मिळणार ₹ २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती



 जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड



 निमंत्रण पत्र

नांदेड येथे नवीन आधार सेवा केंद्राचे उद्घाटन

प्रति,

सर्व माध्यम प्रतिनिधी / ब्युरो चीफ,

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय मुंबई द्वारे आपणास नांदेड, महाराष्ट्र येथील नवीन आधार सेवा केंद्राच्या (ASK) उद्घाटन सोहळ्याचे वृत्तसंकलन करण्यासाठी सहर्ष निमंत्रित करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचा तपशील

 * दिनांक: शनिवार, १५ ऑगस्ट २०२६

 * वेळ: सकाळी ९:३० वाजता (कृपया कार्यक्रमाच्या १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे)

 * स्थळ: आधार सेवा केंद्र, महावीर चौक, बहुउद्देशीय हायस्कूल जवळ, बंधाघाट रोड, वजीराबाद, नांदेड, महाराष्ट्र – ४३१६०१

प्रमुख उपस्थिती

 * प्रमुख पाहुणे: श्री. अतुल सावे (माननीय मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री, नांदेड)

 * श्री. राहुल कर्डिले (IAS) (जिल्हाधिकारी, नांदेड)

 * श्री. किरण आंबेकर (निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड)

 * श्री. कुलदीप सिंह गहलोत (सहाय्यक व्यवस्थापक / ए.एस.के. मॅनेजर, UIDAI प्रादेशिक कार्यालय मुंबई)

 * M/s BLS इंटरनॅशनलचे वरिष्ठ अधिकारी

माध्यम संपर्क

वृत्तसंकलन आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधावा:

 * संपर्क व्यक्ती: अर्चना गंगावणे, आय.ई.सी. मॅनेजर, UIDAI प्रादेशिक कार्यालय मुंबई

 * मोबाईल क्र.: +९१-९५२७०८८९८१

00000

  वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण 

नांदेड दि. १४ ऑगस्ट :- भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वा. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांच्या ध्वजारोहणाचे कार्यक्रम सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक

आझादी का अमृत महोत्‍सव अंतर्गत हर घर तिरंगा रॅली व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 

एच आय व्ही/ एडस जिल्हास्तरीय रेड रन अंतर्गत धावणे स्पर्धेस जिल्हयातील युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद 

नांदेड दि. 14 ऑगस्ट:- आझादी का अमृत महोत्‍सव अंतर्गत हर घर तिरंगा रॅली महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था मुंबई, सार्वजनिक आरोग्य विभाग, श्री गुरगोबिंदसिंघजी मेमोरियल जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विदयमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एच आय व्ही/ एडस जिल्हास्तरीय रेड रन अंतर्गत 5 कि.मी. धावणे व हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन आज सकाळी सायन्स महाविदयालय, नांदेड येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणुन सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अरुणा शुक्ला यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा चिकित्सक डॉ. पेरके, जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जिल्हा कार्यक्रमाधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे, जिल्हा एड्स विभाग संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी माधव सुगावकर, समुपदेशक, जिल्हा एड्स विभाग, नांदेड आदी मान्यवर उपस्थित होते.

भारत सरकाने चालु वर्षी राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे 150 वे वर्षे आणि आझादी का अमृत महोत्‍सव अंतर्गत हर घर तिरंगा रॅली हा उपक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी खेळाडूंनी देशभक्ती वर आधारित घोषणा दिल्या. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एच आय व्ही/ एडस जिल्हास्तरीय रेड रन रॅलीचा मुख्य उददेश म्हणजे युवक-युवती मध्ये एडस प्रतिबंधक करणे व एडस जनजागृती करणे होता. या स्पर्धेकरीता नांदेड जिल्हयातील 17 ते 25 वर्षे वयोगटातील युवक-युवतीनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक संपादन केलेल्या युवक-युवती 23 ऑगष्ट रोजी कोल्हापूर येथे संपन्न होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन नांदेड जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. 

या स्पर्धेचा अंतिम निकाल 

17 ते 25 वर्षे युवक- युवती (5000 मी.धावणे)  युवक- प्रथम- तन्मय भिमराव सोनाळे, द्वितीय- राजेश गणेश कासारे, तृतिय- वैभव मारोती बोकारे, युवती- प्रथम- मोनिका किशनराव नाईक, द्वितीय – देवसर साहेबराव जगदंबे, तृतिय-  विदया गंगाधर साठे 

या स्पर्धेकरीता पंच म्हणुन प्रलोभ कुलकर्णी, सचिव, हौशी ॲथलेटिक्स संघटना यांचे मार्गदर्शनाखाली वैभव दमकोडवार, बंटी सोनसळे, वैभव अंभोरे, मोहम्मद अन्वर आदीनी काम केले.

सदर स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जिल्हा कार्यक्रमाधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे, जिल्हा एड्स विभाग यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, सी.आर.होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपूल दापके, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, कु. रोहीणी घंटेवाड, संजय चव्हाण, इक्रम शेख, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विदयानंद भालेराव, यश कांबळे व आरोग्य विभागाचे सोपान ईभीते, प्रकाश झिंझाडे, सुमित सूर्यवंशी, गंगासागर हिंगोले, धाराजी हिंगोले आदीनी सहकार्य केले. 

00000






वृत्त क्रमांक

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी सायं. 4 वा. सावली रेस्ट हाऊस परभणी येथून नांदेड विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 6.45  वा. नांदेड विमानतळ नांदेड येथून पुणे विमानतळकडे प्रयाण करतील. 

000000

वृत्त क्रमांक

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत आरोग्य योजना आणि उपक्रमांची १०० टक्के अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी कर्डिले 

आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा घेतला आढावा

एचपीव्ही लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

*माता व बाल मृत्यू रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करा 

 नांदेड दि. 14 ऑगस्ट :- जिल्ह्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव  अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व आरोग्य योजना आणि उपक्रमांची १०० टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे. आरोग्य सेवा पुरवण्यात किंवा कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा टास्क फोर्स (DTF), माता मृत्यू व बाल मृत्यू अन्वेषण समिती तसेच नियमित लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नेवले, निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. राठोड, वैद्यकीय अधिकारी मनपा  डॉ. हनुमंत रिठे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे आदीची उपस्थिती होती.  

सर्व आरोग्य अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील दिलेली उद्दिष्टे मुदतीत पूर्ण करावीत. कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर प्रशासकीय स्तरावर कठोर कारवाई केली जाईल.

एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम:

14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरणास मुदतवाढ (८ सप्टेंबर २०२६ पर्यंत) मिळाली आहे. जिल्ह्यातील एकही पात्र मुलगी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळा व ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करून १०० टक्के उद्दिष्ट गाठावे.

माता व बाल मृत्यूदर नियंत्रण:

गरोदर मातांची वेळेवर तपासणी (ANC), हाय-रिस्क मातांचे त्वरित निदान व योग्य वैद्यकीय उपचार सुनिश्चित करावेत. आवश्यकतेनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांचे क्षमतावर्धन आणि गुणात्मक प्रशिक्षण आयोजित करावे. माता व बाल मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कटिबद्ध राहावे.

डिजिटल प्रणाली व लस साठा व्यवस्थापन :

'यु-विन' (U-WIN) डिजिटल पोर्टलवर प्रत्येक लसीकरणाची अचूक नोंद करावी.

'ई-विन' (eVIN) प्रणालीद्वारे लस साठ्याचे रीअल-टाईम मॉनिटरिंग व तापमान नियंत्रण ठेवावे.

सार्वजनिक जनजागृती:

नियमित लसीकरण तक्ता, लसीचे महत्त्व आणि लसीकरणाचे ४ महत्त्वाचे संदेश (लसीचे नाव, पुढील तारीख, एईएफआय खबरदारी व कार्ड आणणे) याबाबत व माझा गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

00000



वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 रोजी सायं. 6 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण. रात्री 10.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. 

00000

निमंत्रण पत्रिका


भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वा. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.


वृत्त क्रमांक

गट-ब व इतर पदाचे परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड दि. 14 ऑगस्ट  :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-ब व इतर पदाचे परीक्षा रविवार 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते 10 या कालावधीत जिल्ह्यातील ION DIGITAL ZONE IDZ विष्णुपूरी एसएसएस. इंदिरा इंन्स्टीटूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपूरी गेट नं. 18 & 22  नांदेड परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या केंद्रापासून 500 मिटरच्या परिसरात रविवार 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यक्तीरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी याबाबतचा आदेश 12 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमीत केला आहे.   

या परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप आदी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 500 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास, परीक्षा केंद्रात नेण्यास त्याचप्रमाणे दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 500 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी., आय.एस.डी., भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते #वनराई बंधाऱ्याचे जलपूजन

कासारखेडा येथील श्री पंचमुखी शेतकरी गटाच्या सामूहिक श्रमदानातून १० लाख लिटर पाणी साठवण क्षमता
नांदेड, दि. १४ ऑगस्ट : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६ अंतर्गत नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथील श्री पंचमुखी शेतकरी गटाने सामूहिक श्रमदानातून गिरिजा नदीवर वनराई बंधारा उभारला आहे. सिमेंट व बियाण्यांच्या रिकाम्या पोत्यांचा वापर करून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यात सुमारे १० लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. या बंधाऱ्याचे जलपूजन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
यावेळी श्री पंचमुखी शेतकरी गटाने राबविलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली. यामध्ये इर्जीक पद्धतीने २०० लिटर दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक, गांडूळ खत निर्मितीसाठी १३ व्हर्मी बेडची उभारणी, परसबाग निर्मिती, वनराई बंधारा, जलतारा प्रकल्प, वृक्षलागवड तसेच सोयाबीन पिकातील एसओपीची अंमलबजावणी यांचा समावेश आहे.
गावकऱ्यांनी लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर वनराई बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचे जलपूजन तसेच मृदेचे ‘काळ्या आई’ म्हणून पूजन करण्यात आले.
ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी शेतकरी गटाने उभारलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करून गटातील एकजूट आणि उत्कृष्ट समन्वयाचे कौतुक केले. “सकारात्मक ऊर्जा घेऊन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरावर पारितोषिक मिळवावे,” अशा शुभेच्छा त्यांनी गटाला दिल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी गटाने आपल्या बांधावर जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा उभारावी, त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच सीड बँक तयार करून घरगुती बियाण्यांचा वापर, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, पॅकिंग आणि गटाच्या ब्रँड नावाने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांनी अतिरिक्त उत्पन्न मिळवावे, असे आवाहन केले.
कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी सोयाबीन उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबी समजावून सांगितल्या. फार्मर कप स्पर्धेतील गुणांकनासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच गटातील प्रत्येक सदस्याने राबविलेल्या उपक्रमांची माहिती ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी व त्याचा शेतीमध्ये अवलंब करावा, असे आवाहन केले. शास्त्रज्ञ डॉ. माणिक कल्याणकर यांनी पिकांवरील विविध रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी शेतकरी गटांनी अवजार बँक व गोडाऊन उभारणीसाठी अर्ज करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, तसेच बांधावर फळझाडांची लागवड करून वृक्षसंवर्धनाला प्राधान्य द्यावे, असे सांगितले.
पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रवीण काथवटे यांनी स्मार्ट शेती ॲपवर इर्जीक व एसओपीची अंमलबजावणी कशा पद्धतीने नोंदवावी, याबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर वसंत जारिकोटे यांनी दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक करून त्याचे पीक संरक्षणातील महत्त्व स्पष्ट केले. गटाने यापूर्वी तयार केलेल्या दशपर्णी अर्काच्या फवारणीचे चांगले परिणाम मिळाल्याने पुन्हा २०० लिटर दशपर्णी अर्क तयार करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. देविकांत देशमुख, डॉ. माणिक कल्याणकर, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, कृषी भूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी भगवानभाई इंगोले, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी संजय सूर्यवंशी, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रवीण काथवटे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कृषी अधिकारी कैलास पेरके यांनी केले. गटाचे निमंत्रक शिवदास कडेकर यांनी गटाने राबविलेल्या एसओपीची माहिती दिली. शेषेराव हिंगोले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री पंचमुखी शेतकरी गटाचे मार्गदर्शक तानाजी शिंदे, मेंटॉर संतोष कडेकर यांच्यासह गटातील सर्व सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
सामूहिक श्रमदान, जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम घडवून आणणारा श्री पंचमुखी शेतकरी गटाचा हा उपक्रम इतर शेतकरी गटांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
000000










  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ पूर्वीची कर्जमुक्ती मर्यादा ₹५०,०००/- आता मिळणार ₹ २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती #कर...