Friday, August 14, 2026

वृत्त क्रमांक

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत आरोग्य योजना आणि उपक्रमांची १०० टक्के अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी कर्डिले 

आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा घेतला आढावा

एचपीव्ही लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

*माता व बाल मृत्यू रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करा 

 नांदेड दि. 14 ऑगस्ट :- जिल्ह्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव  अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व आरोग्य योजना आणि उपक्रमांची १०० टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे. आरोग्य सेवा पुरवण्यात किंवा कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा टास्क फोर्स (DTF), माता मृत्यू व बाल मृत्यू अन्वेषण समिती तसेच नियमित लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नेवले, निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. राठोड, वैद्यकीय अधिकारी मनपा  डॉ. हनुमंत रिठे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे आदीची उपस्थिती होती.  

सर्व आरोग्य अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील दिलेली उद्दिष्टे मुदतीत पूर्ण करावीत. कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर प्रशासकीय स्तरावर कठोर कारवाई केली जाईल.

एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम:

14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरणास मुदतवाढ (८ सप्टेंबर २०२६ पर्यंत) मिळाली आहे. जिल्ह्यातील एकही पात्र मुलगी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळा व ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करून १०० टक्के उद्दिष्ट गाठावे.

माता व बाल मृत्यूदर नियंत्रण:

गरोदर मातांची वेळेवर तपासणी (ANC), हाय-रिस्क मातांचे त्वरित निदान व योग्य वैद्यकीय उपचार सुनिश्चित करावेत. आवश्यकतेनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांचे क्षमतावर्धन आणि गुणात्मक प्रशिक्षण आयोजित करावे. माता व बाल मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कटिबद्ध राहावे.

डिजिटल प्रणाली व लस साठा व्यवस्थापन :

'यु-विन' (U-WIN) डिजिटल पोर्टलवर प्रत्येक लसीकरणाची अचूक नोंद करावी.

'ई-विन' (eVIN) प्रणालीद्वारे लस साठ्याचे रीअल-टाईम मॉनिटरिंग व तापमान नियंत्रण ठेवावे.

सार्वजनिक जनजागृती:

नियमित लसीकरण तक्ता, लसीचे महत्त्व आणि लसीकरणाचे ४ महत्त्वाचे संदेश (लसीचे नाव, पुढील तारीख, एईएफआय खबरदारी व कार्ड आणणे) याबाबत व माझा गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

00000



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे  राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी घेतले दर्शन नांदेड ...