Tuesday, March 28, 2023

 कृषी यांत्रिकीकरण योजनेतून

जिल्ह्यात 1 हजार 80 लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सन 2022-23 मध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना गरजेनुरूप व मागणीप्रमाणे अद्ययावत यंत्रसामुग्री अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येते. कृषि यांत्रीकीकरण योजने अंतर्गत पुर्व तपासणी केलेली दर्जेदार कृषि औजारे खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्यात येते. नांदेड जिल्ह्यातील सन 2022-23 मध्ये आतापर्यंत 1 हजार 80 लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे अनुदानावर वाटप करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी दिली.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर साठी अल्प व अत्यल्प भूधारकमहिलाअनुसूचित जातीअनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना सव्वा लाख रुपये अनुदान तसेच इतर शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान देण्यात येते. योजनेतील इतर कृषी यंत्र व अवजारांना उच्चतम अनुदान मर्यादा किंवा खरेदी किंमतीच्या जीएसटी वगळून 40 ते 50 टक्के अनुदान यापैकी जे कमी असेल ते देण्यात येते. यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलररोटावेटरनांगरपेरणी यंत्रकल्टीवेटर, मळणी यंत्र इत्यादी यंत्र व औजारांना लाभ देण्यात येतो.

 

सन 2021-22 या आर्थिक वर्षात नांदेड जिल्ह्यात 1 हजार 637 लाभार्थ्यांना 11 कोटी 16 लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच सन 2022-23 वर्षात आज अखेर 1 हजार 199 लाभार्थ्यांना 7 कोटी 36 लाख रुपये अनुदान वितरण करण्यात आले आहे. सन 2022-23 मधील उर्वरित लाभार्थ्यांना शासनाकडून निधी प्राप्त होताच अनुदान वितरण करण्यात येणार आहे. सन 2023-24 मध्ये कृषि यांत्रीकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने शासनाच्या mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 सुक्ष्म, लघु उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2022-23 या वर्षासाठी 15 एप्रिल 2023 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे. 


उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात. त्याअंतर्गत दोन उत्कृष्ट उद्योगघटकास प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते. 


जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या वेळी, उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापूर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे. 


नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी 15 एप्रिल 2023 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000

 यशकथा

 

कृषि विभागाच्या मार्गदर्शनाने अनिल इंगोले यांनी फुलविली पेरू व सिताफळाची फळबाग !

 

कोरडवाहू शेती करणे शेतकऱ्यांसाठी मोठया जिकीरीचे काम आहे. परंतु यातही सकारात्मता असेल तर काहीही अवघड नाही हे दाखवून दिले देगलूर तालुक्यातील माळेगाव मक्ता येथील अनिल हणमंतराव इंगोले या उच्च शिक्षीत शेतकऱ्यांने. 22 एकर कोरडवाहू शेती, शेतात पारंपारिक पिके घेवून पाहिलेपाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते. शेतात अनेक‍ नवनवीन पिके घेवून प्रयोग करीत राहिले. मग त्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेवून 22 एकर कोरडवाहू शेतात कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेतला. तसेच एमआयडीएच योजनेच्या अनुदानातून 34 बाय 34 बाय 4.70 आकारमानाचे सामुहिक शेततळे करुन घेतले. पाणी साठ्यामुळे फळबाग क्षेत्रात वरचेवर वाढ केली. 22 एकर पैकी 20 एकरात पेरू व 2 एकरात सिताफळ टप्या-टप्याने लागवड करण्यास सुरुवात केली. या फळबाग लागवडीतून श्री.  इंगोले वर्षाला 20 लाखांचे उत्पादन घेतात. शेतीतील उत्पन्न आज मोहून टाकणारे असले तरी प्रत्यक्ष शेती करतांना खूप आव्हानाचा सामना करावा लागतो असे अनिल इंगोले यांनी सांगितले.

 

फळबाग लागवडीसोबत ते सोयाबीनचे उत्पादन घेतात. त्यांच्या फळबागेत एकूण 11 हजार पेरू व सिताफळाची झाडे आहेत. या फळबागेसाठी त्यांनी शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेतला. या योजनेचे अर्थसहाय्य त्यांना तीन वर्षात टप्या-टप्याने मिळत आहे. यावर्षी त्यांनी 500 क्विंटल पेरूचे उत्पादन केले आहे. आजच्या घडीला त्यांचे पेरू व सिताफळे हैद्राबाद, नांदेड, अमृतसर, सोलापूर, निजामाबाद या मोठया बाजारपेठेत विक्रीसाठी जातात. उत्पादन दर्जेदार असल्यामुळे त्यांच्या पेरू व सिताफळाला खूप मोठया प्रमाणात मागणी आहे. यातून त्यांना चांगला नफा मिळतो असे श्री.  इंगोले यांनी सांगितले. पुढील वर्षात जवळपास दोन्ही हंगामात 1 हजार क्विंटल पेरूचे फळाचे उत्पादन मिळेलअसा त्यांनी विश्वास व्यक्त केला. एका एकरात 125 क्विंटल पेरूचे उत्पन्न हमखास होते. उत्पादन वाढीसाठी ते अनेक‍ प्रगतीशिल शेतकऱ्यांच्या भेटी घेतात.  त्यांच्या फळबागेत ते रासायनिक खतांचा वापर कमीतकमी करुन जास्तीतजास्त सेंद्रिय खताचा उपयोग करण्यावर भर देतात. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी त्यांच्या बहरलेल्या पेरूच्या आणि सीताफळाच्या बागेची पाहणी करण्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी भेट देतात.

 

अनिल इंगोले यांच्यासारख्या प्रगतीशिल शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले आहे. आगामी 3 वर्षात राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. सुमारे 1 हजार जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्रे स्थापन करुन डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढविली जाणार आहे. यासाठी तीन वर्षात 1 हजार कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध केला जाणार आहे. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी ही भूमिका शासनाने अधिक दृढ केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जाईल. यात प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर असून केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्याचे 6 हजार असे 12 हजार रुपये प्रतीवर्षी शेतकऱ्यांना मिळतील. याचा राज्यातील सुमारे 1.15 कोटी कुटूंबातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेसोबतच आता मागेल त्याला फळबाग, ठिबक सिंचनशेतांचे अस्तरीकरणशेडनेटहरितगृहआधुनिक पेरणीयंत्र5 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविणार. गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार योजनाही राबविली जाणार आहे. 

 

 

अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय,

नांदेड

 

00000






 विविध लोककल्याणकारी शासकीय योजनांच्या

फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ

 

·   जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते पाच वाहनांना हिरवी झेंडी

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना  विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना व्हावी या उद्देशाने फिरत्या एलईडी वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाचे आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

 

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व इतर अधिकारी उपस्थित होते. या फिरत्या वाहनाद्वारे ग्रामीण भागामध्ये योजनांबाबत जनजागृती होणार आहे. विविध योजनांची माहिती असलेले ही पाच वाहने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून जनजागृती करतील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून ही वाहने मंगळवार 28 मार्च रोजी मार्गस्थ होवून जिल्ह्यात विविध गावांमध्ये  प्रचार प्रसिध्दीचे कार्य करतील. 

 

वाहनांवरील एलईडी स्क्रीनद्वारे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनावर आधारित चित्रफित दाखविण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना व विशेष घटक योजनेंतर्गत विद्यार्थी, तरूण तसेच महिला, शेतकरी आदी सर्व घटकांसाठीच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विविध प्रकारची प्रशिक्षणे, महिला सक्षमीकरण, लाभार्थी व समूह योजनांची माहिती या वाहनाद्वारे पोहोचविली जाईल.

0000



  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...