Thursday, April 7, 2022

 खरीप हंगामासाठी ग्राम कृषी विकास आराखडे तयार करावेत

-         विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांचे निर्देश

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यातील प्रत्येक गावांच्या कृषी विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. त्यादृष्टीने यंदाच्या खरीप हंगामात गावांचे सर्व समावेशक ग्राम कृषी विकास आराखडे तयार करावेत. सर्व कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत यांची योग्य ती खबरदारी घेण्याचे लातूर कृषी विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी दिले. आज कुसुम सभागृहात आयोजित खरीप हंगाम 2022 पूर्व तयारी कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले.

 

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी.चलवदे, कृषि उपसंचालक श्रीमती एम. आर. सोनवणे उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम. तपासकर, एस. बी. शितोळे. कृषी विकास अधिकारी चिमणशेट्टे,  कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डी. . देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी बी.व्ही वीर, एम.के. आसलकर, श्री. भोर यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांची उपस्थिती होती.

 

खरीप हंगामाचे नियोजन जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर केले जाते. यात गावांच्या गरजांचा  आवश्यक त्या प्रमाणात समावेश होत नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी यांचा समावेश असलेली ग्राम कृषी विकास समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला.  सदर समिती गावातील जमीन, पर्जन्यमान, सिंचन सुविधा, उपलब्ध साधनसामग्री, दळणवळण, माती परीक्षणावर आधारित जमीन प्रकार आदी बाबींचा विचार करुन येत्या खरीप हंगामासाठी ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करेल असे दिवेकर यांनी स्पष्ट केले.

 

सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी, सोयाबीनची बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, खत बचत मोहीम, जैविक खतांचा वापर, बीज प्रक्रिया इ. मोहीमद्वारे संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी, असेही दिवेकर म्हणाले.  कार्यशाळेत  विविध मोहिमांची माहिती पुस्तिका, ग्राम कृषी विकास आराखड्याचे मार्गदर्शिकाचे कृषी सहाय्यक यांना वाटप करण्यात आले.

 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग  योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, पोकरा समुह सहाय्यक यांची उपस्थिती होती.

 

00000



जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत

ऑनलाईन वेबीनारचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती त्याबाबत जनजागृती करण्यासाठी शुक्रवार 8 एप्रिल 2022 रोजी गुगल मिट या पवर दुपारी 3 वा. वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हे वेबिनार सर्वांसाठी खुले असून जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अनुषंगाने नागरिकांच्या अडीअडचणी शंकांचे निराकरण करण्यासाठी नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. 

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदारांना शैक्षणिक, सेवा, निवडणूक इतर कारणांसाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. त्याअनुषंगाने सामाजिक समता सप्ताह निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यासाठी गरजू अर्जदारांना विहि वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच अर्ज कसा करावा, त्यासोबत कोणते पुरावे सादर करावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी नागरीकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जाणार आहेत. 

या वेबिनारचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपण गुगल मिट Google Meet डाऊनलोड करुन Join With a code हा पर्याय निवडून ümeet.google.com/ctv-pjxz-oop हा समाविष्ट करावा. संबंधित सर्व अर्जदार, पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिकांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.

000000


विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव

11 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate-CVC) प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे अत्यावश्यक आहे. सन 2021-22 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका (डिप्लोमा) तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज समितीकडे त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह चालू वर्ष सोमवार 11 एप्रिल  2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर यांनी केले आहे. 

शैक्षणिक संस्थांनीही विद्यार्थी-पालक यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करुन समितीकडे मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात. जेणेकरून समितीस प्राप्त अर्जावर मुदतीत नियमानुसार कार्यवाही पूर्ण करुन समितीस निर्णय/जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करता येईल. तथापि बहुतांश विद्यार्थी इ. 12 वी परीक्षा झाल्यानंतर /पदविका अभ्यासक्रमांचे विद्यार्थी तृतीय वर्षाची परीक्षा झाल्यानंतर/निकाल लागल्यानंतर किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अंतिम क्षणी समितीकडे प्रस्ताव सादर करतात. अशा प्रकरणी समिती निर्णय होण्यास अवधी लागू शकतो व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. 

वैधता प्रमाणपत्राकरिता अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा व तो ऑफलाईन 15 दिवसात समितीस सादर करावा. अर्जदार यांनी ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या ई-मेलवर जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होणार असल्याने अर्जदाराने स्वत:चे/पालकांचे अचूक ई-मेल नमुद करण्याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, व विशेष मागास प्रवर्ग यांचे जातीचे प्रमाणपत्र देणे व पडताळणी करणे अधिनियम 2000 चे कलम 8 अन्वये जातीचा दावा सिध्द करण्याची जबाबदारी ही अर्जदार यांची आहे.  अर्ज अपूर्ण आढळल्यास तशी कारणे नमूद करुन जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन, नियम 2012 मधील कलम 17 (2) 17 (3) अन्वये निकाली काढली जातील. 

अर्जदारांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यामुळे समितीस अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन वैधता प्रमाणपत्र/समिती निर्णय देणे अशक्य झाल्यास व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास अथवा त्रुटी असलेली प्रकरणे विहीत मुदतीत निकाली न निघाल्यास व त्यामुळे अर्जदारास प्रवेशापासून वंचित रहावे लागल्यास यास समिती जबाबदार राहणार नाही. त्यामुळे अर्जदार/पालकांनी समितीकडे वेळेत म्हणजे दि. 11 एप्रिल 2022 पूर्वी अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्था व्यवस्थापनाने या बाबी आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या/घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहनही  जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त अनिल शेंदारकर यांनी केले आहे.

0000000


 सामाजिक न्याय विभागांतर्गत

जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित केले गेले आहेत. याचे प्रातिनिधीक उद्घाटन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या उपक्रमाची सविस्तर माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी दिली.  यावेळी दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी संभाजी कांबळे ॲड. अनुप आगाशे ॲड. अंकुश बर्डे आणि नांदेड महानगरपालिकेचे उपअभियंता शिवाजी बाभरे यांची उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्ह्यातून सर्व 16 तालुक्यांमध्ये शासकीय वसतीगृहे, शासकीय निवासी शाळा, बहुजन कल्याण विभागाच्या विजाभज आश्रमशाळांमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लघु नाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व उपक्रमात सुमारे 735 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य व योगदान, भारतीय संविधानाचे महत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व चरित्र तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान याबाबत नव्या पिढीपर्यंत, युवकांमध्ये माहिती पोहचावी, त्यांना स्वत:चे विचार मांडता यावेत यादृष्टीने आम्ही अधिक भर दिल्याचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी सांगितले. यातील गुणवंतांना राज्यस्तरावर संधी दिली जाईल, असे समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी माहिती दिली.

 

9 एप्रिल रोजी या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबीर, 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती साजरी करणे, महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य याविषयी व्याख्यानाचा कार्यक्रम, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, व्याख्यान, चर्चासत्र, 18 एप्रिल रोजी संविधान जागरण आदी कार्यक्रम यानिमित्ताने घेण्यात आले आहेत.

0000



 मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या

होट्टल महोत्सवास 9 एप्रिल पासून प्रारंभ

 

·        पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

·        तीन दिवस रोज सायंकाळी विविध कार्यक्रमांची मांदियाळी

 

नांदेड (जिमाका), 7 :- तेलंगणा आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेल्या देगलूर पासून 8 किमी अंतरावरील होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर हे चालुक्य शैली एक सुस्थितीत कोरीव लेणे असलेले मंदिर आहे. मराठवाड्याच्या या समृद्ध वारसा स्थळाला पुढे आणण्यासाठी व या भागातील लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून नवनवीन साधणे उपलब्ध व्हावीत यादृष्टिने होट्टल महोत्सवाकडे पाहिले जाते. मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख म्हणून होट्टल महोत्सवाकडे पाहिले जाते. बहुप्रतिक्षेत असलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ 9 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या शुभ हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून खासदार प्रतापतराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे हे प्रमुख अतिथी म्हणून या समारंभास उपस्थित राहणार आहेत.

 

याचबरोबर या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास विधान परिषदेचे सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमर राजूरकर, राम पाटील रातोळीकर, विधानसभा सदस्य आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एल. आणेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 

शनिवार 9 एप्रिल ते सोमवार 11 एप्रिल या तीन दिवसीय समारोहात पहिला दिवस प्रथितयश गायक मंगेश बोरगावकर यांच्या सदाबाहर गाण्यांची मैफल होणार आहे. शनिवार 9 एप्रिल रोजी सायं. 5.30 वा. या महोत्सवाचा मुख्य उद्घाटन समारोह झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरूवात होईल. रविवार 10 एप्रिल रोजी सायं. 5.30 ते 6 यावेळेत औरंगाबाद येथील खंडेराय प्रतिष्ठाण गण-गवळण-गोंधळ हा लोककला प्रकार सादर करेल. गायन, वादन, नृत्य व लोकगीत याचे सुरेख मिश्रण या कार्यक्रमात असेल. ललीत कला केंद्र पुणेच्या कुमारी श्रृती संतोष पोरवाल या कथ्थक नृत्य सादर करतील. यानंतर ऐनोद्दीन फखरोद्दीन वारसी व संच बासरी वादन करतील. सायं. 8 ते 9 या कालावधीत राजेश ठाकरे हे शास्त्रीय गायन, डॉ. भरत जैठवाणी हे शास्त्रीय नृत्य तर विजय जोशी हे मराठी पाऊल पडते पुढे, मराठी लोकरंग हा कार्यक्रम सादर करतील. सोमवार 11 एप्रिल रोजी औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा येथील माजी सरपंच भास्करराव पेरेपाटील हे लोकसहभागातून विकास याबाबत लोकप्रबोधन करतील. यानंतर स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव खास लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून कु. सोनल भेदेकर, कु. विद्याश्री येमचे, अप्सरा आलीच्या अर्चना सावंत व संच हे लावणीच्या कार्यक्रम सादर करतील.

 

राज्य शासनाचा पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव-2022 संपन्न होत असून यासाठी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून या महोत्सव संपन्न होत आहे. या महोत्सवास लोकांनी भरभरून प्रतिसाद दयावा, असे आवाहन या महोत्सवाचे विनीत म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पर्यटन उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, होट्टल येथील सरपंच हनिफाबी युसूफमिया शेख यांनी केले आहे.

000000

वृत्त 6.4.2022

 *उद्योजक संजय बियाणी यांच्या निर्घृण हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक*

- पालकमंत्री अशोक चव्हाण
▪️हत्या मनाला वेदना देणारी
▪️दोषींविरुद्ध कठोर कारवाई करू
नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यातील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक, सेवाभाव जपणारे तरुण उद्योजक संजय बियाणी यांची काल जी निघृण हत्या झाली ती मनाला अत्यंत वेदना देणारी आहे. ज्या पद्धतीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या ते दृष्य पाहून मी रात्रभर झोपू शकलो नाही. जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून मी आढावा घेतला. हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई समवेत या घटने पाठिमागे जे कोणी सुत्रधार असतील त्यादृष्टिने पोलीस यंत्रणा तपास करेल. या घटनेच्या संपूर्ण चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली केली करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी व पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी याबाबत माही दिली आहे. या घटनेचा संपूर्ण तपास निष्पक्षपातीपणे केला जाईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
गोवर्धन घाट येथे आज दुपारी 1.30 वा. उद्योजक स्व. संजय बियाणी यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी शोकसभेत ते बोलत होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, कोळंबीचे सरपंच हरी देशमुख, माहेश्वरी सभाचे पदाधिकारी किशन भन्साळी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, विविध पदाधिकारी उपस्थित होते.
झालेल्या घटनेचे दु:ख सर्वांनाच आहे. आगामी काळात नांदेडमध्ये अशा प्रकारची एकही घटना होता कामा नये, यासाठी संबंधित यंत्रणेला दक्षतेच्या व या घटनेच्या तपासाच्या मी सूचना दिलेल्या आहेत. याच्या पाठिमागे जे कोणी सुत्रधार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, ही माझीपण मागणी आहे. उद्या मी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत योग्य दिशेने तपास पोलीसांना करता यावा यादृष्टिने मी सूचना केल्या असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. संजय बियाणी यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यांचे म्हणणे पोलीस तपास अधिकारी लक्षात घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन वर्षापूर्वी उद्योजक संजय बियाणी यांच्यावर धाक दाखवून गुन्हेगारांनी पैशाची मागणी केली होती. घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. आज सकाळी आम्ही, पालकमंत्री अशोक चव्हाण बियाणी यांच्या घरी जाऊन सांत्वन करून आलो आहोत. सेवाभाव जपणाऱ्या तरुण उद्योजकावर ही अवस्था का यावी असा उद्ग्वीग्न सवाल खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला. खरा सूत्रधार शोधून काढल्याशिवाय उद्योजकांमधील भय दूर होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. घडलेल्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. बियाणी हे सर्वांचे मित्र होते. एक चांगल्या उद्योजकाची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरीत पकडून कठोर कारवाई करण्यामध्ये शासन कमी पडणार नाही असे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.
गत 20 वर्षात हजारो घरे तरुण उद्योजक बियाणी यांनी बांधली. व्यावसायिक असूनही सामाजिक प्रश्नांची जाण ठेवणे, आपले सामाजिक उत्तरदायीत्व निभावण्यासाठी पुढे येणे यातून त्यांनी ओळख निर्माण केली. या तरुण उद्योजकाचा मृत्यू हळहळ करायला लावणारा असल्याचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी सांगितले. आरोपीला त्वरीत अटक करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी आपल्या कठोर भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
00000




महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...