Thursday, December 1, 2022

 वृत्त क्र. 1131

 समता पर्व निमित्त समाज कल्याण कार्यालयात

युवा गटाची कार्यशाळा संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 26 नोव्हेंबर ते महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2022 हा कालावधीत समता पर्व म्हणून साजरा केला जात आहे. समता पर्व च्या निमित्ताने आज स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे याबाबत समाज कल्याण कार्यालयात युवागटांची कार्यशाळा संपन्न झाली. 

यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल गचके, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी व प्रकल्पधिकारी सुजाता पोहरे, समतादूत प्रकल्प आणि नांदेड जिल्हयातील अनु.जाती बचत गटाचे प्रतिनिधी व अनु. जातीचे उद्योजक बनु इच्छिणारे युवक युवती हजर होते. 

यावेळी स्टँड अप योजनेअंतर्गत अनु.जातीच्या नवउद्योजकांना विविध उद्योग सुरु करण्यासाठी प्रस्ताव कसे सादर करावेत. अचूक प्रस्ताव सादर करण्यासाठी नेमकी कोणकोणत्या बाबींची दक्षता घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने एमसी ईडीकडून सुमारे 32 योजना युवा उद्योजकांसाठी राबविल्या जातात असे एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी विशद केले. अनिल गचके यांनी नवउद्योजकांनी फक्त सबसीडी हे उद्दिष्ठ न ठेवता कल्पक नवउद्योजकांनी त्यांच्या जीवनात यशस्वी होणाच्या उद्देशाने शासन योजनांचा लाभ घ्यावा व स्वत:चे जीवनमान समृध्द करावे असे आवाहन केले. 

प्रास्ताविकात समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी युवकांनी आपल्या जीवनाचे नेमके उद्दीष्ट आणि ध्येय निश्चित करावे. उद्योजक बनायचे असेल तर प्रामाणिकपणे चिकाटीने ध्येय पथावर वाटचाल करावी. तसेच युवकांनी आपले व्यक्तीमत्व प्रामाणिक व प्रयत्नवादी ठेवावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

स्टँडअप योजनेच्या ऑनलाईन प्रणालीतील जाचक अटी सोप्या करण्याची अपेक्षा श्रीमती सुजाता पोहरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमांचे सूत्र संचालन गजानन पांपटवार तालुका समन्वयक तर आभारप्रदर्शन अधिक्षक राजेश सुरकूटलावार यांनी केले. या कार्यक्रमांस अनेक युवक / युवती बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक पी.जी.खानसोळे, वरिष्ठ लिपीक रविकुमार जाधव, कनिष्ठ लिपीक व्ही.एस. पकाने, डी.आर. दवणे, तालुका समन्वयक आर.एम शेख, सहाय्यक ग्रंथपाल एन.पी.मस्के यांनी परिश्रम घेतले.

0000



 वृत्त क्र. 1130

 आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या

ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 1 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली  (कासराळी) येथील केंद्रवर सुरू आहे. ही ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 7 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

नोंदणीसाठी चालु हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षंकीत प्रत, आधार कार्ड प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकरऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान फोटो अपलोड करायचा आहे. या योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्र. 1129 

नवउद्योजकांपर्यंत शासकीय योजना

सुलभ पोहचविण्याची आवश्यकता  

-         जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

·         उद्योजक मित्राच्या बैठकीत निर्देश

 नांदेड (जिमाका) दि. 1 :- नांदेड जिल्ह्यात उद्योजकांना उभारी देण्यासाठी आणि नवीन उद्योग निर्मितीसाठी शासनाच्या विविध योजना नवउद्योजकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. याचबरोबर या योजनासंदर्भात उद्योजकांच्या मनात असलेल्या शंकांचेही तात्काळ निरसन करून त्यांच्या प्रस्तावाला शासनाशी निगडीत प्रक्रिया गतीमान करण्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, प्रवीण खडके, औद्योगिक संघटनेचे शैलेश कराळे, आनंदे बिडवई, महेश देशपांडे, हर्षद शहा, एकनाथ जाधव तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

जिल्ह्यातील अनेक पदवीधर युवक-युवती आपल्या उद्योग व्यवसायाबाबत संधीच्या प्रतिक्षेत आहेत. नवीन स्टार्टअपच्या दृष्टिने अनेकांनी प्राथमिक माहिती व आवश्यक ती तयारीही करून ठेवलेली आहे. अशा गटांना शासनस्तराशी निगडीत जर काही अडचणी असतील तर त्या त्वरीत दूर करून त्यांना प्रोत्साहन देण्यासह योजनांचे बळ उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केली. यादृष्टीने जिल्हास्तरावर परिसंवादाचे आयोजन करण्याबाबत जिल्हा उद्योग केंद्राला त्यांनी निर्देश दिले. 

आपला नांदेड जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सिंचनाच्या सुविधा अनेक भागात आहेत. अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांनी फलोत्पादनापासून इतर दर्जेदार कृषि उत्पादन घेतले आहे. कृषिपुरक उद्योगाच्या निर्मितीसाठी जे काही तांत्रिक कौशल्य व त्याबाबतची माहिती देण्यासाठी विद्यापीठ पातळीवर व कौशल्य विकास विभागातर्फे केंद्र असून याचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगासंबंधी ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी दर तीन महिन्याला उद्योजक मित्रांची  बैठक घेण्याचे त्यांनी उद्योग विभागाला सांगितले.

00000

 संविधानातील समान न्यायाचे तत्व तळागाळापर्यंत पोहचावे

- न्यायाधीश दलजित कौर

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ग्रामपंचायत पातळीवर संविधानाचा जागर

 

नांदेडदि. 1 (जिमाका) :- भारतीय राज्यघटनेने प्रत्येक घटकांच्या विकासासाठी व्यापक दृष्टिकोन बाळगला आहे. समान न्यायाचे तत्व हे त्यात सामावलेले आहे. जे विकासापासून वर्षोनुवर्षे दूर राहिले त्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कायद्याचे बळ योजनांना दिले आहे. याची व्याप्ती लक्षात घेता संविधान दिन व समता पर्वाच्या कालावधीत संविधानाप्रती अधिक जनजागृती करण्यावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे भर देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर यांनी दिली. ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 

दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. याचबरोबर 6 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन पर्यंतचा कालावधी हा सामाजिक समता पर्व म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने ग्रामीण तंत्रनिकेतन नांदेड येथे हा उपक्रम घेण्यात आला.

 

एक नागरिक म्हणून संविधानामुळे प्रत्येकाला अधिकार मिळालेले आहेत. त्या अधिकाराबाबत व नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्याबाबत ग्रामपातळीपर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने प्रथमच जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींमध्ये विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने संविधानाचा जागर करण्यात आला.

 

संविधानाचा जागर ग्रामपातळीपर्यंत व्हावायासाठी जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. यात लिंबगावसायाळवाडी (बु)नेरलीविष्णुपुरीधनगरवाडीवाजेगावआणेगावबळीरामपूरबाभुळगावडोणगाव अशी 11 गावे निवडण्यात आली. या ग्रामपंचायतींमध्ये ॲड. नय्युमखान पठाणॲड. मंगेश वाघमारेॲड. वृषाली जोशीॲड. विजयमाला मनवरॲड. दत्ता कदमॲड. दिपाली डोनगावकर, ॲड. नविद पठाण यांनी त्या-त्या गावात जाऊन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उद्देशिका ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली.  

00000





 अंगणवाडी बळकटीकरणासाठी

सेवाभावी संस्थाना देता येईल योगदान

-    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

§  लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण जाहीर 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र सक्षम होण्याच्या दृष्टीने शासनाच्यावतीने लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्यात येत आहे. अंगणवाडी दत्तक धोरणातर्गंत कॉर्पोरेट कंपन्या व त्यांचेमार्फत राबविण्यात येणारा सीएसआर कार्यक्रम, अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था, विविध ट्रस्ट, संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्यक्ती, कुटूंब, समूह या सर्व घटकांनी या धोरणात सहभाग घेवून योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

अंगणवाडी केंद्र दत्तक घेण्यास इच्छुक घटक अंगणवाडी केंद्रात स्वेच्छेने सुविधा देऊ शकतील. यात भौतीक सुविधा, शैक्षणिक सुविधा, वृध्दी संनियंत्रणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देणे अथवा दुरुस्ती करुन देणे, प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रम, आरोग्य तपासणी व सुविधा, इतर सहाय्य या सुविधाचा समावेश आहे. 

अंगणवाडी दत्तक धोरणामध्ये सहभाग घेणाऱ्या इच्छूकांना आदर्श अंगणवाडी योजनेमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधाच्या धर्तीवर 1 लाख 50 हजार रुपयाच्या मर्यादेत सुविधा उपलब्ध करुन देता येतील. अंगणवाडी केंद्रामध्ये किरकोळ दुरुस्ती व अन्य ऐच्छिक कामांसाठी 50 हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रकमेच्या मर्यादेत सुविधा उपलब्ध करुन देता येतील. अंगणवाडी केंद्राना सहाय्य करण्यासाठी इच्छूकांनी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना comicdsawcadoption@gmail.com या ईमेलवर तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी किंवा तरंग सुपोषित महाराष्ट्राचा 8080809063 किंवा जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी श्री. सोनवणे यांचा मो.क्र.8888766444 वर संपर्क साधावा, असे कळविले आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...