मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे #पालकमंत्री, #सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री. तर इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे #नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री.
Saturday, January 18, 2025
वृत्त क्र. 73
राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत मुले व मुलींच्या संघास सुवर्ण पदक प्राप्त
नांदेड दि. १८ जानेवारी :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन 14 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज नांदेड व सायन्स कॉलेज नांदेड येथे संपन्न झाले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. श्री. महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन मा.श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड) मा. श्री. राजेंद्र इखनकर (सचिव, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन), मा.श्री.संजय कुमार (सदस्य, एस.जी.एफ.आय.), श्री.ज्ञानेश काळे (सातारा) ,श्री. आनंदा कांबळे (नांदेड), तांत्रीक समिती सदस्य श्री. इंद्रजित नितनवार (अमरावती), श्री.शंकर शहाणे (परभणी), श्री.संतोष खेंडे (सोलापूर) आदी मान्यवर उपस्थित होते.
समारोप कार्यक्रम प्रसंगी मा.महेश वडदकर म्हणाले की, शालेय जिवनात खेळ हा अतिशय महत्वाचा घटक असुन खेळाडूंनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखणीय कार्य करुन करीयर घडवावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवावी असे सांगीतले.
या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत संपुर्ण भारतातून 15 मुले , 14 मुली असे एकण 29 मुला-मुलींच्या संघानी सहभाग घेतला असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघाचे वर्चस्व राहीले आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल 19 वर्षे मुले- प्रथम- महाराष्ट्र, द्वितीय- छत्तीसगड व तृतिय- दिल्ली तर 19 वर्षे मुली मध्ये प्रथम- महाराष्ट्र, द्वितीय- छत्तीसगड व तृतिय- पंजाब या संघाने प्राविण्य प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विजयी संघात 19 वर्षे मुले- शुभम धोत्रे (पुणे), श्रीवर्धन बनसोडे (परभणी), निखील माने (पुणे), शिवराज शिंदे (पुणे), अदित्य गवळी (जळगांव), प्रज्वल पाटील (कोल्हापूर), दक्ष रामटेके (यवतमाळ), सार्थक गावडे (मुंबई), तौफिक शाहू (अमरावती), रणवीर जाधव (पुणे), युवराज मांडकर, विशाल जारवाल (छ.सं.नगर), सक्षम पवार (सातारा), अदित्य चव्हाण (नांदेड), संस्कार संकपाळ (सांगली), उदय रेटवडे (पुणे) तर 19 वर्षे मुलीच्या संघात – दुर्वा भोंगळे (पुणे), रत्नमाला चौर (बीड), संस्कृती कुंभार (सांगली), अक्षदा महाजन (जळगांव), पंकजा चौर (बीड), सानिका नलवडे (पुणे), मानसी पाटील (जळगांव), स्मृती सांगळे (पुणे), रोहीणी नवटक्के (लातूर), अनिशा देवकर (पुणे), अमृता शिंदे (जालना), अनुष्का पुल्लरवार (नागपूर), श्रृध्दा गावडे (पुणे), श्रध्दा कांबळे (पुणे), तन्वी फलफले (पुणे), राणी जाधव (नांदेड) या खेळाडूंचा समावेश होता.
या स्पर्धेकरीता पंच म्हणुन श्री.गणेश बेतुडे (छ.संभाजीनगर),आकाश साबणे (परभणी), मनिष मोकल (मुंबई शहर), राहुल खुडे (लातूर), श्री.विशाल कदम (हिंगोली), रोहित ठाकोर (पुणे), पवन सैरासे (अमरावती), प्रफुल वानखेडे (बुलढाणा), गौस शेख (नांदेड), हरिश डोनगांवकर (नांदेड), बालाजी गाडेकर (नांदेड), सायमा बागवान (परभणी), अर्चना कोलोड (नांदेड) आदीनी काम पाहीले.
सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी मा.जयकुमर टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, श्री.राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी) श्री. विपुल दापके (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक श्री.संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक श्री दत्तकुमार धुतडे, श्री. संजय चव्हाण, श्री. आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व बेसबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य केले आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.
0000
वृत्त क्र. 72
समाज कल्याण विभागाच्या क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न
नांदेड दि. 18 जानेवारी : समाज कल्याण विभागाचा विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे नुकताच 17 व 18 जानेवारी रोजी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या विभागीय क्रीडा स्पर्धेत विभागातील धाराशिव, हिंगोली, लातूर व नांदेड येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संघाचे खेळाडू सहभागी झाले होते.
विभागातील 4 जिल्ह्यातील खेळांडुसाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, धावण्याची स्पर्धा व इनडोर स्पर्धामध्ये बॅडमिंटन, टेबलटेनिस, बुद्धिबळ या स्पर्धेचा समावेश होता. या विभागीय स्पर्धा सहायक आयुक्त शिवानंद निमगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.
0000
वृत्त क्र. 71
समाज कल्याण विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
नांदेड दि. 18 जानेवारी : लातूर विभागातील अनु.जातीच्या मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनींचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार 17 रोजी सायं. आयोजित करण्यात आला होता. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, सायबर क्राईम, आदिवासी, बंजारा नृत्य असे विविध नाट्य, नाट्यस्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेतील सर्व विजेत्या शाळांना समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे होते तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशार सिंग साबळे यांची प्रमुख उपस्थितीत भारत सांस्कृतिक संघ राष्ट्रीय कार्य सदस्य डॉ. सान्वी जेठवानी यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशीव या जिल्ह्यातील शासकीय अनु.जाती निवासी शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत घेण्यात आलेल्या मुलीच्या गटात कळमनुरी शासकीय निवासी शाळेला बंजारा नृत्य या लोकनाट्य नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला तर द्वितीय क्रमांक शिक्षणाचे महत्त्व नृत्य या विषयावर शासकीय निवासी शाळा हदगाव यांना दुसरा क्रमांक मिळाला.
तर मुलाच्या गटात धाराशीव जिल्ह्यातील घोडेगाव येथील शासकीय निवासी शाळेने मुला-मुलीचे एक समान नृत्यमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. औसा तालुक्यातील लांबचाना शासकीय निवासी शाळेचा झाडे लावा या लोकनृत्य दुसरा क्रमांक आला. लातूर जिल्ह्यातील बावची रेणापूर येथील शासकीय निवासी शाळेने अभिनय स्पर्धेत व्यसनमुक्ती अभियानात प्रथम क्रमांक पटकावला. याच अभिनय स्पर्धेत मुलींमध्ये धाराशिव जिल्ह्यातील मुरूम शासकीय निवासी शाळेला इंटरनेटच्या सुरक्षिततेचा वापर या अभिनयास प्रथम क्रमांक मिळाला. सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
0000
वृत्त क्र. 70
कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह
• 20 ते 26 जानेवारी कालावधीत सप्ताह
नांदेड दि. 18 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत व शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्यावेळी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये येत्या 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली आहे.
या दोन्ही परीक्षांना राज्यातून सुमारे 31 लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार असून सदर परीक्षेत विविध मार्गांनी होणाऱ्या गैरप्रकारांला आळा बसावा यासाठी राज्यातील नऊ विभागीयमंडळे आपल्या स्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबवित असतात. त्याअनुषंगाने डिसेंबर 2024 मध्ये राज्य मंडळाच्या सूचनेनुसार सर्व विभागीय मंडळांनी आपल्या अखत्यारीतील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सभा आयोजित करून गैरमार्ग विरूद्ध लढा तसेच परीक्षेच्या संदर्भात सर्व सूचना देवून उद्बोधन केले आहे.
या सप्ताहात परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करणे तसेच केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्ती यांच्या नियुक्ती संदर्भात राज्यातील सर्व विभागीय मंडळे, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत, अशी माहिती शिक्षण राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहात पुढीलप्रमाणे कार्यवाही होणार आहे.
सोमवार 20 जानेवारी रोजी स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व मध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य, शिक्षक यांना संयुक्त सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर अंमलबजावणी करण्याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी माहिती दिली जाणार आहे.
मंगळवार 21 जानेवारी रोजी कॉपीमुक्त अभियानाची शपथ सर्व शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परिपाठाचे वेळी घेण्यात येईल.
बुधवार 22 जानेवारीला शाळा स्तरावर मंडळ शिक्षासूचीचे वाचन करणे, मंडळाच्या उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचना व प्रवेश पत्रावरील (हॉल तिकीट) सूचनांचे वाचन करणे. गैरमार्ग केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे.
गुरूवार 23 जानेवारी : परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी याबाबत तज्ज्ञांमार्फत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयमध्ये पालक व विद्यार्थ्यांना उद्बोधन करण्यात येणार आहे.
शुक्रवार 24 जानेवारी रोजी परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची तयारी, परीक्षा तणावमुक्त वातावरणात कशी देता येईल, उत्तरपत्रिका कशा प्रकारे लिहाव्यात याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. तसेच राज्य मंडळामार्फत तयार केलेली चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविल्या जातील.
शनिवार 25 जानेवारी रोजी कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी कॉपीमुक्ती घोषवाक्यासह शाळा परिसरात जनजागृती फेरी काढली जाणार आहे.
रविवार 26 जानेवारी रोजी ग्रामसभा बैठकीमध्ये मुख्याध्यापक-शिक्षक कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माहिती देतील व याबाबत जनजागृती करून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करतील.
0000
वृत्त क्र. 69
स्वामित्व योजनेमुळे
ग्रामस्थांच्या
मालकी हक्काचे संरक्षण निश्चित : खासदार अशोक चव्हाण
·
स्वामित्व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम
· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन
नांदेड दि. 18 जानेवारी :- स्वामित्व योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सनद ई-वितरण कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मिळकतीच्या सिमा निश्चित होऊन मालकी हक्काचे संरक्षण होत आहे. या मिळकत पत्रिका तयार झाल्याने नागरिकांना शासनाच्या अनेक सोई-सुविधेचा लाभ उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरात सनद ई-वितरण वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रधानमंत्र्यांनी ऑनलाईन कार्यक्रमाचे संबोधन केले. देशभरात हा कार्यक्रम सर्व जिल्ह्यात साजरा झाला. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील गावांमध्ये प्रातिनिधिक स्वरुपात सनद वाटप शुभारंभ कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे घेण्यात आला. त्यावेळी खासदार अशोक चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमास खासदार रविंद्र चव्हाण, आमदार हेमंत पाटील, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार बाबुराव कदम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सीमा देशमुख, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीमती मुंजषा कापसे यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून स्वामित्व योजनेंतर्गत संपूर्ण देशातील गावातील नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अचूक मालमत्तेची सनद मिळत असल्याने खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले.
ड्रोनच्या सहाय्याने केलेल्या अत्याधुनिक कामामुळे अचूक मिळकतीचे क्षेत्र नागरिकांना कळत आहे. या अभिलेख्यामुळे जागेच्या क्षेत्राच्या कुठलाही तक्रारी निर्माण होत नाहीत. रस्ते, खुल्या जागा, नाले यांची सिमारेषा निश्चित झाली आहे. अतिक्रमण कमी होऊन या योजनेतून गावाचा अधिकाधिक विकास होण्यास मदत होत होईल. या पत्रिकेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घरासाठी कमी व्याजात अधिक कर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. केंद्र व राज्य सरकारच्या या संयुक्त प्रयत्नाने ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी अधिक सशक्त होत असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मिळकत पत्रिका तयार केल्याचे सांगून लाभार्थ्यांना त्या आज वाटप होत असल्याचे समाधान आमदार डॉ. तुषार राठोड यांनी व्यक्त केले. आमदार बाबुराव कदम यांनी अचूक मोजमापाद्वारे बनवलेल्या या मिळकत पत्रिकेने ग्रामपंचायत स्तरावरील होणाऱ्या चुकीच्या कामांना आळा बसल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रास्ताविकात केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यात मिळकतीची सनद वाटप होत असल्याचे सांगून या योजनेमुळे जिल्ह्यात व्यक्तीगत व शासकीय मालमत्तेची सिमा निश्चित होत आहे. मिळकतीचे क्षेत्र माहीत होण्यास मदत होत आहे. शासकीय कामासाठी या योजनेची मोठी मदत होईल. जिल्ह्यात 453 गावाचे 1 लाख 4 हजार 242 मिळकत पत्रिका तयार झाल्याचेही सांगितले. या योजनेंतर्गत जिल्ह्यात तालुकास्तरावर कार्यक्रम घेऊन उर्वरीत गावात सनद वाटपाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अर्थव्यवस्थेत कोणत्याही क्षेत्रात जागेच्या मालकीला खूप मोठे महत्त्व आहे. या योजनेमुळे ग्रामपंचायत स्तरावर येणाऱ्या अतिक्रमण व तक्रारी कमी होण्यास मदत होईल. या योजनेसाठी काम करणाऱ्या यंत्रणेतील सर्व टिमला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी शुभेच्छा दिल्या.
स्वामित्व योजनेच्या कार्यपद्धतीची जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सीमा देशमुख यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यात त्यांनी गावठाणाची अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध विभागाच्या मदतीने मोजणी केल्याचे सांगितले. ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला याचा फायदा होत आहे. प्रत्येक मिळकतीचे नेमके अचूक क्षेत्र माहीत होत आहे. घराच्या मिळकतीमुळे नागरिकांना लाभ मिळत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. या योजनेद्वारे तयार होणाऱ्या मालमत्ता पत्रिकांचा जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही सीमा देशमुख यांनी केले. शेवटी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीमती मुंजषा कापसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्वामित्व योजनेचे फायदे
शासनाच्या मालकीच्या मिळकतीचे संरक्षण होते. मिळकतीचा नकाशा
तयार होऊन सिमा निश्चित होते. यामुळे मिळकतींचे नेमके क्षेत्र माहिती होते. मालकी
हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार झाल्याने ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे
संवर्धन होते. गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतच्या खुल्या जागा, नाले यांच्या सिमा निश्चित होऊन अतिक्रमण
रोखता येते. मिळकत पत्रिका तयार झाल्याने घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होते.
मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावते. ग्रामपंचायतीला
गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख व नकाशा
उपलब्ध होण्यास मदत होते.
00000
मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे #पालकमंत्री , #सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...