समाज विघातक कृत्याविरोधात ‘महामित्र’ने ढाल बनून
काम करावे
राज्यस्तरीय ‘सोशल मिडिया महामित्र’ सोहळ्यात
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयातर्फे येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात
राज्यस्तरीय ‘सोशल मिडिया
महामित्र’ सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत
होते. व्यासपीठावर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवासन,
माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह,
लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक
पानवलकर, लोकमत न्यूज 18 चे संपादक डॉ. उदय निरगुडकर, उद्योगपती दिपक घैसास,
मिलिंद कांबळे, हिवरे बाजारचे सरपंच
पोपटराव पवार, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, स्पृहा
जोशी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप लोखंडे, अनुलोमचे अतुल वझे यावेळी उपस्थित होते.
माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महाराष्ट्र
शासन (Govt of Maharashtra)’ या जिओ
चॅट चॅनलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण करण्यात
आले.
हल्ली सोशल मिडियाच्या माध्यमातून माहितीचा
स्फोट होतो. मात्र त्यात ज्ञानाचा अभाव असल्याने त्यातून वेगवेगळ्या समस्या
निर्माण होतात. सोशल मिडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेता या माहितीच्या स्फोटातून
निर्माण होणारी नकारात्मकता मिटविण्यासाठी सोशल मिडियाच्याच माध्यमातून सकारात्मक
संदेश पसरविण्याचे काम महामित्रच्या माध्यमातून झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री
म्हणाले.
महामित्र
समाजात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सकारात्मकतेतून नवीन समाजाची निर्मिती करण्याचे काम करीत असताना समाज विघातक
कृत्याविरोधात महामित्र ढाल म्हणून काम करतील. सकारात्मक काम करणारी ही सेना
असल्याचा गौरव मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
हल्ली
खोट्या प्रचाराच्या माध्यमातून सामाजिक स्वाय्थ्य बिघडविण्याचे काम केले जात आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करुन यूवक समाज विरोधी
भूमिका काही वेळेला घेतात. हे यूवक अचानक असे का वागतात याचा विचार झाला पाहीजे.
ज्या सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हाईट कॉलर गुन्हेगारी वाढत आहे. त्या विषयी
समाज जागृती करण्यासाठी त्याच सोशल मिडियाच्या माध्यमातून काम झाले पाहीजे, असे
मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य
शासन अनेक लोकोपयोगी योजना तयार करते. मात्र लोक सहभागाशिवाय त्याची यशस्वी
अंमलबजावणी शक्य नाही. त्यामुळे महामित्र ने अशा लोकोपयोगी योजनांचा प्रसार करणे
आवश्यक आहे. महाराष्ट्रातील 100 टक्के ग्रामपंचायतींपर्यंत फायबर ऑप्टीकल
पोहोचून कनेक्टीविटी देण्याचे काम मार्च पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे सांगत
रिअल टाईम कम्युनिकेशनच्या माध्यमातून ग्रामीण विकास साध्य होणार असल्याचे
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
|
यावेळी
माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह यावेळी म्हणाले की, सोशल मिडियावरील
नकारात्मकता घालविण्यासाठी महामित्र हे महाराष्ट्राची सकारात्मक ऊर्जा म्हणून काम
पाहते. गेल्या महिन्याभरात महामित्र ॲपच्या माध्यमातून 85 हजार महामित्र यांनी
नोंदणी केली असून यासाठी जिल्ह्या-जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला
आहे. देशातील क्रमांक एकचे ॲप म्हणून महामित्रचा गौरव झाला असून महाराष्ट्राच्या
सकारात्मक उभारणीसाठी महामित्र उपयुक्त ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यांमध्ये
महामित्र संवादसत्र घेण्यात आले. आज राज्यस्तरीय सोहळ्यानिमित्त 9 गटांमध्ये चर्चा
करण्यात आली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करताना शिक्षण तज्ज्ञ दिलीप टिकले
यांनी सांगितले की, सकारात्मक ऊर्जा महामित्र यांच्यामध्ये दिसून आली असून
चर्चेच्या केंद्रस्थानी विश्वासार्हता या शब्दाभोवती चर्चा होती. त्यासोबतच डिजिटल
इंडिया योजना सोप्याभाषेत सांगितल्या पाहिजे. नकारात्मक संदेशाला तातडीने
संकारात्मक उत्तराने प्रतिसाद दिला गेला पाहिजे. नागरिकांशी संवाद हा दुहेरी
असायला हवा. करिअर मार्गदर्शन सारखेच योजनांचे मार्गदर्शन झाले पाहिजे. ‘रिल हीरोपेक्षा रिअल हीरो’ होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अनेकांनी आपली मते या चर्चे दरम्यान व्यक्त
केली. डिजिटल माध्यमाची ओळख नसलेल्या गावांमध्ये डिजिटल इंडियाचा प्रसार स्वत:हून
करण्याचा संकल्प महामित्रांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महामित्र अजहर पठाण याने मनोगत
व्यक्त करताना सोशल मिडिया हे दुधारी शस्त्र असल्याचे सांगत या माध्यमाचा वापर
नकारात्मक गोष्टी पसरविण्यासाठी जसा केला जातो तसाच सकारात्मक बाबींसाठीही त्याचा
वापर योग्य प्रकारे होवू शकतो याचे सोदाहरण दिले. सोशल मिडियाचा दुरुपयोग होवू नये
हे महामित्रची नैतिक जबाबदारी असल्याचे त्याने सांगितले. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन
यांच्या काव्य पंक्तींच्या वापर करीत त्याने आपल्या भाषणाचा समारोप केला.
माहिती व जनसंपर्क निर्मित जिओ चॅट
चॅनलचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या मोबाईल ॲपच्या
माध्यमातून महाराष्ट्र शासनाविषयी सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असून
त्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, सचिव, जिल्हाधिकारी,
जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिसांचे संपर्क क्रमांक,
मंत्रिमंडळ व शासन निर्णय यांची माहिती तसेच लोकराज्याचे अंक, प्रश्न मंजुशा,
अहवामान अंदाज, सेवा हक्क कायदा, तक्रार निवारण, महायोजना, महालाभार्थी, मी
मुख्यमंत्री बोलतोय याबाबत माहिती उपलब्ध आहे. अँड्रॉड आणि आयओएस मोबाईलवर हे ॲप
डाउनलोड करण्याची सुविधा असून जिओ चॅटवर महाराष्ट्र शासन नावाने चॅनल उपलब्ध
आहे.
|
यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे
सचिव श्री. सिंह, संचालक, देवेंद्र भुजबळ, शिवाजी मानकर यांच्या हस्ते मान्यवरांचे
स्वागत करण्यात आले. संचालक अजय अंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.
00000
अजय
जाधव/