Saturday, March 24, 2018


जिल्हा कृषि महोत्सवाचे  
26 ते 30 मार्चपर्यंत नवा मोंढा येथे आयोजन
नांदेड, दि. 24 :-  कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) संस्थेमार्फत "नांदेड जिल्हा कृषि महोत्सव" सोमवार 26 मार्च ते शुक्रवार 30 मार्च 2018 या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादीत शेतमाल तसेच शेतकरी गट आणि महिला बचतगटांची उत्पादने थेट ग्राहकांना विक्री केली जाणार आहेत. शेतकरी व नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) नांदेड यांनी केले आहे.
उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारीत धान्य, खाद्य, फळे, फुले, भाजीपाला तसेच सेंद्रीय शेतीमाल विक्री आदीचे आयोजन या कृषि महोत्सवात केले आहे. कृषि विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे. शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षम करणे. समुह / गट संघटित करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे. शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा यासाठी शेतकरी ते ग्राहक विक्री श्रृंखला विकसित करणे. कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानांद्वारे विचारांच्या देवाण-घेवाणीतून शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करणे. विक्रेता व खरेदीदार संमेलनाचे माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपनणास चालना देणे हा कृषि महोत्सवाचा उद्देश आहे.
 कृषि प्रदर्शन हा महत्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालने, विविध कंपन्यांचे स्टॉल, खाद्य पदार्थांचे स्टॉल, प्रात्यक्षिके यांचा समावेश करण्यात येणार आहे. कृषि आणि पुरक व्यवसायाशी निगडीत एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेवर आधारीत प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे. यामध्ये कृषि व कृषि संलग्न विभाग, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, संबंधीत विविध कृषि महामंडळे तसेच शासकीय यंत्रणेबरोबर खाजगी कंपन्या, उद्योजक, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग राहणार आहे.
कृषि शास्त्रज्ञ, तज्ज्ञ अधिकारी, विविध पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी, प्रक्रिया उद्योजक, यशस्वी महिला शेतकरी, उद्योजिका, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांची व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनाबरोबर शेतकऱ्यांशी सुसंवाद गट चर्चा होणार आहे.
जिल्ह्यातील शासन पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांबरोबर कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले प्रयोगशील शेतकरी तसेच जिल्हा, तालुकास्तरीय पीक स्पर्धा विजेते शेतकरी, गट, संस्था यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...