वृत्त क्रमांक
आजपासून जिल्ह्यातील 27 लाख 77 हजार मतदारांच्या
विशेष सखोल पुनरिक्षणास प्रत्यक्ष सुरुवात
एसआयआर मोहिमेत घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करा -जिल्हाधिकारी
मतदार यादीतील नाव शोधा; ECINET ॲपचा करा वापर
नांदेड, दि. 30 जून :- जिल्ह्यात आज ३० जूनपासून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन गणना पत्रक वाटप करणार आहेत. तसेच मतदारांची पडताळणी करणार आहेत. जिल्ह्यात एकूण 27 लाख 77 हजार 73 एवढ्या मतदारांची बीएलओ मार्फत पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी छपाई करण्यात आलेल्या गणना प्रपत्राची संख्या मतदारांच्या दुप्पट म्हणजे 55,54,146 एवढी आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या विशेष सखोल पुनरिक्षणास 30 जून 2026 रोजी पासून सुरुवात झाली असून, या मोहिमेसाठी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व बीएलओंना मागील आठवडाभरापासून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
एसआयआरचा मुख्य उद्देश
एकही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये तसेच अपात्र मतदार मतदान यादीत समाविष्ट होवू नये यासाठी संपूर्ण प्रशासन कटिबध्द आहे. पात्र मतदाराला कोणत्याही परिस्थितीत वंचीत राहू दिले जाणार नाही अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.
असे आहे एसआयआर कार्यक्रमाचे वेळापत्रक
३० जून ते २९ जुलै- मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO)घरोघरी भेटी
५ ऑगस्ट - प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर - दावे व हरकती नोंदविण्याचा कालावधी
५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर- हरकतींवरील प्रत्यक्ष सुनावणी व दावे व हरकती निकाली काढणे
७ ऑक्टोबर - अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी
आपले नाव मतदार यादीत शोधा किंवा फॉर्म भरा
आपले नाव मतदार यादीत शोधा किंवा ऑनलाइन अर्ज भरा. यासाठी निवडणूक आयोगाच्या Voters.eci.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. मदतीसाठी 1950 या टोल फ्री हेल्पलाईन संपर्क दिलेला आहे.
मतदार यादीतील नाव शोधा; ECINET ॲपचा करा वापर
भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेले ECINET हे ॲप प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. हे ॲप डाउनलोड करून 2002 च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा आपल्या नातेवाईकांचे नाव सहजपणे शोधता येते. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन ECINET ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment