Tuesday, April 21, 2020


जिल्ह्यातील सर्व मोबाईलधारकांसह विशेषत:
कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी
आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन
नांदेड दि. 21 :- जिल्ह्यातील सर्व मोबाईलधारकांनी विशेषत : कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपून प्ले स्टोअर मधून आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा. तसेच या आरोग्य सेतू ॲपमध्ये प्रवासाची व आरोग्याची खरी माहिती देऊन प्रशासनास मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
सध्यस्थितीमध्ये सर्वत्र कोरोना विषाणूची लागण होऊन संपूर्ण जगभर प्रादुर्भाव वाढत असून अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. सध्यातरी या विषाणूच्या उपचारासाठी कोणतेही लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे गर्दीत न जाणे किंवा एखाद्या लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात न जाणे हाच एकमेव उपाय आहे.  
संपूर्ण भारतात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांनाच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे. तरी देखील या विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्र आणि देशात अनेक जिल्ह्यात काही कोरोना विषाणूमुळे प्रादुर्भाव झालेल्या हॉटस्पॉट किंवा कोरोना बाधित शहरे जसे की, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, यवतमाळ इत्यादी ठरविण्यात आलेली आहे. लॉकडाऊन लावण्यापूर्वी आणि नंतरही अंदाजित 60 हजार लोक हे वरील बाधित क्षेत्रामधून प्रवास करुन आपल्या जिल्ह्यात येत आहेत असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आपल्या नांदेड जिल्ह्यातही कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र राज्याचे  मुख्य सचिव यांचे निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व मोबाईलधारकांनी विशेषत : बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपून प्ले स्टोअर मधून आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा. तसेच या आरोग्य सेतू ॲपमध्ये प्रवासाची व आरोग्याची खरी माहिती देऊन प्रशासनास मदत करावी. जेणेकरुन या विषाणूची लागण आपल्याच नजीकच्या नातेवाईकांना आणि समाजातील इतर नागरिकांना होणार नाही. आपल्या या सहकार्यामुळे विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनास मदत होईल आणि लॉकडाऊनमुळे स्तब्ध झालेले सर्व सामाजिक व आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येतील, असेही आवाहन नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...