Friday, November 20, 2026

वृत्त क्रमांक

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे ; पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविले

नांदेड, दि. 20 नोव्हेंबर :- जिल्हा परिषद नांदेडच्या समाज कल्याण विभागामार्फत २० टक्के सेस योजनेंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे कार्य करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील इच्छुक व पात्र संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा परिषद, नांदेड येथील समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

MPSC, UPSC, SSC-CGL आणि IBPS यासारख्या स्पर्धा परीक्षांची पूर्व व मुख्य परीक्षांची तयारी करणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये स्थानिक संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिरे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी तालुकास्तरीय शिबिराकरिता प्रत्येकी ३० हजार रुपये, तर जिल्हास्तरीय शिबिराकरिता ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा अनुभव असलेल्या स्थानिक संस्थांमार्फत ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

संस्थांसाठी आवश्यक अटी व कागदपत्रे

संबंधित संस्थेकडे नोंदणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असून, प्रशिक्षणाचा किमान 5 वर्षाचा अनुभव आणि मागील तीन वर्षांचे ऑडिट रिपोर्ट आवश्यक आहेत. तसेच संस्थेने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केल्याचे पुरावे, विद्यार्थ्यांच्या निवड याद्या अथवा संस्थेच्या उपक्रमांच्या छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. संबंधित संस्था नांदेड जिल्ह्यात कार्यरत असणे बंधनकारक आहे.

निवड झालेल्या संस्थांना सर्व १६ तालुक्यांमध्ये मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावी लागणार आहेत. शिबिरांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी चहापान, घडीपुस्तिका तसेच मार्गदर्शकांचे मानधन व इतर अनुषंगिक बाबींची व्यवस्था संबंधित संस्थेला करावी लागणार आहे. पात्र ठरणाऱ्या संस्थांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत  २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ;  सुधारित वेळापत्रकानुसार ...