Friday, November 20, 2026

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यातील 3 लाख 88 हजार एएसडीडी मतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी

• 30 नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्र सादर करा ; पात्र मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि. 20 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम-2026 (SIR) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 3 लाख 88 हजार 387 मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) या प्रवर्गांत नोंदविण्यात आली आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना मतदार यादीत पुन्हा नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र (Enumeration Form) भरून 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरोघरी सर्वेक्षणादरम्यान अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) आणि दुबार (Duplicate) अशा प्रवर्गांत नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ न शकलेल्या मतदारांसाठी आयोगाने 17 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्रानुसार विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार अशा मतदारांना गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत बीएलओमार्फत प्रत्यक्ष पडताळणी व प्रपत्रांचे वितरण आणि संकलन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील एएसडीडी (ASDD) मतदारांमध्ये 2 लाख 27 हजार 453 स्थलांतरित, 71 हजार 587 मृत, 45 हजार 684 अनुपस्थित, 42 हजार 647 दुबार आणि 1 हजार 16 इतर मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांची बीएलओमार्फत प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी केली जात आहे. पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

गणना प्रपत्र भरण्याची सुविधा

मतदारांना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ECINET ॲपवर EPIC क्रमांक टाकून गणना प्रपत्र उपलब्ध करून घेता येईल. संबंधित प्रपत्र मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनाही उपलब्ध करून देण्यात आले आहे. बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन तसेच व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारेही मतदारांशी संपर्क साधणार आहेत. याशिवाय 'बुक अ कॉल विथ बीएलओ' ही सुविधाही उपलब्ध आहे. राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी (BLA) प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची माहिती संबंधित बीएलओंना द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदारांनी घ्यावयाची दक्षता

मूळ निवासस्थानीच वास्तव्यास असलेल्या; मात्र एएसडीडी (ASDD) यादीत नाव समाविष्ट झालेल्या मतदारांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-ब जोडून यापूर्वी प्रपत्र सादर न करण्याचे कारण नमूद करावे. स्थलांतरित मतदारांनी नवीन पत्त्याचा तपशील व आवश्यक पुराव्यांसह परिशिष्ट-क जोडून संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा. अशा मतदारांना स्वतंत्रपणे नमुना-8 भरण्याची आवश्यकता नाही. तसेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नाव नोंदणीसाठी नमुना-6 भरलेल्या मतदारांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची आवश्यकता नाही.

22 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या सुधारित वेळापत्रकानुसार 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार आहे. प्राप्त प्रपत्रांवरील कार्यवाही 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. दावे व हरकतींचा निपटारा 15 डिसेंबर 2026 पर्यंत करून 22 डिसेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार मतदार यादीत राहू नये, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रारूप मतदार यादी आणि ASDD यादीत आपले नाव तपासावे. यादीत नाव नसल्यास किंवा ASDD प्रवर्गात नाव असल्यास ३० नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र संबंधित बीएलओ किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावे. नांदेड जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तसेच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात याद्या उपलब्ध आहेत. पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन निवडणूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

****

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत  २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ;  सुधारित वेळापत्रकानुसार ...